Friday, August 27, 2010

शब्दांनो, सोबती व्हा

माय, एक रूपया दे माय...

मळकी साडी, ढगळा ब्लाऊज,
आर्त आवाज तिचा,
तिच्यासारखाच जोडीदार, दोन पोरं,
दोन डोळ्यांच्या खाचा!

माय एक रूपया दे माय...
उघडा खिसा, द्या पैसा, बघता काय?

सकाळ असो, संध्याकाळ असो,
ट्रेनमधली तिची हाळी चुकत नाही,
दोन्ही पोरांवर करवादताना
तिच्यामधली आई काही लपत नाही.

कसं असेल हिचं घर,
कसा असेल हिचा संसार,
फुटक्‍या तिच्या नशिबात
फुटक्‍या डोळ्यांचाच जोडीदार

ही कधी रांधणार नाही,
ही कधी वाढणार नाही,
नवऱ्याच्या शर्टावरच्या मळक्‍या कॉलरचा
राग हिला कधीच येणार नाही

तिच्या दोन चिमण्यांच्या डोळ्यातलं हसू
तिला कधीच दिसणार नाही,
त्यांच्या बाळलीला बघण्याचं सुख
तिच्या कधीच नशिबात असणार नाही.

तरीही,
त्यांच्यावरच्या करवादण्यातून
तिच्यातल्या वेड्या आईची माया कळते,
तिच्या दोन रट्ट्यांनाही डोळे आहेत,
हे तिच्या पोरांना आपोआप कळते.

पण हे असं किती दिवस चालणार
तिच्या पिल्लांना डोळे आहेतच,
त्यांना एक दिवस फुटणार आहेत पंखही

आणि मग...?
मग काय...?

या आंधळ्या आईसाठी
आणि तिच्या पिल्लांसाठी
करूणा भाकताना,
शब्दांनो सोबती व्हा!

Tuesday, May 25, 2010

चतकोरातली श्रीमंती

रात्री अकराची नेरूळहून ठाण्याला जाणारी ट्रेन.
ती धावत पकडताना लेडिजमधे कुणी नसेल तर बसावं की जावं जेन्टस्‌मधे अशा विचारात मी असतानाच एक बाई आणि एक दहा बारा वर्षाचा मुलगा लेडिजमधे बसलेले दिसले.
या ताई या... त्या बाईनं अगदी घरी बोलवावं तसं माझं स्वागत केलं.
रात्री उशिराच्या या ट्रेनमधे आणखी कुणीतरी सोबतीला आहे हा धीर तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.
मी दुसरीकडची खिडकी पकडली.
पुस्तक बाहेर काढलं.
ताई कोपर कुठे आलं?
कोपर...? ते तर डोंबिवलीच्या अलीकडे.
आणि विठ्ठलवाडी...?
तुम्हाला कुठं जायचंय?
ती तिच्या जागेवरून माझ्या समोर येऊन बसली. असेल तिशीची. अंगावर बरी साडी. गळ्यात मोत्याची माळ. पण चेहऱ्यावर काबाडकष्टातून आलेलं रापलेपण.
मला जायचंय कोपरला. पण तिथलं काम करून मी जाणार विठ्ठलवाडीला. आधी कुठलं येईल?
तिला कोपरला कसं जायचं सांगितलं.
खरं तर मला हे सगळं टाळायचं होतं. दिवसभराचा शीण घालवण्यासाठी हातातलं पुस्तक वाचायचं होतं. पण ती बाई जी काही सुरू झाली...
काहीही विचारण्याआधी, समजून घेण्याची किमान उत्सुकता दाखवण्याआधीच भडाभडा बोलायला लागली.
तो एक माणूस आहे माझ्या ओळखीचा. त्याला दुकान काढायला पाच हजार रूपये दिले होते, सहा महिन्यापूर्वी. ते घेऊन त्यानं कोपरला दुकान काढलं आणि नेरूळहून कोपरला निघून गेला. त्याचा फोनही लागत नाही. पैसै परत कसे मिळणार माझे म्हणून चालले.
मी फक्त हातातल्या घड्याळाकेड बघितलं. रात्रीचे सव्वा अकरा.
आत्ता? माझ्या चेहऱ्यावर प्रश्‍नचिन्ह.
काय करू ताई? कामातून सुट्टी मिळत नाही. सकाळी मी एका हॉस्पिटलमध्ये साफसफाई, कपडे धुण्याचं काम करते. मग बारा वाजता घरी जाते. पोरांना डाळभात करून घालते. मग दुपारनंतर एका घरी कामाला जाते. तिथं घराची साफसफाई, धुणीभांडी आणि स्वैंपाक ही कामं करते. दहा माणसं आहेत, त्या घरात. ती सगळी काम करून यायला अकरा वाजतातच ताई...
नवरा... ? मी विचारलं.
तशी ती एकदम उसळली.
नाव काढू नका त्या त्या मुडद्याचं... नुसता पितो. प्यायचं आणि बायको पोरांना मारायचं... दुसरं काहीही येत नाही त्याला!
तो काही काम नाही करत?
करतो ना. रंगारी आहे. काम करून पैसा मिळाला की घाल दारूत दुसरं काय?
तिनं एकाएकी माझ्याकडे पाठ करून पाठीवरचे वळ दाखवले. साडी वर करून पायावरच्या जखमा दाखवल्या. चेहऱ्यावरच्या खुणा दाखवल्या.
असा मारतो बघा ताई... त्याचं म्हणणं एकच. मी नीट का राहते. आता माझी ही साडी, हे गळ्यातलं मला कामावरच्या ताईंनी दिलंय. त्या म्हणतात, कुणाच्याही घरी कामाला गेलं तरी नीट जावं. तर हा म्हणतो कशाला पाहिजे हा नट्टापट्टा? आता हा काय नट्टापट्टा आहे का हो?
तो खरंच नट्टापट्टा नव्हता.
आता एवढं दहा माणसांचं काम करायचं, लांब आहे घरापासून. रात्री चालत घरी जायचं, उशीर होणारच, तर विचारतो, कुणाबरोबर फिरायला गेली होती बोल. हल्ली मी पण वैतागते. सांगते, आहे एक मोटारवाला. त्याच्याबरोबर गेले होते. एवढे दिवस मी कसंतरी सहन केलं पण आता माझी पोरं मोठी झालीत. मोठा पोरगा आठवीत आहे. तो कालच बापाला म्हणाला, की परत माझ्या आईला हात लावलास तर तुझे तुकडे करीन. मी खरंच कंटाळले त्याला. आता मी सरळ काडीमोड घेणार आहे. तो आणि त्याचं नशीब.
किती पगार मिळतो?
ताई, दोन्हीकडे मिळून पाच हजार रूपये मिळतात. त्यात घराचं भाडं, पोरांची शिक्षणं, जगण्याचा खर्च. चालतं कसं तरी.
तरीपण तुम्ही त्या माणसाला पाच हजार रूपये दिले? मी विचारलं
हां ताई... घरात पैसे ठेवायची भीती वाटत होती. बॅंकेचं वगैरे मला माहित नव्हतं. आणि तो माणूस माझ्यापेक्षाही गरीब होता हो. शेवटी गरीबच जाणार ना गरिबाच्या मदतीला.
मी ट्रेनमध्ये चढले तेव्हा तिच्यासमोर बसलेला तो मुलगा इकडे तिकडे फिरत होता. ट्रेनच्या होल्डरला धरून झोके घेत होता.
हा कोण?
काय माहीत?
मला वाटलं तुमच्याबरोबर आहे तो.
नाही तो आपला आपला आलाय.
ए... कोण रे तू...? मी त्याला हाक मारत विचारलं.
गणेश... माझ्याकडे वळून बघत तो मुलगा म्हणाला.
वय असेल साधारण दहा बारा वर्षांचं. काळा, मळलेला रंग, मळलेले कपडे. पायात चप्पलही नव्हती. पलीकडे त्याची एक मळकट पिशवी पडलेली.
कुठून आलास रे? मी विचारलं.
रत्नागिरीहून. त्यानं झोका घेत घेत उत्तर दिलं.
काय? आम्ही दोघीही एकदम.
हां... त्यानं झोका घेणं थांबवून एकदम शांतपणे सांगितलं.
कसा आलास?
असाच ट्रेननी. पनवेलला बदलली.
एकटाच?
हो!
कुठे चाललास?
ठाण्याला.
तो मुलगा एकेका शब्दात उत्तरं देत होता. आपल्याला हे सगळे प्रश्‍न का विचारले जाताहेत याची त्याला गंमतच वाटत होती.
कुणाकडे?
आजीकडे...
कशाला?
तो काहीच बोलला नाही. झोके घेत राहिला.
कितवीत आहेस रे तू?
पुन्हा माझ्याकडे वळून तो मुलगा म्हणाला,
शाळेत नाही जात मी.
का?
धाडत नाहीत.
कोण?
माझे चुलते आणि चुलती.
आणि तुझे आईवडील?... आम्ही दोघींनीही एकदम विचारलं.
नाहीत.
नाहीत?
म्हणजे वडील गेलेत आणि आईनं दुसरं लग्न केलंय. ती दुसरीकडे असते.
आई तुला घेऊन नाही गेली?
नाही... आता हळूहळू त्याचा चेहरा कसनुसा होत गेलेला.
मग तू किती शिकलास?
तिसरीपर्यंत. मी तिसरीत असतानाच वडील गेले. मग चुलते म्हणाले की तुला शिकवता यायचं नाही. तू घरीच थांब.
मग काय करतोस घरी?
घरातली कामं करतो. पाणी भरतो.
मग आता आजीकडे कशाला चाललास?
चुलता म्हणाला तुला जगवता नाही येणार. तू जा. त्यांनी माझे कपडे पिशवीत भरले आणि घराबाहेर पाठवलं.
आणि आजी काय करते?
काम करते लोकांच्या घरी. तिच्याकडे जाऊन जगणार...
आणि आजीन नाही घेतलं घरात तर...? त्या बाईने विचारलं.
तर बघायचं... तो मुलगा झोके घेत घेत म्हणाला. त्याला हा सगळा खेळच वाटत होता.
बाळा तुला शिकायचंय का रे? त्या बाईनं त्याला विचारलं.
हां... तो मुलगाही मान खाली घालून म्हणाला.
ताई, एक कागद द्या... तिनं आता मला ऑर्डरच दिली. दिला.
पेन द्या... दिला.
तेवढ्यात तिनं तिच्या कॅरी बॅगमधून एक लहानशी, मळकट डायरी काढली.
ती माझ्या हातात देऊन म्हणाली, यात सीताबाई बोंबले नाव शोधा.
तुम्हाला नाही वाचता येत?
नाही.
मी ते नाव शोधलं. नाव, पत्ता होता.
मी दिलेला कागद पेन माझ्याच हातात देऊन ती म्हणाली, ते नाव पत्ता लिहा याच्यावर. आणि नावानंतर माझ्या कामाच्या ताईंचा मोबाईल नंबर आहे, तो पण लिहा.
माझं लिहून झाल्यावर तिनं तो कागद त्या मुलाच्या हातात दिला. आणि म्हणाली, आजीकडे दोनचार दिवस रहा. म्हातारी तरी काय तुला जगवणार? आणि नंतर या पत्त्यावर ये. पुढच्या महिन्यात शाळा सुरू होईल. माझ्या घराजवळच आहे, शाळा. तुझंही नाव घालीन. माझ्या पोरांबरोबर शीक. पण गाड्या धुवायची वगैरे कामं करून तुझे पैसे तुला मिळवावे लागतील. तेवढं करत असशील तर तुला शिकवीन बघ माझ्या पोरांबरोबर.
त्या मुलानं तो पत्ता घेऊन मान डोलावली.
तेवढ्यात ठाणं आलं. शेवटपर्यंत डब्यात आम्ही तिघंच होतो.
तिघंही खाली उतरलो.
खाल्लस का रे सकाळपासून काही?
तो अगदीच संकोचला.
खोटं उत्तर द्यायचा सराईतपणा त्याच्याकडे नव्हता.
नाही खाल्लंस ना काही? हे घे... तिनं चटकन पर्स उघडून दहा रूपयाची नोट काढली.
त्याच्या हातात कोंबली.
खा काहीतरी... आणि शिकायचं असेल तर ये माझ्याकडे असं सांगत ती पुढची ट्रेन पकडायला धावलीसुध्दा!
आता प्लॅटफॉर्मवर आम्ही दोघंच. तो छोटा मुलगा आणि मी. एकमेकांकडे पहात.
सतत "नकोसं' असल्याची वागणूक मिळाल्यानंतर माणूसकीची ही झुळूक अनुभवून विस्मयचकीत झालेला तो.
आणि आयुष्याच्या कक्षा विस्तारल्या तरी जगण्याच्या मर्यांदांचं भान अचानक जाणवल्यामुळे भांबावलेली मी!

