Friday, January 28, 2011

भाषेवर प्रेम करा, शेजाऱ्यांच्याही!

अ गदी शेजारच्या कर्नाटकात, गुजरातेत किंवा आंध्रात गेलो की आपण शब्दशः अक्षरशत्रू ठरतो. हीच परिस्थिती आपल्या देशातल्या इतर राज्यांमधल्या लोकांचीही असते. पण आपण हे विसरतो की जेव्हा दळणवळणाची कोणतीही आधुनिक साधनं नव्हती, तेव्हाही लोक प्रवास करीत आणि भाषेच्या अडचणीवर मात करीत. कसे?
---

का नडीने केला मराठी भ्रतार, एकाचे उत्तर एका नये, हे आपण ऐकलेलं असतं. अशीच एक गमतीशीर गोष्टही आहे. कानडी मुलीशी लग्न झाल्यावर मराठी नवरा मजलदरमजल करीत तिच्याबरोबर आपल्या गावी यायला निघतो. वाटेत कुठलं तरी गाव लागतं. ती विचारते, "यल्ली मेली?' म्हणजे कुठलं गाव आलंय हे? त्याला वाटलं, या गावात राहणारी यल्ली नावाची कुणी बहीण-मैत्रीण मरण पावली असं ती सांगतेय. तो हात वर करून म्हणतो, "हरिसत्ता!' तिला वाटतं, हरी हा आपला भाऊ, मरण पावलाय असं तो सांगतोय.
ती रडायला लागते. म्हणून तोही रडायला लागतो.

आपल्या शेजारच्या कर्नाटक, आंध्र, गुजरात या तिन्ही राज्यांच्या बाबतीत आपलीही हीच गत होऊ शकते. आपलीच कशाला? प्रत्येक भारतीय माणसाची हीच परिस्थिती आहे. आपल्याला आपली मातृभाषा, बऱ्या प्रमाणात हिंदी आणि कामचलाऊ का होईना; इंग्लिश येत असलं तरी अगदी आपल्या शेजारच्याच राज्यात गेल्यास आपण पार अक्षरशत्रू होऊन जातो.

याला कारण आहे, दर राज्यागणिक बदलणारी तिथली भाषा. इकडून तिकडे जाणाऱ्यांना ती अडचणीची वाटत असली तरी भाषांची आपल्याकडची ही विविधता तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. जगात कोणत्याही देशाकडे इतकी भाषिक समृद्धी नाही.
आपल्याकडे घटनेने राज्यव्यवहाराची भाषा म्हणून मान्यता दिलेल्या अधिकृत भाषाच 22 आहेत. त्यातल्याही 18 भाषा जवळ जवळ 96 टक्के लोक बोलतात. त्यामध्ये आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, काश्‍मिरी, कन्नड, कोकणी, मल्याळी, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, सिंधी, तमीळ, तेलगू, उर्दू या भाषांचा समावेश आहे. त्याशिवाय 1991 च्या जनगणनेनुसार 1576 भाषा या मातृभाषा आहेत.
या सगळ्या भाषांमध्येही हिंदी ही सगळ्यात जास्त लोकांची मातृभाषा आहे. मध्य आणि उत्तर भारत तर हिंदी बेल्ट म्हणूनच ओळखला जातो. त्याशिवाय ती बिहार, छत्तीसगड, दिल्ली, हरियाना, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तरांचल यांची राज्यभाषा आहे.

अर्थात ही सगळी व्यवस्था म्हणजेच भाषावार प्रांतरचना निर्माण झाली, ती स्वातंत्र्यानंतर. ब्रिटिश येण्यापूर्वी भारत नावाचा देश अस्तित्वात होता. पण भारत नावाचं राष्ट्र अस्तित्वात नव्हतं. लहान लहान राज्यंही एक प्रकारे लहान लहान राजवटीच होत्या. राजवटीनुसार राज्यव्यवस्था वेगळी, भाषा वेगळ्या, संस्कृती वेगळी, ब्रिटिशांनी हे सगळं एकत्र आणून "नेशन- स्टेट'ची उभारणी केली. आज दिसतात त्या वेगवेगळ्या भाषा त्यापूर्वीही होत्या, आपापल्या भाषेपलीकडे दुसरी भाषा न येणारे लोक तीर्थाटनासाठी देशभर फिरत. मग ते या प्रवासात भाषेचे काय करीत?

