Monday, January 3, 2011

आपलं भाषावैभव!

बहुविध भाषा, त्यांच्या अस्मिता, संस्कृती हे सगळं आपलं भाषावैभव. आपलं सांस्कृतिक संचित; पण आज थोड्याफार फरकाने सगळ्याच भारतीय भाषांपुढे अस्तित्वाचा प्रश्‍न उभा राहिला आहे. भाषा टिकविण्याची ही लढाई आपण सगळ्यांनीच लढायची आहे.

मुंबई-पुणे प्रवासात सूरज नावाचा एक मुलगा भेटला. असेल पंचविशीचा. एका आयटी कंपनीत नोकरी करत होता. तीन-चार महिने इंग्लंडमध्ये, तीन-चार महिने अमेरिकेत, तीन-चार महिने भारतात अशी त्याची भ्रमंती चालायची. तो होता मूळचा ओरिसाचा. उडिया ही त्याची मातृभाषा. कॉन्व्हेंटमध्ये शिकल्यामुळे इंग्रजी व्यवहारभाषा आणि आजकालच्या भारतीय माणसांना सहसा हिंदी येतंच. तसंच ते त्यालाही येत होतं. गेली तीन वर्षं मुंबईत वर्षाचे तीन-चार महिने घालत असल्यामुळे त्याला कामचलाऊ मराठीही येत होतं.
हे ऐकताना आपल्याला कुणालाही थोडंही आश्‍चर्य वाटत नाही. कारण आपल्याला सगळ्यांना अशा तीन भाषा येत असतातचा; पण इंग्लंड अमेरिकेत गेल्यावर सूरजचा अनुभव मात्र वेगळा असायचा. त्याला, त्याच्यासारख्याच तिथे जाणाऱ्या भारतीयांना तीन-चार भाषा येतात, याचं तिथल्या त्यांच्या सहकाऱ्यांना कमालीचं आश्‍चर्य वाटायचं. इतक्‍या भाषा तुम्ही शिकलात कधी आणि कशा, हा त्यांचा प्रश्‍न असायचा आणि सूरज आणि त्याचे भारतीय सहकारी इंग्रजी बोलता-बोलता सहज हिंदीत बोलायला लागतात. मध्येच तो घरून आलेल्या फोनवर त्यापेक्षा वेगळ्या भाषेत उडियामध्ये बोलतो, हे तर त्यांना अद्‌भूतच वाटायचं. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जाणं इतक्‍या पटकन आणि सहज कसं काय जमतं, हा त्यांचा प्रश्‍न असायचा.
सूरज म्हणाला, त्यांना हे सगळं आश्‍चर्य वाटायचं कारण त्यांना सहसा एकच भाषा येत असायची, इंग्रजी!
त्याउलट आपण! प्रत्येक राज्याची अधिकृत भाषा, तिची वेगळी लिपी. त्या लिपीचं व्याकरण, त्या भाषेच्या वेगवेगळ्या बोली, त्या बोलीनुसार येणारी वेगवेगळी वैशिष्ट्यं. संकुचित विचार केला तर ही कुणाला आपली मर्यादा वाटेल. कारण मराठी माणूस तमिळनाडूत गेला, तर तो शब्दशः अक्षरशत्रू ठरतो. बंगाली माणूस आंध्रात गेला, तर त्याला "काला अक्षर भैंस बराबर' वाटायला लागतं. कारण आपल्याच देशातल्या या राज्यांच्या भाषांमधलं आपल्याला ओ की ठो येत नसतं. आपलं सगळंच गाडं अडून बसतं;
पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर केवढी श्रीमंती आहे ही आपली. कारण भाषा ही नुसती लिपी घेऊन येत नाही, तर भाषा म्हणजे संस्कृती असते. जितक्‍या भाषा तितक्‍या संस्कृती आहेत आपल्या. त्यातूनच अस्मिता निर्माण झाल्या आहेत. त्याशिवाय भाषांमधून होणारी अभिव्यक्ती, त्यातून झालेली साहित्य निर्मिती. एका मराठीच्याच संदर्भात हे सगळं इतकं अफाट आहे, तर आपल्या अधिकृत भाषांच्या पसाऱ्याची गणती कशी करणार? 1961 च्या जनगणनेनुसार आपल्या देशात 1,652 एवढ्या वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात; तर 1991 च्या जनगणनेनुसार 1,576 भाषा या मातृभाषा आहेत. यात 22 प्रमुख भाषांना "अधिकृत' भाषेचा म्हणजे राजभाषेचा दर्जा आहे. नुकताच मणिपुरी आणि बोडो या दोन भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा मिळाला आहे; तर त्या तुलनेत भिल्ली, गोंडी, खानदेशी अशा बऱ्याच मोठ्या समूहाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषांना अजूनही अधिकृत भाषेचा दर्जा मिळालेला नाही.
शेकडो वर्षे सुखाने नांदणाऱ्या या सगळ्याच भाषांना इंग्रजी शिक्षण सुरू झाल्यानंतर गंडांतर यायला सुरुवात झाली आहे. आज तर अशी परिस्थिती आहे की लोकांनी स्वखुषीने, व्यवहाराचा भाग म्हणून इंग्रजी ही शिक्षणाची भाषा म्हणून स्वीकारली आहे. त्या रेट्यामुळे कमी-जास्त प्रमाणात सगळ्याच भारतीय भाषांपुढे अस्तित्वाचा प्रश्‍न उभा राहिला आहे. आपली भाषा टिकवण्याची एक लढाई आतून लढायची आहे. दुसरीकडे जागतिकीकरणामुळे होणारं सांस्कृतिक सपाटीकरण आणि त्यातून होणारे भाषिक संघर्ष हेही आव्हान आहे. भाषांपुढे असलेल्या या आव्हानांची चर्चा होणं आवश्‍यक आहे.

No comments:

Post a Comment