Thursday, May 20, 2010

न्यायाचा सरकारी चेहरा

न्यायाचा सरकारी चेहरा
मुंबई हल्ल्यावरच्या निकालपत्राच्या वाचनाचं सोमवारचं कामकाज संपलं तेव्हा प्रसारमाध्यमांनी सगळ्यात पहिला गराडा घातला तो विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना. कसाबखालोखाल तो दिवस जणू काही उज्ज्वल निकम यांचाच होता. त्यांच्या मुलाखती, त्यांचे बाईट, असं सगळं सकाळपासूनच सुरू होतं. त्यामुळेच निकालपत्राच्या पहिल्या दिवसाच्या वाचनानंतरही सगळ्यात महत्त्वाची होती ती त्यांची प्रतिक्रिया. "येस यू आर गिल्टी' हा कसाबवरचा अहवाल दाखवत तेही ती हिरिरीने देत होते. 1994 मध्ये मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्यापासूनचा उज्ज्वल निकम यांचा प्रवास कुणालाही थक्क करणारा आहे. त्यांचा जन्म जळगावचा. वडील देवराव निकमही वकील. त्यामुळे व्यवसायाचं बाळकडूच मिळालेलं. सायन्सची आणि नंतर लॉच्या पदवीपर्यंतचं शिक्षण त्यांनी जळगावातच पूर्ण केलं. काही काळ तिथल्याच सत्र न्यायालयात सरकारी वकील म्हणून कामही केलं. पण मुंबईचे माजी सहआयुक्त एम. एन सिंग यांनी त्यांना मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात जळगावहून बोलावलं. त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आणि बघता बघता ते या बिनचेहऱ्याच्या यंत्रणेचा चेहरा बनून गेले. तेरा बॉम्बस्फोटांच्या मालिकेवरचा 14 वर्षे चाललेला हा खटला आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता, असं ते सांगतात. हा प्रदीर्घ, संवेदनशील खटला हाताळल्यानंतर उज्ज्वल निकम यांच्याकडे गुलशनकुमार खून खटला, नदीम खटला, खैरलांजी हत्याकांड, प्रमोद महाजन खून खटला असे अनेक महत्तवाचे खटले येत गेले. आणि त्या सगळ्यामधून त्यांची कारकीर्द झळाळत राहिली. तीस वर्षांच्या त्यांच्या कारकीर्दीमध्ये त्यांच्या युक्तिवादामुळे आत्तापर्यंत 613 जणांना जन्मठेप तर 33 जणांना फाशीची शिक्षा जाहीर झाली आहे. या सगळ्या हाय प्रोफाईल खटल्यांचे वकील असल्यामुळ
े उज्ज्वल निकम यांना झेड सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. आपल्या सगळ्या यशामध्ये कोणतीही तक्रार न करता आपल्याबरोबर दिवसरात्र फिरणाऱ्या या सुरक्षा रक्षकांचाही वाटा आहे असं त्यांना वाटतं. या सगळ्या तीस वर्षांच्या प्रवासात त्यांना निशब्द साथ दिली आहे ती त्यांच्या कुटुंबाने. सततचा प्रवास, वेगवेगळ्या मोठमोठ्या खटल्यांची धावपळ या सगळ्या पार्श्‍वभूमीवर ते जमेल तेवढा वेळ कुटुंबासाठी काढायचा प्रयत्न करतात. पण या सगळ्या दगदगीत कुटुंबानंही आपल्याला समजून घेतलंय, हे ते आवर्जुन सांगतात. त्यांचं दिनक्रम बघतला तरी त्यांच्या रोजच्या दगदगीची कल्पना येते. ते रोज सकाळी चार वाजता उठतात. रोज नियमित व्यायाम करतात. सहा वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत त्यांच्याकडे असलेल्या खटल्यांचा अभ्यास, पोलीस अधिकाऱ्यांना ब्रिफिंग, नोट्‌स काढणं, केसची तयारी हे सगलं चालतं. अकरा ते पाच कोर्ट, पाच ते सात पेपर वाचणं, बातम्या बघणं, इतर गोष्टी समजून घेणं आणि रात्री साडेदहाला झोप. ते रात्रीच्या पार्ट्यांना जात नाहीत. मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या पहिल्या दिवशी ते कोर्टात गेले तेव्हा विशेष टाडा न्यायालयात शंभराच्या वर पत्रकार त्यांची वाट पहात होते. मला तेव्हा भारताचा पंतप्रधान झाल्यासारखंच वाटलं, तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही, असं ते सांगतात.
कसाबचा खटला देशासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. त्याला ताबडतोब फासावर लटकवा असा लोकांचा आक्रोश सुरू झाला होता. पण हा आंतरराष्ट्रीय खटला होता. तो नीट चालवून आपल्या देशात इतर काही देशांसारखं मध्ययुगीन वातावरण नाही, इथे एक नीट न्याययंत्रणा आहे, हे जगापुढे मांडणं आवश्‍यक होतं. त्याचं शिवधनुष्य निकम यांना पेलायचं होतं. हे अक्षरश शिवधनुष्य होतं. सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलेला, मोठा खटला होता तो. त्याचं चार्जशीटच अकरा हजार पानांचं होतं. 650 साक्षीदारांचे जबाब नोंदवून घ्यायचे होते. कसाबवर देशाविरूध्द युध्द पुकारण्यापासूनचे एकूण 86 आरोप होते.
असा सगळा खटला उज्ज्वल निकम यांना हाताळायचा होता. तो त्यांनी कसा हाताळला याचं फलित म्हणजे कसाबला झालेली फाशीची शिक्षा.
कसाबला फाशी का दिली पाहिजे याचा युक्तिवाद करताना त्यांनी आठ कारणं दिली आहेत. कसाब हे पाकिस्तानात तयार झालेले किलिंग मशीन असून त्याला अजिबात जिवंत रहाण्याचा अधिकार नाही. असं सांगून ते न्यायाधीशांना म्हणाले की कसाबची केस ही दुर्मिळातली दुर्मिळ केस आहे. या सैतानाच्या एजंटला फाशीच दिली पाहिजे. एक तर त्याचं सगळं कृत्य पूर्वनियोजित, पूर्वप्रशिक्षित होतं. तरूण, वृध्द, हिंदू, मुस्लिम, ज्यू, ख्रिश्‍चन असा कोणताही विचार न करता त्याने सरसकट सगळ्यांनाच ठार केलं आहे. त्यानं कोणतीही दयामाया न दाखवता अत्यंत योजनाबद्ध रीतीने लोकांना मारलं आहे, हे त्याला फाशी देण्याचं दुसरं कारणं. ते अधिक स्पष्ट करताना ते म्हणतात कसाबनं आणि अबू इस्माईलनं आठ स्त्रिया, सात लहान मुलं तसंच 14 पोलिसांसह 72 लोकांना ठार केलं. हे सगळे लोक असहाय होते. ते कोणताही प्रतिकार करू शकत नव्हते. आणि कसाबनं त्यांना मारावं असं कोणतंही कृत्य त्यांनी केलेलं नव्हतं.
कसाबला फाशी दिलीच पाहिजे याचं समर्थन करताना त्यांनी मांडलेला आणखी तिसरा मुद्दा म्हणजे कसाबने फक्त माणसांना जीवे मारलं नाही तर माणसे मारणं एन्जॉय केलं. यातून त्याचा माणसांच्या जगण्याकडे बघण्याचा तुच्छतावादी दृष्टिकोन दिसून येतो. कसाबला फाशीच दिली पाहिजे हे ठासून मांडताना त्यांनी मांडलेला चौथा मुद्दा म्हणजे सीएसटी स्टेशनवर अपेक्षेपेक्षा कमी गर्दी बघून कसाबला जास्त माणसं मारता येणार नाही याचं वाईट वाटलं. त्यामुळे कसाब हा जनावरांपेक्षाही घातक आहे. कसाबच्या कबुलीजबाबाचा संदर्भ देऊन ते म्हणतात की समुद्रमार्गे प्रवास करून मुंबईत पोहोचायला या सगळ्या दहशतवाद्यांना एक तास उशीर झाला. त्यामुळे त्यांना त्या संध्याकाळी सीएसटी स्टेशनवर अपेक्षित गर्दी मिळाली नाही. कसाब आणि इस्माईलनं कुबेर या त्यांनीच पळवलेल्या बोटीच्या खलाशाची हत्या केली. त्याची हत्या ही अकारण केलेली अत्यंत क्रूर हत्या आहे. कसाब म्हणजेच कसाई, खाटिक. आणि या कसाबनं नावाप्रमाणेच कृत्य केलं.
कसाबला फाशी दिलीच पाहिजे यासंदर्भातल्या पाचव्या मुद्‌द्‌याचं समर्थन करताना त्यांनी न्यायाधीशांना विनंती केली की कसाबच्या चेहऱ्यावर जाऊ नका. माणसांना मारून सीएसटी स्टेशनवर फिरतानाचे त्याचे फोटोच त्यांनी कोर्टापुढे सादर केले. कसाब मुंबईत आला तो दहा जणांच्या गटाबरोबर. त्या सगळ्यांनी मिळून कोणतंही कारण नसताना 160 निष्पाप लोकांची हत्या केली. अनेकांना जखमी केलं. हे सगळं म्हणजे केवळ घडून आलेली हत्या नाही तर थंड डोक्‍याने जाणीवपूर्वक केलेलं कृत्य आहे. या कृत्यामुळे समाजमनाला हादरा बसला. इतक्‍या माणसांच्या हत्येमुळेच केवळ हा दुर्मिळातला दुर्मिळ खटला आहे असं नाही तर ज्या पध्दतीने माणसांना मारण्यात आलं, त्यातलं क्रौर्य पाहता कसाबला फाशीच दिली पाहिजे. कसाबला जर फाशीपेक्षा कमी शिक्षा दिली तर भारत हा अतिरेक्‍यांचे "सॉफ्ट टार्गेट' बनेल. त्यामुळे कोणतीही दयामाया न दाखवता कसाबला फाशीच दिली पाहिजे. जो दुसऱ्यांचे जीव घेतो त्याला जगण्याचा कोणताही अधिकार नाही.
हा उज्ज्वल निकम यांचा कसाबला फाशी देण्यासाठीचा युक्तिवाद होता.
सगळ्या जगाचं लक्ष लागलेल्या या खटल्याचं शिवधनुष्य लीलया पेलत उज्ज्वल निकम यांनी मुंबईवर हल्ला करणाऱ्या कसाबला फाशीच्या तख्ता पर्यंत नेऊन पोहोचवलं आहे.

Tuesday, May 4, 2010

सोशल मीडिया पूरकच... पण!