या प्रश्‍नाचं एक उत्तर कन्नड कादंबरीकार भैरप्पा यांच्या "सार्थ' नावाच्या कादंबरीत सापडतं. ही सहाव्या-सातव्या दशकाच्या पार्श्‍वभूमीवरची कादंबरी आहे. त्यातून असं दिसतं की तीर्थाटनाला जाणारे लोक व्यापाऱ्यांच्या तांड्याबरोबर प्रवास करीत. या व्यापाऱ्यांची स्वतंत्र संरक्षण व्यवस्था असे, त्यांच्याबरोबर दुभाषे असत. मुक्कामाची काही समाईक ठिकाणं असत. तिथं थांबून आपल्याला हव्या त्या दिशेने जाणाऱ्या तांड्याची वाट बघितली जाई. वेगवेगळ्या राज्यांमधून फिरताना येणारा भाषेचा प्रश्‍न सोडविण्याचा हा त्या काळातला मार्ग असू शकतो.

या सगळ्याचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे आज भाषांवरून सुरू असलेला अंतर्गत संघर्ष. द्रविडी भाषांचा हिंदीवर राग आहे. उरिया भाषेला बंगालीचं अतिक्रमण खुपतं. मराठीला हिंदीवाल्यांना हाकलून द्यायचंय. आसामी लोकांना बिहारीचं वाढतं अतिक्रमण थोपवायचंय. या सगळ्यामागची कारणं बहुतेकदा आर्थिक आहेत. पण त्यांना तोंड देताना इतर भाषांचाही द्वेष करण्याची मानसिकता वाढते आहे. आज आपली विचारसरणी एकवेळ इंग्रजी चालेल; पण या आपल्याच देशातल्या भाषा नकोत अशी होत चालली आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये समूहांच्या अस्मिता टोकदार होत जातात. भाषा हे तर अस्मितेचं रोजच्या जीवनात थेट सामोरं येणारं प्रतीक. त्यामुळे भाषेबद्दलची आक्रमकता वाढते आहे. पण आपल्या भाषेवर प्रेम करायचं म्हणजे इतर भाषांचा द्वेष करायचा का?

आज आपण देश रेल्वेमार्गांनी जोडला आहे वगैरे भाषा करतो. पण पूर्वी आधुनिकतेची अशी कोणतीच साधनं नव्हती आणि तरीही आपला देश जोडला गेला होता. तो जोडणारे धागे सांस्कृतिक होते आणि ते न दिसणारे होते. संत नामदेव तीर्थयात्रा करीत पंजाबात गेले आणि तिथे त्यांचे अभंग आजही गायले जातात. हे वाहतुकीची, संवादाची आजच्यासारखी कोणतीही साधनं नसताना घडू शकलं, ते या अदृश्‍य सांस्कृतिक धाग्यांमुळेच. भाषेवरून राजकारण करणारे कधीतरी इतिहास असा समजून घेतील?

तुही मातृभाषा कंची?

