Friday, August 27, 2010

शब्दांनो, सोबती व्हा

माय, एक रूपया दे माय...

मळकी साडी, ढगळा ब्लाऊज,
आर्त आवाज तिचा,
तिच्यासारखाच जोडीदार, दोन पोरं,
दोन डोळ्यांच्या खाचा!

माय एक रूपया दे माय...
उघडा खिसा, द्या पैसा, बघता काय?

सकाळ असो, संध्याकाळ असो,
ट्रेनमधली तिची हाळी चुकत नाही,
दोन्ही पोरांवर करवादताना
तिच्यामधली आई काही लपत नाही.

कसं असेल हिचं घर,
कसा असेल हिचा संसार,
फुटक्‍या तिच्या नशिबात
फुटक्‍या डोळ्यांचाच जोडीदार

ही कधी रांधणार नाही,
ही कधी वाढणार नाही,
नवऱ्याच्या शर्टावरच्या मळक्‍या कॉलरचा
राग हिला कधीच येणार नाही

तिच्या दोन चिमण्यांच्या डोळ्यातलं हसू
तिला कधीच दिसणार नाही,
त्यांच्या बाळलीला बघण्याचं सुख
तिच्या कधीच नशिबात असणार नाही.

तरीही,
त्यांच्यावरच्या करवादण्यातून
तिच्यातल्या वेड्या आईची माया कळते,
तिच्या दोन रट्ट्यांनाही डोळे आहेत,
हे तिच्या पोरांना आपोआप कळते.

पण हे असं किती दिवस चालणार
तिच्या पिल्लांना डोळे आहेतच,
त्यांना एक दिवस फुटणार आहेत पंखही

आणि मग...?
मग काय...?

या आंधळ्या आईसाठी
आणि तिच्या पिल्लांसाठी
करूणा भाकताना,
शब्दांनो सोबती व्हा!