तंत्रज्ञानाची जसजशी प्रगती होत गेली आहे तसतसा मीडिया बदलत गेला आहे हे आपण सगळेच पहात आहोत. आधीची अक्षरजुळणी गेली, ऑफसेट प्रिटिंग आले तसतसं वर्तमानपत्राची छपाई सोपी सुलभ होत गेली.
गेल्या दहा वर्षात इलेक्‍ट्रॉनिक्‍स माध्यमातल्या बदलांनी मीडियाचा चेहरा मोहरा आपल्यासमोरच बदलत गेला आहे. एखादी घटना घडत असताना ती घरबसल्या समोर पहायला मिळणं हा थरार आता सामान्य माणसालाही नवीन राहिलेला नाही. त्याचाच पुढचा टप्पा अर्थातच इंटरॅक्‍टिव्ह मीडिया हा होता. तिथूनच माहितीचा स्त्रोत मीडियाकडून लोकांकडे जाणं ही पारंपरिक रचना बदलायला सुरूवात झाली. आणि लोकांकडून मीडियाकडे माहितीचा स्त्रोत सुरू झाला.
खरं म्हणजे आपण अशा युगात वावरत आहोत जिथे माहिती ही कुणा एकाची मक्तेदारी असू शकत नाही. ती कुणाहीकडे असू शकते. पूर्वीही ती होतीच पण ती प्रसारीत करणं ही तांत्रिक अडचण होती. आता व्टीटर, ब्लॉग्ज, बझ अशा माध्यमांमुळे आपला मुद्दा मांडणं आणि तो अनेकांपर्यंत पोहोचवणं अगदी सोपं झालं आहे. अमिताभ बच्चन यांनी रात्री अडीच वाजता ब्लॉग पोस्ट केला की पावणेतीन वाजता त्याच्यावर पहिली प्रतिक्रिया पडलेली असते. अमिताभ आणि त्याच्या चाहत्यांचा हा थेट, मुक्त संवाद कुणीही "फिल्टर' करू शकत नाही. दोन टोकांमधलं माध्यम म्हणून मीडियाचं जे महत्त्व होतं त्याला हादरा बसला आहे तो तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे. मीडियाबद्दलच्या अविश्‍वासार्हतेची त्याला जोड मिळाली आहे इतकंच.
आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की तंत्रज्ञानातले हे बदलच यापुढच्या काळात अनेक गोष्टींना भुईसपाट करणार आहेत. अनेक नव्या गोष्टी आणणारही आहेत. व्टीटरची एक ओळ आयपीएलच्या साम्राज्याला धक्का देईल हे दहा वर्षापूर्वी आपल्याला "कल्पनारम्य' वाटलं असतं. चॅनल सर्फिंग ज्या वेगानं केलं जातं, त्याच वेगाने आपल्या आसपास घटना घडतात. त्याच वेगानं त्या आपल्याला समजतात. इंटरनेटवरून तुम्ही कधीही कुणाशीही संपर्क साधू शकता तेव्हा देशांच्या भौगोलिक सीमाही नावापुरत्या ठरतात.
ज्यांच्या अगदी वडिलांनीही गावाबाहेर पाऊल टाकलेलं नाही अशी मुलं नोकरीसाठी देशोदेशी फिरतात. अशा वातावरणात लोकांच्या आकांक्षा वाढलेल्या आहेत. जगण्याच्या कक्षा बदलल्या आहेत. त्यांची समज वाढलेली आहे. आणि मीडियाकडून असलेल्या अपेक्षा बदलल्या आहेत. मीडिया हे बदललेलं समाजमन समजून घ्यायला तयार नाही. आणि त्यात तंत्रज्ञान स्वस्त आणि सोपं होत लोकांच्या हातात पोहोचलं आहे. सोशल मीडिया हे त्याचंच फलित.
सोशल मीडियाची ही सगळी नांदी बघितली तर फक्त माहिती देणं हा आपला रोल आता बदलला आहे, हे मीडियानं लक्षात घ्यायला हवं.

Thursday, April 29, 2010

अस्मिता आपली आणि त्यांची!

मराठीसाठी आता सरकारनं स्वतंत्र खातं नेमायचं ठरवलं आहे. आनंद आहे. पण या खात्याचं इतर खात्यांसारखं "सरकारीकरण' होऊ नये. पण तरीही प्रश्‍न पडतातच. हे खातं नेमकं काय करेल? आपल्या भाषेवर प्रेम करा हे मुळात आपल्याच लोकांना सांगयला लागणं हे किती दुर्देवी आहे. स्वभाषेबद्दल कमालीची अनास्था बाळगणारी आपल्यासारखी कर्मदरिद्री जमात जगात कुठेही नसेल.

गेल्याच महिन्यात मी थायलंडला गेले होते. पर्यटकांना दाखवले जाणारे वेगवेगळे कार्यक्रम बघत होते. थायी कल्चरल शो असो, की ओरांग उटांग शो, एलिफंट शो असो की डॉल्फिन शो, हे सगळे शो बघायला बहुसंख्य पर्यटकच होते. म्हणजे पर्यटकांना अर्थातच परदेशी पर्यटकांना समोर ठेवूनच त्यांची निर्मिती केलेली होती. तरीही हे सगळे शो थायी भाषेतच होते. शोच्या शेवटी थोडक्‍यात त्यांचा सारांश सांगितला जायचा.

पर्यटनावर हा देश मोठ्या मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. पर्यटकांसाठी या देशाने मखमली पायघड्या घातल्या आहेत. अगदी सेक्‍स टुरिझमही वाढवलं आहे. पण आपल्या भाषेची अस्मिता मात्र गहाण ठेवलेली नाही.

आपण मात्र सगळ्यात पहिल्यांदा तीच गहाण टाकली आहे.

Thursday, April 22, 2010

बीज अंकुरले... अंकुरले!

चंद्रपूर, लातूरमधल्या लहान लहान गावांमध्ये राबवल्या गेलेल्या विकासशाळांमध्ये भाग घेतलेली ही मुलं. अगदी टीपकागदासारखी. त्यांना फक्त आपलंच आयुष्य बदलायचं नाहीय तर आसपासचा समाजही बदलायचा आहे. त्यासाठी ते करत असलेल्या संघर्षाची ही अनोखी कहाणी.

-----
चार वर्षांपूर्वी चंद्रपूर, लातूर या जिल्ह्यांमध्ये लहानलहान गावांमध्ये फिरणं झालं, त्यावेळी युनिसेफचा एसआयडी म्हणजेच स्कूल इन डेव्हलपमेंट हा कार्यक्रम नुकताच सुरू झाला होता. गावातल्या लहान मुलांना एकत्र करून आठ दिवसांचं ट्रेनिंग व्हायचं. ट्रेनिंगमध्ये त्यांना गावाचा नकाशा काढणं, घरं, लोकसंख्या मोजणं, शाळाबाह्य मुलं मोजणं, गावात शाळा आहे का, दवाखाना आहे का, शौचालयं आहेत का याच्या नांदी करणं हे शिकवलं जात होतं. आठ दिवस एकत्र येऊन हा सगळा सर्व्हे करताना त्या मुलांना हळूहळू गावातल्या प्रश्‍नांची जाणीव होईल अशी त्यामागची कल्पना होती. लहान मुलं ही विकासाचे दूत मानून तो सगळा कार्यक्रम उभा राहणार होता. एसटीसुध्दा जात असेल नसेल अशा गावातली ही मुलं. शैक्षणिक वातावरण, सुविधा, आर्थिक परिस्थिती या सगळ्याच पातळीवर मुख्य प्रवाहापासून निव्वळ भौगोलिक कारणामुळे बाजूला पडलेली. त्यांच्यामध्ये अमाप उत्साह, इच्छाशक्ती असली तरी त्यांच्याभोवतीचं एरवीचं वातावरणच असं की टिपकागदाप्रमाणे असलेल्या त्यांच्या या उत्साहाचं, कोणतीही नवी गोष्ट शिकण्याच्या आनंदाचं या ट्रेनिंगनंतर काय होणार?याच गावांमधली मुलं नुकतीच मुंबईत भेटली. दूरदर्शनवर ... कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आलेली. त्यांच्याशी गप्पा मारताना उलगडत गेलं ते त्यांचं जगण्याचं विद्यापीठ...चंद्रपूरमधल्या नंदुरी गावात राहणारी सुवर्णा तांबट. ही तरतरीत मुलगी नववीमध्ये होती तेव्हा तिच्या वडिलांचा अपघात झाला. बदललेल्या परिस्थितीत सगळ्यात पहिला घाला आला तो तिच्या शिक्षणावर. तिला मात्र शिकायचं होतं. दीपशीखा प्रकल्पातून तिला शिक्षणाचं महत्त्व पटलं होतं. काहीतरी बनण्यासाठी नीट शिकलं पाहिजे हे तिच्या मनानं घेतलेलं होतं. त्यामुळे ती शिक्षण सोडायला अजिबात तयार नव्हती. ते बघून घरातल्या लोकांना इतका राग आला की "घरातून चालती हो' असं तिला सांगितलं गेलं. तशीच उठून ती तिच्या भावोजींकडे गेली. "घरातून हाकललं आहे हे कळल्यावर तेही मला घरात घ्यायला तयार होईनात.' ती सांगते, मग मी मैत्रिणीच्या घरी गेले. त्यांनी मात्र मला राहू दिलं. शेतात मजुरी करत आपल्या शिक्षणापुरते पैसे जमवत मी दहावी पूर्ण केली.' अकरावीसाठी तिनं प्रवेश घेतल्यानंतर मात्र आईवडिलांना कानकोंडल्यासारखं व्हायला लागलं. ते तिला बोलवायला आले. "आपल्या घरी राहून शीक' असं म्हणाले. आता तिनं बारावीची परीक्षा दिली आहे.---लातूरमधल्या वडगाव निलंग्यातला प्रदीप झरे आठवीत शिकतो. त्याच्या गावात आलेल्या विकासशाळेचं ट्रेनिंग त्यानं घेतलं आहे. लहान मुलांनी शिकलं पाहिजे, मुलींचं लग्न अठराव्या वर्षांनंतर करायचं असतं ही माहिती त्याला या विकासशाळेत मिळालेली. गावातल्या स्वाती वाघमारे या मुलीचं लग्न जुळवलं गेलं होतं. ती आपल्याच वयाची म्हणजे तेरा वर्षांची आहे, ही खात्रीलायक माहिती होती. प्रदीपनं आपल्याबरोबर गावातली इतरही मुलं गोळा केली. ही सगळी वानरसेना त्या मुलीच्या आईवडिलांना भेटली. अठरा वर्षांच्या आधी या मुलीचं लग्न करू नका, तिला शाळेत पाठवा असा आग्रह त्यांनी धरला. मुलीच्या आईवडिलांनी आपली दखल घेतलेली नाही हे लक्षात आल्यावर मात्र मुलांनी "आशादीप'च्या कार्यकर्त्यांना, गावातल्या मान्यवरांना बोलावून मुलीच्या आईवडिलांशी चर्चा करायला लावली. गावाच्या दबावामुळे आता ती मुलगी शिक्षण घेते आहे. गावातलाच भरत वाळके नावाच्या मुलाला शाळेत पाठवलं जात नव्हतं. गावातल्या मुलांनी भरतच्या आईवडिलांमागे सारखा लकडा लावून भरतला शाळेत पाठवायला भाग पाडलं आहे.---मंजुळा मडावी ही चंद्रपूरमधल्या आंबेजरी गावची. ती दहावीत असताना आईवडिलांनी तिचं लग्न जुळवलं. विकासशाळेत ट्रेनिंग घेऊन शिकण्याची स्वप्नं बघत असलेल्या मंजुळासाठी हा धक्काच होता. तिनं लग्नाला नकार दिला. "मी लग्नाला तयार नाही म्हटल्यावर आईवडिलांनी मला खूप मारलं. सगळ्यांसमोर मारलं.' मंजुळा सांगते. लग्न करणार असलीस तरच इथे रहा. नाहीतर या घरात रहायचं नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. मग मीही तशीच घराबाहेर पडले. काकाच्या घरी गेले. गावात सगळ्यांना ही बातमी समजली तेव्हा माझ्या सरांनी जाऊन आईवडिलांशी बोलणं केलं. मग आईवडिल काकाच्या घरी आले आणि शिकवायचं कबूल करून मला घरी घेऊन गेले. आता मंजुळा बारावी आर्टस्‌ करते. तेरा वर्षाच्या तिच्या मैत्रिणीची सगाईही तिनं मैत्रिणीच्या आईवडिलांशी पुन्हा पुन्हा बोलून आपलं उदाहरण देऊन रोखायला लावली आहे. तिनं आणि तिच्या मित्रमंडळीनी मुलांना शाळेत पाठवायला तयार नसलेल्या पालकांना भेटून मुलांना शाळेत पाठवायला भाग पाडलं आहे. तिच्याकडे चिठ्ठी वाचून घ्यायला येणाऱ्यांना ती सांगते, मी आज ना उद्या लग्न करून गेले की मग तुम्ही काय कराल? त्यापेक्षा मुलांना लिहायला वाचायला शिकवा. ---अकरावीत शिकणाऱ्या चंद्रपूरच्या शशिकला आडेची कहाणीही अशीच. युनिसेफच्या प्रशिक्षणामुळे डोळे उघडलेले आणि धाडसही आलेलं. अल्पवयात ठरवल्या जात असलेल्या लग्नाला विरोध केला म्हणून तिलाही भावांचा मार खावा लागला. पण मार खाऊनही तिनं जिद्द सोडली नाही. शाळेतल्या शिक्षकांमार्फत तिनं आईवडिलांना समजावलं. तिचं शिक्षण परत सुरू झालं. पण आपल्यापुरता प्रश्‍न मिटला म्हणून ती गप्प बसली नाही. "माझ्या शेजारी राहणाऱ्या दोन मुलींना शिकायचं होतं. पण त्यांच्या आईवडिलांनी त्यांना वावरात कामाला पाठवलेलं होतं.' शशिकला सांगते, "मग मी जाऊन त्यांच्या आईवडिलांशी बोलले. ते माझं ऐकेनात म्हणून सरांना घेऊन गेले. सरांनी समजावून सांगितल्यावर आता त्या मुली शाळेत जायला लागल्या आहेत. ---"मुलं आज सांगत आहेत तितकं हे सगळं सहज सोपं नाही.' चंद्रपूर जिल्हा युवक मंडळाचे या मुलांबरोबर आलेले कार्यकर्ते सांगतात. "मुलं या पातळीवर येण्यासाठी गेल्या तीन चार वर्षात सतत कार्यक्रम घेतले गेले. पूर्वी या मुली मीटींगलाही यायला तयार नसत. बोलायला तयार नसत. आता त्या बॅंकेचे व्यवहारही करतात. "आशादीप'चे बाबासाहेब चव्हाण सांगतात, स्कूल इन डेव्हलपमेंट म्हणजेच विकासशाळेत आम्ही मुलांना बालविवाह, मुलांचे हक्क याविषयीचं ट्रेनिंग दिलं. प्रत्येक गावात असा किशोरवयीन मुला- मुलींचा गट तयार केला. असे गट तयार केल्यामुळे बालविवाहांची माहितीही मुलांच्याच माध्यमातून मिळते आणि बालविवाहही रोखता येतात. मुलांच्या माध्यमातून आम्ही गेल्या वर्षभरात असे पाच ते सहा बालविवाह रोखले आहेत. फक्त बालविवाह रोखणं, शाळेत पाठवणं एवढ्यावरच ही मुलं थांबलेली नाहीत. विाकसळाळेच्या माध्यमातून त्यांना एखादं स्वप्न दाखवलं की ती त्या स्वप्नाच्याच मागे लागतात. काही गावांमध्ये स्वच्छ, सुंदर, हागणदारीमुक्त गाव आणि आरोग्याचा काय संबंध असतो हे त्यांना समजावून सांगितलं गेलं. शौचालयं असतील तर निम्मे आजार कमी होतील, हे पटल्यावर मुलांनी आपल्या आईवडिलांकडे घरात शौचालय हवंच असा आग्रह धरला. आईवडील तयार होत नसतील तिथे उपोषणाच्या धमक्‍या दिल्या. घरातलं पोर काही खात नाही हे बघितल्यावर आईवडिलांपुढे काही पर्यायच नव्हता. ---या मुलांच्या या लढाया शहरी मुलांच्या तुलनेत कदाचित चमकदार, नेत्रदीपक वगैरे नसतील, पण त्या त्यांचा उद्या घडवणाऱ्या आहेत.