आईकडून मिळते ती भाषा म्हणजे मातृभाषा ही मातृभाषेची सहजसोपी व्याख्या; पण गेल्या वीसेक वर्षात मातृभाषेबद्दलचे अनेक प्रश्‍न पुढे आले आहेत.
---
बिरबल बादशहाची एक गोष्ट आहे. बादशहाकडे एक विद्वान येतो. त्याला एकाच वेळी पाच-सात भाषा येत असतात. या सगळ्याच भाषा तो इतक्‍या अस्खलित बोलत असतो, की यातली माझी मातृभाषा कोणती ते ओळखून दाखवा, असं त्याचं आव्हान असतं. त्याला येणाऱ्या सगळ्या भाषा जाणणाऱ्या विद्वानांना बोलावलं जातं. त्याच्या भाषाज्ञानापुढे हे विद्वानही हात टेकतात. आता काय करायचं? दरबारातल्या कुणालाही त्याची मातृभाषा ओळखून दाखवण्याचं आव्हान पेलता आलं नाही, तर बादशहाची नाचक्की होणार. बादशहा अपेक्षेने बिरबलाकडे पाहतो. बिरबल एक युक्ती करतो. एका सेवकाला बोलवून त्या विद्वानाच्या पाठीवर चाबकाचा एक फटका द्यायला सांगतो. तो फटका बसल्याक्षणी तो विद्वान ओरडतो. हीच याची मातृभाषा, बिरबल सांगतो.
000000
आपल्या देशासारख्या सामाजिक, सांस्कृतिक पातळीवर वैविध्य आणि तितकीच गुंतागुंत असलेल्या देशात तर मातृभाषा हा प्रश्‍न आणखीनच गुंतागुंतीचा आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे एकेकाळचे माध्यम सल्लागार शारदा प्रसाद यांनी 2001 मध्ये झालेल्या जनगणनेसंदर्भात एक लेख लिहिला होता. त्या लेखात ते म्हणतात, माझी मातृभाषा कन्नड, माझ्या पत्नीची मातृभाषा तेलुगु, आमची मुलं वाढली दिल्लीत, शिकली तिथल्याच आसपासच्या शाळांमध्ये. हिंदी आणि इंग्लिश याच भाषा त्यांच्या कानावर पडल्या. शिकवल्या गेल्या. त्यांच्या शालेय शिक्षणात त्यांचा कुठेही आमच्या म्हणजे आई-वडिलांच्या मातृभाषेचा संबंध आला नाही. त्यामुळे जनगणनेत मातृभाषा कोणती, हा प्रश्‍न आला तेव्हा मुलांची मातृभाषा हिंदी अशीच नोंदवली गेली.
त्यांच्या मुलांची मातृभाषा खरोखरच हिंदी असू शकते का?
000
मातृभाषा म्हणजे काय, या प्रश्‍नाचं ढोबळमानाने उत्तर आई बोलते ती भाषा. ते जास्त व्यापक केलं तर आई-वडिलांची म्हणजेच त्या घरात बोलली जाते, ती भाषा असं म्हणता येईल. एकेकाळी आपल्याकडे लोकांची मोबिलिटी कमी होती. नोकरीव्यवसायानिमित्ताने या राज्यातून त्या राज्यात जाऊन स्थिरस्थावर होण्याचं प्रमाण तुलनेत कमी होतं. गेल्या वीस वर्षांत हे प्रमाण विशेषतः आयटीवाल्यांमुळे प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. वेगवेगळ्या दोन राज्यांतले तरुण-तरुणी तिसऱ्याच राज्यात भेटतात, लग्न करतात, तिथेच स्थायिक होतात. त्यांच्या घरात त्या राज्यातली भाषा बोलली जात नसते, त्या दोघांनाही एकमेकांची मूळ भाषा येत नसते. परिणामी घरात सामाईक भाषा हिंदी किंवा इंग्रजी बोलली जाते. तीच त्यांच्या मुलांचीही भाषा बनते; पण ती त्यांची मातृभाषा म्हणायची का?
