Thursday, January 7, 2010

आलाप चित्रांमधले!

चित्रकाराचं नाव होतं, यशोवर्धन. कुठेतरी माहिती वाचली होती की तो कुमार गंधर्वांचा मुलगा. पण तसलं काहीही डोक्‍यात न राहता निव्वळ चित्रं बघायची म्हणून त्याची चित्रं बघायला गेले. तो रंगरेषांचा, लयीचा, नादाचा, तालाचा उत्सव होता. जाणवणारही नाहीत असे रंग, नृत्यांगनेची लय पकडणाऱ्या मोजक्‍या रेषा... एकेका चित्रावरून नजर फिरत नव्हती. नृत्यांगनेच्या गिरकीचं चित्रं... गिरकी कधी पकडता येते का? पण त्या गिरकीनं निर्माण झालेली लय तर पकडता येते... हे कधीच लक्षात कसं आलं नाही? कोणतीही हालचाल बाई लयबध्द करते तर पुरूषाच्या हालचालीत आवेश असतो. त्यामुळे तिच्या उठण्याबसण्यात नाजूकपणा तर त्याच्या वागण्यासवरण्यात ताकद. यशोवर्धननं हे सगळं नेमकं पकडलं होतं. नुसतंच पकडलं नव्हतं तर जाणवून दिलं होतं. आणि हे जाणवून देणंही कसं तर त्यातली तरलता मनात रेंगाळत राहील असं. कॅनव्हासवर अवतरलेली ही चित्रं, चित्रं नाहीतच. चित्रकाराच्या मनात चाललेला रंगरेषांचा खेळच तो. कागदावर तो जेवढा उतरला त्याच्या कितीतर पट तरलतेने त्याच्या मनात रंगला असेल. एक चित्र पहावं, तिथेच थबकावं तर वाटतं हातात काहीतरी सापडतंय...आणि पुढे जावं तर काहीतरी निसटल्याची भावना. पण निसटलं तरी कसं म्हणायचं? कारण पुढेही तितकंच तरल काहीतरी आहेच...फिगरेटिव्ह आणि ऍब्सर्डिटीच्या मधलं काहीतरी... कळतंयही पण कळतही नाही... सापडतंय पण सापडतंही नाही! गिरकी घेणारी नृत्यांगना, तिच्याभोवतीची वलयं हे सगळं पुन्हापुन्हा कुठेतरी ओळखीचं वाटतंय. पण त्यात काय ओळखीचं आहे ते शोधताना अचानक मनात कुठेतरी निनादले ते कुमारजींचे आलाप. त्या सगळ्या गिरक्‍यांमध्ये, त्या चित्रांमधल्या वलयांमध्येही आलाप होते. कुमारजींच्या आलापांनी कानांभोवती रिंगण घातलं होतं, तर या आलापांनी नजरेभोवती रिंगण घातलं. त्यांनी सुरांना नृत्य करायला लावलं होतं. यशोवर्धननं रंगरेषांना नृत्याच्या माध्यमातून आलाप घ्यायला लावले आहेत.

No comments:

Post a Comment