Sunday, April 18, 2010

गंगेमध्ये एक ओंजळ...!

गंगेबद्दल भारतीय माणसाच्या मनात जितका खोलवर रूजलेला जिव्हाळा आहे, तितकीच गंगेच्या प्रदूषणाबद्दल अनास्था. गंगेच्या प्रदूषणामुळे अस्वस्थ झालेल्या फोटोग्राफर विजय मुडशिंगीकरांनी गेली दहा वर्ष आपलं अवघं आयुष्यच गंगार्पण करून टाकलंय. त्यांनी काढलेल्या गंगेच्या विविध फोटोंचं फिरतं प्रदर्शन घेऊन ते येत्या पाच मार्चपासून गंगेच्या उगमापासून ते ती जिथं समुद्राला मिळते त्या टोकापर्यंत फिरणार आहेत. देशभर प्रांतवादाची बिजे पेरली जात असताना एक मराठी माणूस आपल्या खिशाला खार लावून गंगेच्या प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी धडपडतो आहे!
-----
कशासाठी जगायचं या प्रश्‍नाचं उत्तर कुणाला कधी आणि कसं सापडेल याचा नेम नसतो हेच खरं. कुणाला ते आयुष्याच्या सुरूवातीलाच सापडतं आणि त्याच्यासाठी सगळं आयुष्य आनंदयात्रा बनून जातं. तर कुणाला ते सगळे टक्केटोणपे खाऊन झाल्यावर, आता काय उरलं असं वाटत असताना सापडतं आणि मग त्याची आयुष्याची संध्याकाळ सोनेरी होऊन जाते.विजय मुडशिंगीकरांना ते सापडलं स्लिप डिस्कनं अंथरूणाला खिळलेले असताना. कोल्हापुरात पंचगंगेच्या काठावर बालपण गेलेला हा माणूस. क्रॉम्पटन ग्रीव्हजमध्ये साधा कामगार. वाढत्या वयात कधीतरी मित्राच्या नादानं कॅमेरा हातात आला. फोटोग्राफीचं रीतसर प्रशिक्षण कधी घेतलं नाही, पण मित्रामुळेच शिकत शिकत लग्नासाठीचे फोटो काढायला सुरूवात केली. बघता बघता छंदाचा "साईड बिझनेस' झाला. सगळं नीट सुरळीत चाललेलं. पण 1998 मध्ये त्यांना एक अपघात झाला. त्यातून स्लिप डिस्क. जराही हलता यायचं नाही. आता आपण आपल्या पायावर उठून उभे तरी राहू की नाही हा एकच प्रश्‍न मन खात होता. वेळ जाण्यासाठी हातात येतील ती पुस्तकं वाचत होते. अशातच त्यांच्या हातात सुरेशचंद्र वारघडेंचं "हिमयात्री' हे पुस्तक पडलं. ते पुस्तक वाचताना ते इतके भारावून गेले की परत कधीमधी चालू शकलोच तर हिमालयात नक्की जायचं असं त्यांनी ठरवलं. सुदैवानं डॉ. प्रेमानंद रामाणींच्या स्लिप डिस्कवरच्या नव्या शोधामुळे ते ऑपरेशननंतर सातआठ दिवसात ठणठणीत झाले. आता मिळालेलं आयुष्य हे बोनस आहे, असा विचार करत त्यांनी मित्रांना गोळा करून त्यांनी व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा ट्रेक केला. एकदा हिमालय बघायला गेलेल्या माणसाला हिमालय पुन्हापुन्हा तिथं यायला भाग पाडतो. तसंच त्यांचंही झालं. तिथल्या नद्यांच्या तर ते इतक्‍या प्रेमात पडले की गंगेच्या उगमापासून ते गंगासागरपर्यंत टप्प्याटप्प्याने त्यांनी अनेकदा प्रवास केला. गोमुखपासून, हरिद्वार-ऋषिकेशपर्यंत नितळशंख असलेली गंगा पुढेपुढे कानपूर, पाटण्याला इतकी प्रदूषित होत गेलेली बघून ते अतिशय व्यथित झाले. उगमाच्या ठिकाणी अमृत मानलं गेलेलं गंगेचं पाणी नंतर बघवत नाही, इतकं खराब होतं, हे सगळं रोखण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, या त्यांच्या अस्वस्थपणाला उत्तर होतं, फोटोग्राफी! अर्थात हातात पैसे नसत, रजा मिळत नसत, पण डोक्‍यात फक्त उगमापासून नितळस्वच्छ असलेली आणि दुसऱ्या टोकाला प्रदूषित होत गेलेली गंगा नदी असायची. महिन्याच्या पगाराचे पैसे खर्च करून ते गंगेचं खोरं गाठत. त्यामुळे ते तिकडे जाऊन नेमकं काय करतात हे बघायला त्यांची पत्नी थेट त्यांच्याबरोबर गोमुखला आली होती. उगमापासून, टोकापर्यंतच्या गंगेच्या टप्प्यांचे त्यांनी अनेकदा फोटो काढले. या सगळ्या फोटोंची संख्या जवळपास पाच हजारांच्या घरात जाईल. घरातल्या लोकांना त्यांचं हे काम करण्याची मनापासूनची ओढ लौकरच लक्षात आल्यामुळे त्यांना पहिल्यापासूनच सहकार्य मिळायला लागलं. इतकं की निवडक 120 फोटोंचं प्रदर्शन मांडून लोकांमध्ये गंगेच्या प्रदूषणाबाबत जनजागृती करायचं त्यांनी ठरवलं तेव्हा फोटोंना लॅमिनेशन करण्याचा खर्च वाचवण्यासाठी त्यांचं सगळं कुटुंब घरात लॅमिनेशन करत बसायचं. जणू काही विक्रोळीला कन्नमवार नगरात, कामगारवस्तीत असलेल्या त्यांच्या सव्वादोनशे फुटांच्या घरात हे सगळे फोटोच रहायचे आणि उरलेल्या जागेत घरातली माणसं! नंतर त्यांच्या एका मित्रानं फोटो प्रदर्शन ठेवायला जागा दिली. गंगेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या प्रवास मांडणारे फोटो काढायचे हा प्रकल्प म्हणून त्यांनी स्वतशीच ठरवला तेव्हा मुख्य प्रश्‍न होता पैशांचा. इतर कुणी मदत करेल का, एवढंच नाही तर अशी मदत करणारी लोकं असू शकतात, एनजीओ काढता येऊ शकते असं काहीही समोर नसताना केवळ आपली इच्छा म्हणून मुडशिंगीकर गंगेच्या खोऱ्यात जात राहिले. 2005 मधली गोष्ट. त्यांना बिहारमध्ये गंगेच्या काठावर होणाऱ्या छटपूजेचे फोटो काढायचे होते. नेहमीप्रमाणे हातात पैसे नव्हतेच. इकडे कंपनीत ले ऑफ जाहीर झालेला. दोन दोन, तीन तीन महिने पगार होत नव्हता. बरोबरच्या लोकांमध्ये उद्या नोकरीचं काय होणार ही चिंता तर मुडशिंगीकर पटण्याला जाण्यासाठी पाच-सहा हजार रूपये गोळा करण्यात गुंतलेले. बरोबरचे सहकारी म्हणत अरे, कंपनीत काय चाललंय आणि तू काय करतोयस? शेवटी त्यांनी हे काम करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली. ते म्हणतात, माझ्याकडे तर पैसे नसायचेच. मग मी तिकीट काढायचो आणि तिकडे पोहोचायचो. गंगेसाठी हे काम करतो आहे, हे सांगितलं की सामान्य लोक पैसे द्यायचे. सगळीकडे असणाऱ्या महाराष्ट्र मंडळांमध्ये जाऊन मी काय आणि का करतो ते सांगितलं की राहण्याची व्यवस्था तीनशे रूपयात असेल तर मला शंभर सव्वाशे रूपयात जागा मिळायची. क्रॉम्पटन ग्रीव्हजमधल्या वरिष्ठांनी बिनपगारी रजांच्या बाबतीत सगळ्या मर्यादा संपल्यावरही या प्रकल्पासाठी म्हणून सहकार्य केलं आहे. हे सगळं काम पुढे नेण्यासाठी त्यांनी आता "गंगाजल नेचर फाऊंडेशन' नावाची संस्था स्थापन केली आहे.गंगेला जशा अनेक नद्या येऊन मिळतात, तशी मुडशिंगीकरांच्या कामाशी अनेक लहानमोठी माणसं जोडली गेली असली तरी या सगळ्या डोलाऱ्याचा मुख्य खांब ते स्वतच आहेत. शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये गंगेच्या नितळ सौंदर्याचे, तसंच तिच्या प्रदूषणाच्या फोटोंची आजवर अनेक प्रदर्शनं मांडून त्यांनी नव्या पिढीला गंगेच्या समृध्द वारशाची तसंच तिच्या प्रदूषणाच्या प्रश्‍नांची जाणीव करून दिली आहे. सामान्य माणूस गंगेकडे धार्मिक, भावनिक दृष्टीने बघत असतो, त्याला गंगेच्या प्रदूषणाबाबत जागृत केलं पाहिजे, म्हणून ते फोटो प्रदर्शनाचा खटाटोप सतत मांडत राहतात. या सगळ्या कामासाठी त्यांनी बॅंकेकडे कर्ज मागितलं. पण गंगेचं सुंदर, मोहक रूपडं दाखवण्यासाठी बॅंका कर्ज द्यायला तयार आहेत, मात्र प्रदूषणाचा एकही फोटो दाखवायचा नाही, अशी त्यांची अट आहे. महाराष्ट्रातले राजकारणी त्यांना गंगा ही "आपली' नव्हे तर "त्यांची' नदी आहे, मग आपण कशाला पैसे द्यायचे, असं उत्तर देतात. तर उत्तर प्रदेशातले राजकारणी हा सगळा खटाटोप "आमच्याकड'ची माणसं करतील की त्यासाठी महाराष्ट्रातून कुणी कशाला यायला हवं, असं उत्तर देतात. तर अलाहाबादमधली एक संस्था म्हणते, हे सगळं फोटो प्रदर्शन आम्हाला विकत द्या. आणि तुम्ही या सगळ्या कामातून बाजूला व्हा, आम्ही ते पुढे नेऊ.यातला कोणताच पर्याय मुडशिंगीकरांना मान्य नाही. ते म्हणतात, गंगा सुंदर आहेच, पण ती कशी प्रदूषित झाली आहे, ते दाखवलं जाईल तेव्हाच तिचं सौंदर्य टिकवलं पाहिजे याचं गांभीर्य पटेल. आणि हे काम मी सुरू केलं आहे आणि मला त्याच्याशी जोडलेलं रहायचं आहे. निव्वळ कुणी पैसे देतं म्हणून मी यातून कसा बाजूला होऊ? हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. म्हणूनच येत्या पाच मार्चपासून मी आणि माझे काही मित्र गंगेच्या उगमापासून ते गंगासागरपर्यंत गंगेच्या फोटोंचं प्रदर्शन घेऊन फिरणार आहोत. गंगेच्या काठावर येणारे हजारो लोक रोज हे प्रदर्शन बघतील. आपण या प्रदूषणाला कळत-नकळत कसे हातभार लावतो हे त्यांच्या लक्षात येईल तेव्हा ते जागे होतील. या सगळ्या टप्प्यांवर आम्ही आमच्या पातळीवरून गंगा शुध्दीकरण शिबिरं भरवणार आहोत. या सगळ्या दरम्यानच्या गंगेच्या पाण्याचे नमुने घेऊन त्याच्या प्रदूषणाचा अहवाल सगळ्यात शेवटी सरकारला सादर केला जाणार आहे. गंगेच्या प्रदूषणाबद्दल आस्था असलेल्या सर्वसामान्य लोकांकडून मिळेल ती मदत घेऊन महिनाभराचा हा दौरा आहे. या दौऱ्यासाठी सामान्य माणसांनी जवळपास पाच लाखांचा आर्थिक हातभार लावला आहे.अनंत अडचणी, आर्थिक तोशीस असं सगळं असूनही विजय मुडशिंगीकर आपल्या या कामावर ठाम आहेत.का?ते म्हणतात, मला परत उभं तरी राहता येईल की नाही, अशी शंका होती अशा काळात मला मी इथे ओढला गेलो. आता या सगळ्या परिसरासाठी, गंगेसाठी काहीतरी करणं ही मला माझी जबाबदारी वाटते!
----
चौकट- 1भारतीय माणसाच्या दृष्टीनं गंगा ही फक्त जीवनदायिनी नदी नाही तर त्याच्या सगळ्या जन्मजन्माच्या फेऱ्यांशी जोडली गेलेली गंगामैय्या आहे. गोमुखपासून म्हणजे उगमापासून अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करून गंगा कोलकात्याजवळ गंगासागर इथं समुद्राला मिळते. या सगळ्या प्रवासात तिला जवळपास ऐंशी नद्या येऊन मिळत. सगळ्या नद्यांनी वाहून य गाळामुळे समृध्द झालेल्या गंगेच्या खोऱ्यावर आजही आपली चाळीस टक्के लोकसंख्या अलंबून आहे. गंगेचं आर्थिक, सामाजिक, धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन राजीव गांधींच्या काळात गंगा ऍक्‍शन प्लान आला. हरिद्वारला लावलेल्या फिल्ट्रेशन प्लान्टमुळे हरिद्वार ऋषिकेशला गंगेचं पाणी स्वच्छ आहे, पण खरा प्रश्‍न आहे, तो पुढेच. वाराणसीमध्ये घाटावर आंघोळ करायला, कपडे धुवायला, गायीम्हशी पाण्यात सोडायला बंदी आहे. आणि ती काटेकोरपणे पाळली जाते. पण त्याच नदीत शहराचं सांडपाणी सोडलं जातं, मुडशिंगीकर सांगतात. पुढे कानपूर पटण्याला तर शहराचं सांडपाणी, नदीच्या काठाकाठानं असलेल्या कारखान्यांमधलं रसायनमिश्रित पाणी या सगळ्यामुळे गंगेचं प्रदूषण वाढत गेलं आहे. चौकट-2गंगेच्या उगमापाशी म्हणजे गोमुखला श्रावण महिन्यात भरणाऱ्या कावड यात्रेवर आता उत्तरांचल सरकारनं पूर्ण बंदी आणली आहे. ही कावड यात्रा म्हणजे यात्रेकरू प्लास्टिकची कावड घेऊन गोमुखला जातात. तिथे ती विसर्जित करून नव्या कावडीमध्ये गंगाजल घेऊन त्याचा अभिषेक गावातल्या शंकराला करायचा अशी प्रथा. यात वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकमुळे या यात्रेवर बंदी आहे. आता गोमुखला फक्त गिर्याहोरकांनाच सोडलं जातं. तेही ते नेतील त्या वस्तूंची यादी करून. त्या वस्तू त्यांनी परत आणल्या हेही तपासलं जातं. गोमुखला होणारं प्रदूषण रोखण्यासाठी ही काळजी घेतली जाते.
----
वेबसाईट- http://www.gangagal.org.in/
vijaymudshingikar@gangajal.org.in