000
मातृभाषा या संकल्पनेचं सांख्यिक महत्त्व आपल्याकडे लक्षात आलं ते जनगणनेमुळे. 1961 साली झालेल्या जनगणनेत मातृभाषेसंदर्भातले प्रश्‍न विचारले गेले. ही जनगणना करताना ती करणाऱ्या प्रगणकांना लोक मातृभाषेबाबत सांगतील ती माहिती तशीच उतरवून घ्यायला सांगितलं गेलं होतं. त्या माहितीवर प्रगणकांनी आपल्या ज्ञानानुसार कोणतेही संस्कार करायचे नव्हते. गंमत म्हणजे लोकांनी जात, धर्म, व्यवसाय, गाव यांची नावं मातृभाषा म्हणून सांगितली. या जनगणनेत मिळालेल्या माहितीचं संकलन, विश्‍लेषण केलं गेलं. त्यातून असं पुढे आलं की आपल्या देशात 1652 मातृभाषा बोलल्या जातात. या सगळ्याच भाषांना लिपी आहे, असं नाही. त्याशिवाय जवळपास 400 भाषा बोलल्या जातात. या सगळ्या भाषांचं इंडो आर्यन, द्राविडीयन, ऑस्ट्रिक, तिबेटो-बर्मन या चार प्रमुख भाषाकुलांमध्ये वर्गीकरण केलं गेलं आहे.
000
2001 च्या जनगणनेमध्ये लोकांना मातृभाषेचं नाव आणि येत असलेल्या इतर भाषांची नावं हे नवे प्रश्‍न विचारले गेले. या जनगणनेमध्ये मातृभाषेची व्याख्या लहानपणी त्या व्यक्तीची आई तिच्याशी ज्या भाषेत बोलली असेल ती भाषा, असं करण्यात आलं आहे. त्या व्यक्तीची आई लहानपणीच मरण पावली असेल तर कुटुंबात बोलली जाणारी भाषा ही त्या व्यक्तीची मातृभाषा मानली गेली आहे. बोलू न शकणारी, तान्ही मुलं, मतिमंद तसंच मुक्‍या बहिऱ्या व्यक्तींच्या बाबतीतही तिच्या आईची भाषा ही तिची भाषा मानली गेली आहे. कुटुंबात आई-वडिलांची भाषा वेगवेगळी असेल, तर त्या दोन्ही भाषा मातृभाषा म्हणून नोंदवल्या गेल्या आहेत.
000
म्हणूनच मातृभाषेबद्दल आजच्या काळात अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. उदाहरणार्थ, आई-वडील मराठी आहेत आणि ते मुलांशी इंग्रजीतच बोलतात तर त्या मुलाची भाषा कोणती धरायची? आईची मातृभाषा अहिराणी आणि वडिलांची कोकणी असेल, ते मुलांशी कधी अहिराणीत कधी कोकणीत तर कधी प्रमाण मराठीत बोलत असतील तर मुलांची मातृभाषा कोणती? आईची भाषा बंगाली, वडिलांची उरिया आणि त्यांनी मुलांना त्या दोन्ही भाषा शिकवल्या आहेत, तर त्या मुलांची मातृभाषा कोणती? एका व्यक्तीच्या दोन दोन मातृभाषा असू शकतात का? आई-वडिलांची दोघांचीही मातृभाषा तेलुगु, ते दोघंही मुंबईत वाढल्यामुळे त्यांना तेलुगु येत नसेल तर त्यांची मुलं आपली मातृभाषा तेलुगु असल्याचा दावा करू शकतील का? वेगवेगळ्या राज्यांमधली मुस्लिम कुटुंबं आपली मातृभाषा उर्दू असल्याचं सांगत असतील तर? जात, धर्म, व्यवसाय, प्रदेश यावरून मातृभाषा ठरवता येते का?

