Monday, March 14, 2011

ट्रायलिंग्वल बना!

पंधरा-वीस वर्षांपूर्वी सांगली-साताऱ्याला जाणं म्हणजे प्रवास मानणाऱ्या मंडळींची मुलं सांगली-साताऱ्याला जावं तितक्‍या सहजपणे इंग्लंड-अमेरिकेत जाऊन येत आहेत. देशातल्या देशातही नोकरीसाठी या राज्यातून त्या राज्यात फिरण्याचं तरुण पिढीचं प्रमाणही वाढतं आहे. या सगळ्यांतून निर्माण होणारी भाषिक घुसळण नवे भाषिक प्रश्‍न निर्माण करते आहे.
---
पंधराएक वर्षांपूर्वी शहरातल्या मध्यमवर्गीय घरांमध्ये मूल शाळेत जायच्या वयात आलं, की हमखास एक वाद रंगायचा. तो म्हणजे त्या मुलाला कुठल्या शाळेत घालायचं? मराठी माध्यमाच्या की इंग्रजी? घरातली आजी, मुलाची आई यांचा कल मराठी माध्यमाकडे असायचा. आपले संस्कार व्हायला हवेत, इंग्रजी शिकून मूल आपल्या हाताबाहेर जाईल, घरात कोण इंग्रजीचा अभ्यास घेणार, अशी कारणं सांगून मराठीचा आग्रह धरला जायचा. तर इंग्रजीच्या आग्रहामागे पुढे चांगल्या नोकऱ्या मिळविण्यासाठी इंग्रजीतून शिकणं कसं गरजेचं आहे, हा युक्तिवाद असायचा. आज निदान शहरांमध्ये तरी शाळेच्या पातळीवर मराठीनं इंग्रजीपुढे पूर्ण शरणागती पत्करली आहे. मुलांना मराठी माध्यमात घालायचं की इंग्रजी हा वाद आता मध्यमवर्गीय घरात झडत नाही. कारण- शिक्षणाचं माध्यम मराठी नाही, तर इंग्रजी हे स्वीकारलं गेलं आहे.
खरं तर सगळ्याच प्रमुख भारतीय भाषा बोलणारे समाज आज या चक्रव्यूहात सापडले आहेत. मुलांना मातृभाषेतून शिक्षण दिलं, तर ती इंग्रजीला सरावत नाहीत. साहजिकच ती चांगल्या नोकऱ्या, चांगल्या संधींपासून लांब जातात. त्याचा आर्थिक फटका बसतो. वैयक्तिक पातळीवर हे नुकसान जास्त महागात पडतं. त्यांना इंग्रजीतूनच शिक्षण दिलं, तर ती हळूहळू मातृभाषेपासून दुरावत जातात; पण जगण्याच्या लढाईत ती वरचढ ठरण्याची शक्‍यता असते. सामान्य माणसाचं देणं-घेणं रोजच्या जगण्याच्या संघर्षाशी असतं. त्यामुळे मातृभाषेपेक्षा तो रोजीरोटी मिळवून देणाऱ्या भाषेला प्राधान्य देणार हे उघडच आहे. वीसेक वर्षांपूर्वी वरच्या स्तरात असलेला हा ट्रेंड मध्यमवर्गात झिरपला आणि हळूहळू तो निम्न मध्यमवर्गातही झिरपतो आहे.
कुणाला पटो न पटो; पण भाषिक बहुविधता असलेल्या आपल्या देशात वरच्या पातळीवर इंग्रजी आणि तळाच्या पातळीवर हिंदी याच व्यवहारभाषा झाल्या आहेत. मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्यांना, मुख्य प्रवाहात राहू इच्छिणाऱ्यांना या भाषा येण्याशिवाय पर्याय नाही.
अशा परिस्थितीत स्थानिक भाषा म्हणजेच मातृभाषा कामचलाऊ ठरत जाण्याचा धोका असतो. मराठी भाषेच्या बाबतीत त्याची चुणूक दिसायला आज सुरुवात झाली आहे.
कॉल सेंटरच्या नोकरीतली गरज म्हणून अमेरिकन धाटणीचं इंग्रजी अस्खलित बोलू शकणाऱ्या मुलांना मराठीशी दोन हात करावे लागतात. इथे प्रश्‍न फक्त मराठी बोलण्याचा नसतो. मराठी ही निव्वळ भाषा नाही, ती या समाजाची संस्कृती आहे. भाषा म्हणून मराठी आज चांगल्या पगाराच्या नोकऱ्या देत नसेल; पण ती एका समाजाची ओळख आहे, अस्मिता आहे. मराठी म्हणवून घेणाऱ्या माणसाची मुळं थेट ज्ञानेश्‍वर, मुकुंदराजापर्यंत असतात. संतांनी त्याच्या वैयक्तिक आणि सामाजिक मनाची मशागत केलेली असते. वारी न करताही त्या परंपरेशी तो मनानं जोडला गेलेला असतो. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची अंबाबाई, जेजुरीचा खंडोबा यांच्याबरोबरच शिवाजी महाराज हे त्याचं आराध्यदैवत असतं. गड-किल्ल्यांवरचा मोकळा वारा त्यानं कधी ना कधी तरी अभिमानानं छातीत भरून घेतलेला असतो. ओव्या-अभंगांनी, कीर्तनानं त्याच्या थकल्याभागल्या जीवाची हुरहुर कमी केलेली असते. लावणीबरोबरच शाहिरीत त्याचा जीव रमलेला असतो. पिठलं-भाकरी आणि मिरचीच्या ठेच्याचं नाव काढलं तरी त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. त्याला गनिमी कावा माहीत असतो आणि अमृताते पैजेवर जिंकण्याचा दावा करणाऱ्या त्याच्या भाषेला तितक्‍याच करकरीत शिव्यांचंही वावडं नसतं. ही यादी आणखी कितीतरी वाढत जाऊ शकते.
इंग्रजीतून शिकणारी, पोटापाण्यासाठी जगभर कुठेही जाण्याची शक्‍यता असलेली उद्याची पिढी मराठी भाषेशीच जोडली गेली नसेल, तर ती या परंपरांशी तरी कशी जोडली जाणार? वेगानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाबरोबर तितक्‍याच वेगानं बदलणाऱ्या जगात व्यक्ती म्हणून, समाज म्हणून आपली ओळख ठसवायची असेल, तर भाषा, संस्कृती हाच अस्सल आधार ठरतो. म्हणूनच व्यवहाराची गरज म्हणून इंग्रजी शिकवावं लागलं, हिंदी वापरावं लागलं तरी मराठीशी असलेलं पुढच्या पिढीचं जैविक नातं तोडू नका. त्यापेक्षा तिला ट्रायलिंग्वल बनवा!