----

पूर्वप्रसिध्दी- सकाळ, सप्तरंग पुरवणी

कुतुहलांचा देश

केसरी टूर्सच्या "माय फेअर लेडी'बरोबर थायलंडला जायचं ठरलं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आठवला पुलंच्या "पूर्वरंग'मधला सयाम! भरपूर पाण्याचा, त्यामुळेच कालव्यांचा देश. दोन्ही हात जोडून ऱ्हदयापासून नमस्कार करणाऱ्या लोकांचा देश! त्याही पूर्वीचा "ऍना अँड द किंग ऑफ सयाम'मधल्या राजपुत्र महामोंगकूटचा देश! पिढ्यानपिढ्या गुलामगिरीत पिचलेल्या या देशात साधारण दीडशे वर्षांपूर्वी ऍना नावाची ब्रिटिश शिक्षिका राजघराण्यातल्या मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी येते. तिथली गुलामगिरी बघून तडफडते, कळवळते. पण त्याचबरोबर शांतपणे मुख्य राजपुत्राच्या, महामोंगकूटच्या मनावर समतेचे, बंधुतेचे संस्कार करते. दोन तीन वर्षात ती निघून जाते. पण तरूणपणी राजा बनल्यावर हाच महामोंगकूट एका फटक्‍यात कायद्यानं गुलामगिरी बंद करून टाकतो. एक साधी शिक्षिका एका देशाचं भवितव्यच कसं बदलून टाकू शकते हे सांगणाऱ्या या कादंबरीनं थायलंडबद्दल कुतुहल निर्माण करण्याचं काम चोख बजावलं होतं. प्रत्यक्ष थायलंडला गेल्यावरही हे कुतुहल पावलोपावली भेटत राहिलं. कधी तृतीयपंथीयांच्या गेली 28 वर्षे सुरू असलेल्या अल्काझार शोच्या रूपात. कधी वॉकिंग स्ट्रीटच्या रूपात. कधी खुलेआम चालणाऱ्या ऍडल्ट शोच्या रूपात. या देशाला स्त्रीदेहाच्या प्रदर्शनाचं, व्यापाराचं, त्यातून मिळणाऱ्या डॉलरचं जराही वावडं नाही, याचा अचंबा वाटावा, पट्टायात चालणारं सेक्‍स टुरिझमचं उघडंनागडं स्वरूप बघून डोकं आणि मन गरगरावं तर बॅंकाकमध्ये भलीमोठी, देखणी बुध्दमंदिरं समोर येतात. आपल्याकडे गणेशोत्सवात आणि एरवीही जसा गणपती वेगवेगळ्या लडिवाळ रूपात दिसतो तसाच यांचा बुध्दही. विश्रांती घेत असलेला, ध्यान लावून बसलेला, चालणारा आणि सोन्याचा बुध्द! वयाच्या विसाव्या वर्षी प्रत्येक थायी पुरूषाला एक वर्षभरासाठी बौध्द भिख्खू बनावं लागतं. आणि नंतरही संसाराचा, नोकरीबिकरीचा कंटाळा आला, विरक्‍त व्हावंसं वाटलं, तर तीन महिन्यांसाठी भिख्खू बनता येतं. त्यासाठी कायद्यानं तीन महिने भर पगारी सुट्टी मिळते.म्हणजे एकीकडे सेक्‍स टुरिझमसाठी विदेशी पर्यटकांना मखमली पायघड्या आणि दुसरीकडे तात्पुरत्या विरक्तीसाठी भरपगारी रजा!बॅंकॉकमधल्या गोल्डन बुध्दाची गोष्टही अशीच! दहा फूट उंच आणि साडेपाच टन किलो वजनाच्या या मूर्तीचं मूळ तेराव्या शतकापर्यंत जातं. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी थायलंडमधल्या अयुध्यावर बर्मी लोकांनी आक्रमण केलं. या आक्रमकांपासून मूर्तीचं रक्षण करण्यासाठी तत्कालीन भिख्खूंनी तिच्यावर मातीसदृश पण कठीण लिंपण केलं. ती मूर्ती बॅंकॉकला आणण्यात आली. 1955 मध्ये मूर्ती नवीन मोठ्या मंदिरात ठेवायची होती. त्यासाठी क्रेनमधून नेताना मूर्ती खाली पडली. हा अपशकून मानून मूर्ती वाहून नेणारे मजूर पळून गेले. रात्रभर मूर्ती तशीच पावसात पडून राहिली. दुसऱ्या दिवशी तिची परिस्थिती बघण्यासाठी आलेल्या भिख्खूंना दिसली ती पावसानं सगळं लिंपण वाहून गेल्यानंतरची लखलखीत सोन्याची मूर्ती! देवळात त्या मूर्तीसमोर बसून हे सगळं ऐकताना फक्त 55 वर्षांपूर्वी घडून गेलेलं हे सगळं अद्‌भूत तसंच्या तसं डोळ्यासमोर उभं राहतं. दगडमातीची म्हणून वाहून नेली जात असलेली मूर्ती अशी सोन्यानं झळाळत समोर आल्यावर त्या भिख्खूंच्या डोळ्यांत काय उमटलं असेल याची कल्पनाच केलेली बरी! थायलंड समोर येतो तो आपल्या देशात आलेल्या पर्यटकांना खूष करून टाकण्याचं व्रत घेतल्यासारखा. स्त्रीदेहापलीकडे ज्यांना निसर्ग, समाज- संस्कृतीबिंस्कृती अशा कशातच रस नाही, त्यांच्यासाठीचा थायलंड वेगळा. पण ज्यांना निसर्गाबरोबर समाधी लावायची आहे, त्यांच्यासाठी पांढरीशुभ्र वाळू आणि निळंशार पाणी असलेला कमालीचा नितळसुंदर समुद्र आहे. पर्यटनाच्या चौकटीत राहून ज्यांना साहस अनुभवायचं आहे, त्यांच्यासाठी पॅरासेलिंगचा, समुद्राखालचं अनोखं जग अनुभवण्याचा थरार आहे. जातीच्या खवय्यांसाठी जिभेचे चोचले पुरवणारं थायी कुझीन आहे. (त्यातही कुणाला वेगळेपणाचा आनंद चाखायचा असेल, तर आपल्याकडे गाडीवर वडापाव, भेळ विकली जाते, तसे वेगवेगळ्या प्रकारचे खारवलेले, तळलेले किडे आहेत.) जातीच्या शॉपिंगबहाद्दरांसाठी बॅंकॉकमधल्या बाजारपेठा ओसंडून वहात असतात. पट्टायामध्ये जगातली सर्वात मोठी हिरे- मोत्यांची शोरूम आहे. पण या शोरूममध्ये शिरण्याआधी एका लहानशा ट्रॉलीमधून एक दहा मिनिटांची सैर घडवून आणली जाते. हिऱ्यांच्या खाणीचा आभास निर्माण करून, हिरे कसे सापडतात, त्यांच्यावर कशी प्रक्रिया केली जाते, पैलू कसे पाडले जातात, ही सगळी प्रक्रिया दाखवून ती ट्रॉली आपल्याला सोडते ती हिरे मोत्यांच्या भव्य शोरूम मध्ये. या दहा मिनिटांच्या ट्रेलरसाठी जी वातावरणनिर्मिती केली आहे, तिच्यामुळे हिऱ्यामोत्यांच्या शोरूममधून तुम्ही आपोआपच काहीतरी मौल्यवान खरेदी करून बाहेर पडता. नोंग नूंच व्हिलेजमधला कल्चरल शो असो की हत्तींचा शो. सफारी वर्ल्ड मधला ओरांग ऊटांग शो, डॉल्फिन शो असो की स्टंटमॅन शो!हे सगळे शो तुम्हाला खिळवून ठेवतातच, पण ते सादर करताना कुठेही, थायी भाषेची कास सोडलेली नसते. शोच्या शेवटी इंग्रजीत त्याचा सारांश सांगितला जातो एवढंच. परक्‍यांच्या भाषेला आपलं मानण्यात आणि आपल्या भाषेला परकं करण्यात जगात आपला हात कुणीच धरू शकणार नाही हेच खरं!समुद्रावरचे थरारक खेळ असोत की जंगल सफारी, ते पाहताना वाटत होतं, आपल्याला किती विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला आहे, किल्ले आहेत, जंगलं, प्राणी, हवामान या सगळ्याचं आपल्याकडे किती वैविध्य आहे. आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्याही कमी नाही. पण या सगळ्याचं आपण काय करतो? मुद्दाम जंगलं निर्माण करून, देशाबाहेरून प्राणीपक्षी आणून सफारी वर्ल्ड निर्माण करायची आपल्याला गरज नाही की नोंग नूंचसारखं खेडं तयार करून पर्यटकांना रिझवण्याची आपल्याला काहीच गरज नाही. निसर्गानं, संस्कृतीनं आपल्याला उदंड हस्ते दिलं आहे. गरज आहे ती त्या सगळ्याचं नीट व्यवस्थापन करण्याची!
चौकट