Monday, January 3, 2011

आपलं भाषावैभव!

बहुविध भाषा, त्यांच्या अस्मिता, संस्कृती हे सगळं आपलं भाषावैभव. आपलं सांस्कृतिक संचित; पण आज थोड्याफार फरकाने सगळ्याच भारतीय भाषांपुढे अस्तित्वाचा प्रश्‍न उभा राहिला आहे. भाषा टिकविण्याची ही लढाई आपण सगळ्यांनीच लढायची आहे.

मुंबई-पुणे प्रवासात सूरज नावाचा एक मुलगा भेटला. असेल पंचविशीचा. एका आयटी कंपनीत नोकरी करत होता. तीन-चार महिने इंग्लंडमध्ये, तीन-चार महिने अमेरिकेत, तीन-चार महिने भारतात अशी त्याची भ्रमंती चालायची. तो होता मूळचा ओरिसाचा. उडिया ही त्याची मातृभाषा. कॉन्व्हेंटमध्ये शिकल्यामुळे इंग्रजी व्यवहारभाषा आणि आजकालच्या भारतीय माणसांना सहसा हिंदी येतंच. तसंच ते त्यालाही येत होतं. गेली तीन वर्षं मुंबईत वर्षाचे तीन-चार महिने घालत असल्यामुळे त्याला कामचलाऊ मराठीही येत होतं.
हे ऐकताना आपल्याला कुणालाही थोडंही आश्‍चर्य वाटत नाही. कारण आपल्याला सगळ्यांना अशा तीन भाषा येत असतातचा; पण इंग्लंड अमेरिकेत गेल्यावर सूरजचा अनुभव मात्र वेगळा असायचा. त्याला, त्याच्यासारख्याच तिथे जाणाऱ्या भारतीयांना तीन-चार भाषा येतात, याचं तिथल्या त्यांच्या सहकाऱ्यांना कमालीचं आश्‍चर्य वाटायचं. इतक्‍या भाषा तुम्ही शिकलात कधी आणि कशा, हा त्यांचा प्रश्‍न असायचा आणि सूरज आणि त्याचे भारतीय सहकारी इंग्रजी बोलता-बोलता सहज हिंदीत बोलायला लागतात. मध्येच तो घरून आलेल्या फोनवर त्यापेक्षा वेगळ्या भाषेत उडियामध्ये बोलतो, हे तर त्यांना अद्‌भूतच वाटायचं. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जाणं इतक्‍या पटकन आणि सहज कसं काय जमतं, हा त्यांचा प्रश्‍न असायचा.
सूरज म्हणाला, त्यांना हे सगळं आश्‍चर्य वाटायचं कारण त्यांना सहसा एकच भाषा येत असायची, इंग्रजी!
त्याउलट आपण! प्रत्येक राज्याची अधिकृत भाषा, तिची वेगळी लिपी. त्या लिपीचं व्याकरण, त्या भाषेच्या वेगवेगळ्या बोली, त्या बोलीनुसार येणारी वेगवेगळी वैशिष्ट्यं. संकुचित विचार केला तर ही कुणाला आपली मर्यादा वाटेल. कारण मराठी माणूस तमिळनाडूत गेला, तर तो शब्दशः अक्षरशत्रू ठरतो. बंगाली माणूस आंध्रात गेला, तर त्याला "काला अक्षर भैंस बराबर' वाटायला लागतं. कारण आपल्याच देशातल्या या राज्यांच्या भाषांमधलं आपल्याला ओ की ठो येत नसतं. आपलं सगळंच गाडं अडून बसतं;
पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर केवढी श्रीमंती आहे ही आपली. कारण भाषा ही नुसती लिपी घेऊन येत नाही, तर भाषा म्हणजे संस्कृती असते. जितक्‍या भाषा तितक्‍या संस्कृती आहेत आपल्या. त्यातूनच अस्मिता निर्माण झाल्या आहेत. त्याशिवाय भाषांमधून होणारी अभिव्यक्ती, त्यातून झालेली साहित्य निर्मिती. एका मराठीच्याच संदर्भात हे सगळं इतकं अफाट आहे, तर आपल्या अधिकृत भाषांच्या पसाऱ्याची गणती कशी करणार? 1961 च्या जनगणनेनुसार आपल्या देशात 1,652 एवढ्या वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात; तर 1991 च्या जनगणनेनुसार 1,576 भाषा या मातृभाषा आहेत. यात 22 प्रमुख भाषांना "अधिकृत' भाषेचा म्हणजे राजभाषेचा दर्जा आहे. नुकताच मणिपुरी आणि बोडो या दोन भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा मिळाला आहे; तर त्या तुलनेत भिल्ली, गोंडी, खानदेशी अशा बऱ्याच मोठ्या समूहाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषांना अजूनही अधिकृत भाषेचा दर्जा मिळालेला नाही.
शेकडो वर्षे सुखाने नांदणाऱ्या या सगळ्याच भाषांना इंग्रजी शिक्षण सुरू झाल्यानंतर गंडांतर यायला सुरुवात झाली आहे. आज तर अशी परिस्थिती आहे की लोकांनी स्वखुषीने, व्यवहाराचा भाग म्हणून इंग्रजी ही शिक्षणाची भाषा म्हणून स्वीकारली आहे. त्या रेट्यामुळे कमी-जास्त प्रमाणात सगळ्याच भारतीय भाषांपुढे अस्तित्वाचा प्रश्‍न उभा राहिला आहे. आपली भाषा टिकवण्याची एक लढाई आतून लढायची आहे. दुसरीकडे जागतिकीकरणामुळे होणारं सांस्कृतिक सपाटीकरण आणि त्यातून होणारे भाषिक संघर्ष हेही आव्हान आहे. भाषांपुढे असलेल्या या आव्हानांची चर्चा होणं आवश्‍यक आहे.