केसरीची "माय फेअर लेडी' चार वर्षांपूर्वी झाली ती थायलंडमधून. "एखादं कुटुंब पर्यटनाला जातं, तेव्हा त्या कुटुंबातली बाई ही नवऱ्याला काय हवं नको, मुलांच्या गरजा यातच गुरफटलेली असते. ती खऱ्या अर्थानं पर्यटनाचा आनंद घेऊ शकत नाही. तिनंही पर्यटन एन्जॉय करावं म्हणून माय फेअर लेडीची कल्पना पुढे आली.' केसरी टूर्सच्या प्रमुख वीणा पाटील सांगतात. आता माय फेअर लेडी दरवर्षी थायलंडच्याच चार टूर करते. त्याशिवाय अमेरिका, इंग्लंडसाठीही माय फेअर लेडीला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आता माय फेअर लेडी देशांतर्गत टूरही करते आहे. "होम मिनिस्टर'चे आदेश बांदेकर माय फेअर लेडीचे ब्रॅंड ऍम्बॅसिटर आहेत. मार्च महिन्यात थायलंडला गेलेला माय फेअर लेडीचा ग्रुप 56 जणींचा होता. यात मायलेकींच्या, विहिणींच्या, नणंदभावजयांच्या जोड्या होत्या. काहीजणी तर मुलीनं, मुलान किंवा सुनेनं टूर गिफ्ट दिली म्हणून एकेकट्याच पहिल्यावहिल्या परदेशप्रवासासाठी आल्या होत्या. वयोगट पंचवीस वर्षापासून 75 वर्षांपर्यंत. ना रोजच्या स्वयंपाकाची कटकट, ना नवऱ्याची, मुलांची भूणभूण, ना रोजच्या रूटीनचा ससेमिरा... रोज नवनवीन गोष्टी बघायच्या, नवनवीन अनुभव घ्यायचे, हसायचं, नाचायचं, गायचं, पाण्यात डुंबायचं, हवेत उडायचं, पाण्याखालचं जग बघायचं... पट्टायात कमीत कमी कपड्यात वावरणाऱ्या स्त्रियांपासून रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या खारवलेल्या किड्यांपर्यंत सगळंच नवीन, वेगळं. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याचा अनुभव असो की आदेश बांदेकर यांच्या भाषेत सगळ्या माय फेअर लेडींचं "इंटरनॅशनल' फॅशन शोमध्ये कॅट वॉक असो, हे आठ दिवस या सगळ्या जणींना पुढची कित्येक वर्षे इतकी उर्जा देतात. जाताना विमानात "ऑरेंज ज्यूस या रेड वाईन' या एअर होस्टेसच्या प्रश्‍नाला एका सत्तरीच्या पुढच्या आजींनी "रेड वाईन' हे उत्तर दिलं आणि डोळे मिचकावून म्हणाल्या एकदा घेऊन बघायचीच होती कशी लागते ते! परतायच्या आदल्या दिवशी ग्रुपमधल्या एका मध्यमवयीन बाईंनी विचारलं, "मला तुमची जीन्स द्याल एक दिवस घालायला. कधीतरी घालून बघायची आहे.'आपल्या मनातल्या गोष्टी करून बघायला आपल्या बायकांना दुसरा देश गाठावा लागतो, हे आपल्या संस्कृतीचं अपयश मानायचं की "माय फेअर लेडी'चं यश?

Friday, January 29, 2010

मराठी आणि मराठीपणाच्या पलीकडेही!

कुणीतरी म्हटलंय, "रायटिंग इज व्हायोलन्स अगेन्स्ट मायसेल्फ'लिहिणं ही मी माझ्याविरुद्ध केलेली हिंसा असते. स्वतःचा शोध घेण्याची प्रक्रिया ही अशी हिंसकच असते. स्वतःला ओरबाडत, रक्तबंबाळ करत क्रूर थंडबुद्धीने केलेली. ती समजण्याची क्षमता जितकी जास्त तितकं येणारं वैफल्यही जास्त. "आदिमायेचे' मधला तरंगही अठ्ठाविसाव्या वर्षी स्वतःहून ओढवून घेतलेलं मरण दारात येऊन ठेपलेलं असताना स्वतःच्या नकळत स्वतःचा शोध घ्यायला लागतो आणि आपल्या हाताला लागते एक विलक्षण अशी शोधयात्रा. गरगरून टाकणारी माणसं, भोवंडून टाकणारा त्यांच्या जगण्याचा वेग आणि त्या सगळ्याला आवाक्‍यात घेणारी कमालीची रसरशीत, जिवंत, गोळीबंद भाषा. थेट अठ्ठावीस वर्षे वयाच्या ग्लोकल तरुणाची!लेखकाचं नाव राही. राही अनिल बर्वे. (या नावाचा उत्तरार्ध जाणकार मराठी वाचकांना चांगलाच परिचित आहे.) वय 28 वर्षे. एवढ्यातच त्याच्या नावावर "मांजा' नावाची आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेती फिल्म आहे. मुंबईत रस्त्यावर राहणाऱ्या बहीणभावंडांच्या आयुष्यावर असलेली ही फिल्म बघून "स्लमडॉग'चा दिग्दर्शक डॅनी बोएल कसा प्रभावित झाला त्याच्या गोष्टी इंटरनेटवर वाचायला मिळतात. डॅनी बोएलच्या ब्ल्यू रे डीव्हीडीसोबत "मांजा'ची डीव्हीडी दिली जाते. या 42 मिनिटांच्या फिल्ममध्ये चटका लावून जाणाऱ्या कथेसोबतच लक्षात राहतात ते देखण्या फ्रेम्समधले शॉर्टस्‌. एका मुलाखतीत राही म्हणतो, मांजाचं मूळ बजेट 24 लाखांचं होतं, 45 माणसं आणि 32 दिवसांची गरज होती. दोन वर्ष पैशांसाठी अथक परिश्रम करून हरल्यानंतर आम्ही सात जणांनी (त्यातले 3 अभिनेते) 60 हजारांत आणि नऊ दिवसांत बनवला. "मांजा'ला मिळालेलं यश म्हणजे "बिगिनर्स लक' असं म्हणत तो पुढच्या फिल्मच्या "तुंबाड'च्या तयारीलाही लागला आहे. "आदिमायेचे' हा त्याआधीचा टप्पा. त्याहीआधी पूर्णविरामानंतर हा कथासंग्रह. पण हा कथासंग्रह वाचून कुणी लेखकाबद्दल मत बनवायला जाईल, तर फसगत व्हायचीच शक्‍यता जास्त. कारण "पूर्णविरामानंतर' 11 वर्षांनी "आदिमायेचे' ही कादंबरी राहीनं लिहिली आहे. ही मरणाच्या दारात उभं राहून आपल्या अवघ्या 28 वर्षांच्या आयुष्याचा वेध घेऊ पाहणाऱ्या एका तरंग नावाच्या तरुणाची गोष्ट.तरंगचं सगळं आयुष्यच बेफाट. तशीच त्याच्या आयुष्यात असलेली माणसंही. नैतिकता-अनैतिकतेच्या समाजमान्य चौकटीच्या आसपासही न फिरणारी. त्यांच्या लेखी जगणंच इतकं महत्त्वाचं, की अशा कोणत्याही चौकटी संदर्भहीन ठराव्यात. कोणत्याही समाजात अशी माणसं असतातच. त्यांचं काय करायचं हे समाजाला कळत नसतं आणि समाजाचं काय करायचं हे त्या माणसांना वळत नसतं. त्यामुळे दोघंही एकमेकांना फाट्यावर मारत राहतात. तरंगच्या या आयुष्यात सगळी माणसं अशीच. वसुषेण मिथ्रिल, इंद्रदेव कोट्टीयन, अस्सल पारशी मेहरा, स्वामीनायकन या सगळ्या व्यक्तिरेखा आपल्याच समाजातल्या; पण आपल्या जगण्याच्या परिघापलीकडच्या. जाहिरातीसारखं क्षेत्र आपल्याला रोज दिसणारं; पण त्यात आत काय चालतं, त्याचे आंतरराष्ट्रीय लागेबांधे या सगळ्याशी तसा सामान्य मराठी समाज अनभिज्ञच. या सगळ्या माणसांमुळे, त्यांच्या जगण्यामुळे मराठी असूनही ही कादंबरी सुरुवातीपासूनच मराठीपणाच्या कक्षांपलीकडची आहे. ती मराठी आहे आणि तरीही मराठी नाही, हे तिचं वेगळेपण! दुसऱ्याचं दुख उमजण्याची क्षमता असलेला आणि त्यामुळेच वेदनेचा जन्मजात शाप घेऊन आलेला तरंग या सगळ्यातून भिरभिरत राहतो. आपलं मरण समोर दिसत असतानाही त्याला अप्रूप वाटत राहतं ते लाटांशी बिनदिक्कतपणे जीवघेणा खेळ खेळणाऱ्या इवल्याशा फुलपाखराचं. कारण तोही आपल्या आयुष्याशी असाच खेळला आहे. या कादंबरीची म्हणून सलग अशी "गोष्ट' नाही. तरंगला आठवत गेलेलं त्याचं आयुष्य हेच तिचं कथानक; पण त्या सगळ्याला ना काळाची म्हणून सुसूत्रता आहे, ना कथानकाची. तरंगच्या प्रत्येक सांगण्यात "बिटविन द लाईन्स'ही भरपूर. त्यामुळेच त्या शोधत, समजून घेत, लेखकानं मांडलेले भाषेचे खेळ अनुभवताना आपली पुरती दमछाक होते. राहीनं मात्र हे सगळे खेळ सहजपणे पेलले आहेत. या कादंबरीतून दिसणारा एक सामाजिक फरक नोंदवण्यासारखा आहे. तरंगला "जन्म दिलेला माणूस' आणि त्या माणसाच्या मित्रानं साठीच्या दशकात आपले कम्युनिस्ट मित्र सोबत घेऊन "गाय आमची माता आहे, तिची हत्या थांबवा' असं म्हणत गायीला घेऊन मोर्चे काढणाऱ्या संघ कार्यकर्त्यांच्या मोर्चात "म्हैस आमची मावशी आहे, तिचीही हत्या थांबवा' असं म्हणत म्हैस घेऊन सामील व्हायचा आचरटपणा केलेला असतो. तरंग आणि एकविसाव्या शतकातले त्याचे मित्र अशा सामाजिक पातळीवर जगतच नाहीत. त्यांचं सगळं जगणं व्यक्तिवादी आहे. आपल्या अव्यवहारी कम्युनिस्ट बापजाद्यांसारखा हमखास बुडण्यासाठीचे व्यवसाय ते करत नाहीत. ते नीट बिझनेस करतात. पैसा मिळवतात. आपल्या कर्तृत्वाने तो बुडवतात ही गोष्ट वेगळी. ही कादंबरी म्हणजे निव्वळ वेदनांचा प्रवास आहे. प्रत्येकाच्या वेदनेची जातकुळी वेगळी. त्यातही बाईच्या वाट्याला आलेल्या वेदना अधिक करूण. त्यांची अपरिहार्यता कळायला तिथं तरंगच बनायला हवं. आणि ती पोहोचवायला शब्द या माध्यमाची ताकद माहीत असणारा लेखक हवा. राही हा ती ताकद माहीत असलेला ताज्या दमाचा लेखक आहे.

Thursday, January 14, 2010

विद्यार्थी मित्रांनो, जगण्यात मजा आहे...---

एक तरूण एका मानसोपचारतज्ञांना भेटायला आला. तो शिकणारा विद्यार्थी होता. आपल्याला जगायचंच नाहीय असं त्याचं म्हणणं होतं. जगण्यात कसा अर्थ नाही ते तो पुन्हा पुन्हा सांगत होता. मी आज ना उद्या माझं जीवन संपवल्याशिवाय राहणार नाही.बोलता बोलता तो थांबला आणि टेबलवर असलेल्या पाण्याच्या ग्लासकडे बोट दाखवून म्हणाला, या ग्लासमध्ये अगदी काठोकाठ मीठ भरलं तर काय होईल? सॅच्युरेशन! तेच झालंय माझ्या आयुष्याचं. म्हणून मला जगायचं नाहीय.आपण आपली बाजू मांडताना केवढा चांगला युक्तिवाद केला अशा थाटात तो होता.मानसोपचारतज्ञ शांतपणे म्हणाले, पण हेच मीठ चांगल्या पिंपभर पाण्यात घातलं, वर साखर आणि लिंबू घातलं तर उत्तम सरबत होईल. कितीतरी तहानलेल्यांना ते थंडावा देईल!या युक्तिवादावर त्या तरूणाकडे उत्तर नव्हतं. कारण विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, जगण्याला उत्तर जगणं हेच असू शकतं.कारण खरी मजा जगण्यातच आहे. पर्ल बकच्या "द गुड अर्थ' मधला कोवळा चिनी शेतकरी तुम्हाला माहीत आहे का? किंवा मार्गारेट लंडनच्या "गॉन विथ द विंड'मधली एवढीशी स्कार्लेट ओ हारा?जगावं की मरावं असा प्रश्‍न पडावा अशी संकटं त्यांच्यावर येतात. पण एखादी दोरी घेऊन गळफास लावावा आणि सगळे प्रश्‍न एकदाचे संपवून टाकावेत हा "सोपा' पर्याय ते निवडत नाहीत. ते निवडतात जगण्याशी भिडण्याचा मार्ग. कधी थकतात. कधी थांबतात. कधी आनंदाच्या शिखरावर चढतात. पण ते लढतात.आपल्याकडेही जगण्याशी भिडणाऱ्यांची उदाहरणं काही कमी नाहीत. रामायण-महाभारतात राम- लक्ष्मणावर पांडवांवर आकाशच कोसळलं होतं, तेव्हा ते तुमच्याच वयाचे होते. शिवाजी महाराजांनी अशाच तुमच्यासारख्याच वयात हिंदवी स्वराज्याचा वसा घेतला आणि अवघ्या मुगल साम्राज्याला अंगावर घेतलं तेव्हा भावी संकटांचा किती ताण त्यांच्या मनावर असेल?देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात नंतर मोठी झालेली अनेकांनी आपल्या शालेय जीवनातच स्वतला इंग्रज राजवटीविरूध्द झोकून दिलं तेव्हा जगण्याचा सगळा ताण त्यांच्यावर असणारच की!तुम्हाला आवडणारे, क्रिकेटपटू घ्या, सिनेमातले हिरो घ्या. त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले ताणतणाव त्यांनी अनुभवलेले असतात. "टू बी ऑर नॉट टू बी' या प्रश्‍नाला तेही सामोरे गेलेले असतात. पण त्यांचं यश हेच असतं की मरावं का या प्रश्‍नाला त्यांनी "जगून बघावं' हेच उत्तर शोधलेलं असतं. दोस्त हो, जगणं सोपं नाही. ते अवघडच आहे. पण म्हणूनच त्याचं आव्हान स्वीकारण्यात खरी गंमत आहे. ही गंमत तुम्ही कधी अनुभवली आहे का?सचिन तेंडुलकरला जास्तीत जास्त रन काढायच्या असतात. पीचवर उभं राहिल्यावर येणारा त्याचा ताण आणि मग मनसोक्त सेंच्युरी मारल्यानंतर हलकं होणारं त्याचं मन... अभ्यासाचा तुम्हाला येणारा ताण आणि चांगले मार्क मिळाल्यावर खुलणारं हसू सचिनपेक्षा वेगळं असू शकतं का सांगा? आहे की नाही यात गंमत?यापेक्षाही जास्त गंमत आपल्या रोजच्या आयुष्यात आहे. फक्त आपल्याकडे बघायची नजर हवी. रोज उगवणारा सूर्य तोच. मावळणारा सूर्य तोच. तीच पूर्व दिशा, तीच पश्‍चिम. पण आपला दिवस मात्र रोज नवा. यात गंमत नाही?एकीकडे रोज सकाळी चिवचिवत येणाऱ्या चिमण्या, तर दुसरीकडे लाखो किलोमीटरचं अंतर कापून आपल्याला दर्शन द्यायला येणारे फ्लेमिंगो ही निसर्गाची किती मोठी गंमत आहे! आपण बटण दाबलं की उजेड पडतो, एक फोन हातात घेतला बोटांच्या टोकावर सगळी दुनिया असते. आपण टीव्ही लावला तर एका क्षणात जगाच्या कानाकोपऱ्यातला "आँखो देखा' समजून घेऊ शकतो. इंटरनेटवर जाऊन माहितीच्या महापुरात हरखून जाऊ शकतो. ही सगळी किती मजा आहे. जगण्यावर प्रेम असणाऱ्या माणसांनी आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीत जीव झोकून दिला. तहानभूक हरपून जगण्याचा शोध घेतला म्हणूनच हे सगळे शोध लागले. ग्रॅहम बेलनं जगण्याचा, अभ्यासाचा किंवा कोणताही ताण सहन होत नाही म्हणून आत्महत्येचा मार्ग निवडला असता तर आपण टेलिफोन आलाच नसता. आपल्याला या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचं कौतुक वाटतं. कवी लोकांना तर जमिनीचं कवच भेदून उगवणाऱ्या हिरव्या कौतुकाची, साध्या गवताच्या पात्याचीही मजा वाटते. अशा पहिल्यावहिल्या हिरव्या तृणपात्याचा सत्कार करायला ते उत्सुक असतात. तेव्हा सगळ्या ताणतणावांना झेलत, आव्हानांना सामोरं जात जगण्याला भिडा. दोस्तहो मनसोक्त जगा.हे सगळं जग खास तुमच्यासाठी आहे.तुम्हाला कुणी दिला आत्महत्या करायचा अधिकार?

Thursday, January 7, 2010

थ्री इडियट्‌स' आणि शहाणा लेखक

चेतन भगतच्या बाबतीत "आम के आम, गुठलियोंके भी दाम' ही म्हण सध्या अगदी फिट्ट बसणारी आहे. प्रसिद्ध झालेल्या तीनही पुस्तकांना तरुणांच्या पातळीवरून देशभर प्रचंड लोकप्रियता, डोळे फिरविणारे खपाचे आकडे, हे कमी म्हणून की काय त्यावरून बॉलीवूडमध्ये आमीर खानसारख्या कलाकाराला घेऊन निघणारा सिनेमा, विधू विनोद चोप्रासारखा निर्माता, राजकुमार हिरानीसारखा दिग्दर्शक, "थ्री इडियट्‌स'लाही प्रेक्षकांचा तुफानी प्रतिसाद आणि हे सगळं कमी आहे म्हणून की काय बॉलीवूडमध्ये नेहमीच पथ्यावर पडणारी कॉन्ट्रोव्हर्सी."थ्री इडियट्‌स'च्या श्रेयनामावलीत चेतन भगतच्या बाबतीत नेमकं काय झालं, ते जसजसं पुढे येत गेलं तसतशी सगळी सहानुभूती चेतनला मिळत जाणं अगदी साहजिक होतं. गेली चार-पाच वर्ष सतत चर्चेत असलेला हा भारतातल्या तरुणांचा आवडता, बेस्ट सेलर तरुण लेखक. आयआयटी दिल्ली आणि आयआयएमचा पदवीधर. आंतरराष्ट्रीय पातळीवरची बॅंकिंगच्या क्षेत्रातली नोकरी सोडून पूर्णवेळ लेखक बनायचं त्यानं ठरवलं आणि "फाइव्ह पॉइंट समवन, व्हॉट नॉट टू डू ऍट आयआयटी' ही त्याची पहिली कादंबरी आली. काहीशी आत्मचरित्रात्मक. वेगवगेळ्या पार्श्‍वभूमीतून आयआयटीत गेलेली तीन पोरं एकमेकांचे मित्र बनतात आणि आपल्या तिथल्या शिकण्याच्या काळात काय करतात त्याचं वर्णन करणारी ही धमाल कादंबरी तरुणांनी उचलून धरली नसती तरच आश्‍चर्य होतं. शिकण्यासाठी जिथं समाजातलं बुद्धिमत्तेचं "क्रीम' जमा होतं, असं आयआयटीसारखं ठिकाण असलं म्हणून काय झालं, तिथंही कॉलेज लाईफच्या बाबतीत इतर कॉलेजांपेक्षा फार वेगळं काही चालत नाही, हे अधोरेखित करीत "फाईव्ह पॉइंट'नं आयआयटीचं दारच जगाला उघडून दिलं. पुस्तक तुफान खपलं. पहिल्या पुस्तकानंच चेतनला तरुणांचा आयकॉन बनवलं. तो झपाटा ओसरायच्या आतच "वन नाईट ऍट कॉल सेंटर' आलं. प्रवासात लेखकाला एक तरुणी भेटते. वेळ घालविण्यासाठी दोघं गप्पा मारत असतात. ती त्याला एक गोष्ट सांगायला लागते. त्याआधी तिची अट असते, की त्या गोष्टीवर त्यानं आपलं दुसरं पुस्तक लिहिलं पाहिजे. त्याला ही अट थोडी खटकते; पण तरीही जातिवंत लेखकाप्रमाणे तो तिची गोष्ट ऐकायचं कबूल करतो. एका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या सहा जणांची गोष्ट ती सांगायला लागते. त्यांना त्या कॉल सेंटरमध्ये काम करीत असताना एका रात्री एक फोन येतो. थेट देवाकडून. त्याची गोष्ट म्हणजे वन नाईट ऍट कॉल सेंटर. आजच्या तरुणांची भाषा बोलणारं, त्यांच्या विश्‍वाबद्दल सांगणारं हे पुस्तकही तरुणांनी डोक्‍यावर घेतलं."द थ्री मिस्टेक्‍स ऑफ माय लाईफ' हे चौथं पुस्तक चेतननं लिहिलं. अहमदाबादमध्ये गोविंद नावाचा तरुण आपल्या दोन मित्रांसह खेळाचं साहित्य विकणारं दुकान सुरू करतो. त्यांना पैसे मिळवायचे असतात. यशस्वी व्हायचं असतं; पण ते काही सहजसोपं नसतं. भूकंप होतो, गुजरात दंगल होते, प्रेम प्रकरण आडवं येतं. मित्रांमध्ये समज - गैरसमज होतात. या सगळ्याचा खोलवर परिणाम होत त्यांच्या स्वप्नाचा प्रवास सुरू राहतो. त्याची गोष्ट म्हणजे "द थ्री मिस्टेक्‍स ऑफ माय लाईफ'. "टू स्टेटस- द स्टोरी ऑफ माय मॅरेज' हे चेतनचं चौथं पुस्तक आहे. पहिल्या पुस्तकाप्रमाणेच तेही आत्मचरित्रात्मक आहे. धर्म, जात, वंश, राज्य, भाषा अशा सगळ्या गोष्टींत विविधता असणाऱ्या भारतासारख्या देशात लव्ह मॅरेज करताना मुलगा-मुलगी एकमेकांना आवडले एवढंच पुरेसं नसतं. दोघांच्या घरातल्या लोकांनाही ते आवडावे लागतात. क्रिश आणि अनन्या यांच्या घरांतूनही विरोध असतो. तरीही ते लग्न करतात आणि सगळ्या संघर्षाला कसे तोंड देतात, त्याची धमाल या पुस्तकात आहे. चेतनच्या या पुस्तकालाही तरुणांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. त्याला "थ्री इडियट्‌स'मुळे निर्माण झालेल्या वादंगाचीही पार्श्‍वभूमी आहे. त्याच्या "वन नाईट ऍट कॉल सेंटर' या कादंबरीवरून हॅलो नावाचा सिनेमा आला होता. त्या सिनेमाचं स्क्रिप्टही चेतननंच लिहिलं होतं. तो सिनेमा व्यावसायिकदृष्ट्या फारसा यशस्वी झाला नाही; पण "फाईव्ह पॉइंट समवन'वरचा "थ्री इडियट्‌स' मात्र निर्मिती प्रक्रियेपासूनच चर्चेत होता. आता निर्मात्या, दिग्दर्शकाबरोबरच्या वादंगाची फोडणी त्याला मिळाली आहे. त्याचा सगळ्यात जास्त फायदा अर्थातच चेतनलाच होतो आहे. कारण- एक तर तो तरुणांचा आयकॉन ठरलेला, गेली काही वर्षे चर्चेत असलेला लेखक आहे. भारतातला आजवरचा सर्वाधिक खपाचा इंग्रजी कादंबरीकार असं "न्यूयॉर्क टाइम्स'नं त्याचं वर्णन केलं आहे. यावरून चेतनच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल. "फाइव्ह पॉईंट समवन'वरून प्रेरणा घेऊन एखादा सिनेमा काढला जात असेल, तर लेखकाचं जे असेल ते श्रेय त्याला द्यायलाचं हवं, असंच जनमत आहे. चेतननं या विषयावर त्याच्या ब्लॉगवर लिहिलेल्या लेखांना ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत, त्यावरून हाच सूर आहे. ैया सगळ्याबद्दल चेतन त्याच्या ब्लॉगवर लिहितो, थ्री इडियट्‌स हा सिनेमा कादंबरीवर आधारित आहे, असं म्हटलं जातं तेव्हा तो सिनेमा कादंबरीपासून वेगळा कसा होऊ शकतो? राजकुमार हिरानी आणि अभिजात जोशी दोघांनीही सिनेमाची पटकथा लिहिली आहे; पण, सिनेमाची स्टोरी मूळ त्यांची नाही हे ते का लपवून ठेवत आहेत? त्यांनी माझ्या स्टोरीवर आधारित सिनेमा बनवला आहे; नवीन स्टोरी तयार केलेली नाही. मग त्यांनी माझं श्रेय का नाकारावं? माझं म्हणणं इतकंच आहे, की लेखकाच्या श्रेयनामावलीत माझंही नाव द्या.चेतनचे मुद्दे कुणालाही पटतील असेच आहेत. कादंबरीचे हक्क विकले, तसं कॉन्ट्रॅक्‍ट केलेलं असलं तरी लेखकाला त्याचं श्रेय मिळायलाच हवं. चेतनसाठी जमेची बाजू म्हणजे आज सगळी तरुणाई त्याच्या बाजूनं आहे. नैतिक लढाई त्यानं जिंकल्यातच जमा आहे.हा सगळा वादविवाद बाजूला ठेवला आणि निव्वळ लेखक म्हणून चेतन भगत कसा आहे? चेतन वर्तमानकाळाचा लेखक आहे. तो आजच्या, आत्ताच्या विषयांना भिडतो. तो तरुण असल्यानं त्याचे विषयही तरुणांचे असतात. त्यामुळे कॉलेजजीवन, कॉल सेंटर, बिझनेस करणं आणि त्या सगळ्यातून येणारे अनुभव तो मांडतो. त्याच्या लिखाणात एक प्रकारचा सच्चेपणा आहे. त्याची पात्रं याच मातीतून जन्मलेली, इथलीच असतात. साधी सोपी, प्रवाही इंग्रजी ही तर त्याची सर्वांत मोठी जमेची बाजू आहे. त्याची भाषा गोष्टीवेल्हाळ, वर्णनात्मक आहे. माणसाबद्दलचं अपार कुतूहल, जगण्यातल्या विसंगतीतून निर्माण होणारा विनोद आणि चेतन त्यातून टिपतो ते कारुण्य यामुळे त्याच्या कादंबऱ्या वेगळ्या ठरतात. लेखकाकडे असावी लागते ती करुणा चेतनकडे नक्कीच आहे. मनोरंजन हे आपल्या कादंबरीलिखाणाचं महत्त्वाचं मूल्य आहे हे त्यालाही मान्य आहे. पुस्तक, सिनेमा हे मनोरंजनासाठी असतात. मला जे गंभीरपणे सांगायचं असतं, त्यासाठी मी स्तंभलेखन करतो, असंही तो सांगतो. (चेतनबाबत काही गमतीशीर निरीक्षणंही आहेत. त्याच्या एका तरी पात्राचं नाव श्रीकृष्णाशी संबंधित म्हणजे गोविंद, हरी, श्‍याम असतं. त्याच्या प्रत्येक कादंबरीच्या नावात एक तरी अंक असतो. उदा. फाइव्ह पॉईंट समवन, वन नाईट ऍट कॉल सेंटर, थ्री मिस्टेक्‍स ऑफ माय लाईफ इत्यादी. त्याबद्दल चेतन म्हणतो. शेवटी मी एक बॅंकर आहे. आकडे माझ्या डोक्‍यातून जातच नाहीत. असो!)वेबसाईट, ब्लॉग, ट्‌विटर अशा आजच्या काळातल्या संपर्कमाध्यमांचा तो पुरेपूर वापर करतो. ट्‌विटरवर तर चेतनचे 27,000 फॉलोअर्स आहेत. पायरेटेड पुस्तकं घ्यावीत की नाही या मुद्द्यावरून अलीकडेच त्याचा ट्‌विटरवर त्याच्या दोन वाचकांशी घनघोर वाद झाला. चेतननं चिडून त्यांचे ट्‌विट्‌स ब्लॉक करण्यापर्यंत मजल गेली होती. चेतन भगतच्या लिखाणाला नाकं मुरडणारे, त्याला निव्वळ "पॉप्युलर' लेखकांच्या पंक्तीत बसविणारेही आहेत; पण पहिल्याच पुस्तकानं तरुणांचा आयकॉन बनलेला चेतन आता या सगळ्यांच्या पलीकडे पोचला आहे.

आलाप चित्रांमधले!

चित्रकाराचं नाव होतं, यशोवर्धन. कुठेतरी माहिती वाचली होती की तो कुमार गंधर्वांचा मुलगा. पण तसलं काहीही डोक्‍यात न राहता निव्वळ चित्रं बघायची म्हणून त्याची चित्रं बघायला गेले. तो रंगरेषांचा, लयीचा, नादाचा, तालाचा उत्सव होता. जाणवणारही नाहीत असे रंग, नृत्यांगनेची लय पकडणाऱ्या मोजक्‍या रेषा... एकेका चित्रावरून नजर फिरत नव्हती. नृत्यांगनेच्या गिरकीचं चित्रं... गिरकी कधी पकडता येते का? पण त्या गिरकीनं निर्माण झालेली लय तर पकडता येते... हे कधीच लक्षात कसं आलं नाही? कोणतीही हालचाल बाई लयबध्द करते तर पुरूषाच्या हालचालीत आवेश असतो. त्यामुळे तिच्या उठण्याबसण्यात नाजूकपणा तर त्याच्या वागण्यासवरण्यात ताकद. यशोवर्धननं हे सगळं नेमकं पकडलं होतं. नुसतंच पकडलं नव्हतं तर जाणवून दिलं होतं. आणि हे जाणवून देणंही कसं तर त्यातली तरलता मनात रेंगाळत राहील असं. कॅनव्हासवर अवतरलेली ही चित्रं, चित्रं नाहीतच. चित्रकाराच्या मनात चाललेला रंगरेषांचा खेळच तो. कागदावर तो जेवढा उतरला त्याच्या कितीतर पट तरलतेने त्याच्या मनात रंगला असेल. एक चित्र पहावं, तिथेच थबकावं तर वाटतं हातात काहीतरी सापडतंय...आणि पुढे जावं तर काहीतरी निसटल्याची भावना. पण निसटलं तरी कसं म्हणायचं? कारण पुढेही तितकंच तरल काहीतरी आहेच...फिगरेटिव्ह आणि ऍब्सर्डिटीच्या मधलं काहीतरी... कळतंयही पण कळतही नाही... सापडतंय पण सापडतंही नाही! गिरकी घेणारी नृत्यांगना, तिच्याभोवतीची वलयं हे सगळं पुन्हापुन्हा कुठेतरी ओळखीचं वाटतंय. पण त्यात काय ओळखीचं आहे ते शोधताना अचानक मनात कुठेतरी निनादले ते कुमारजींचे आलाप. त्या सगळ्या गिरक्‍यांमध्ये, त्या चित्रांमधल्या वलयांमध्येही आलाप होते. कुमारजींच्या आलापांनी कानांभोवती रिंगण घातलं होतं, तर या आलापांनी नजरेभोवती रिंगण घातलं. त्यांनी सुरांना नृत्य करायला लावलं होतं. यशोवर्धननं रंगरेषांना नृत्याच्या माध्यमातून आलाप घ्यायला लावले आहेत.