Tuesday, May 25, 2010

चतकोरातली श्रीमंती

रात्री अकराची नेरूळहून ठाण्याला जाणारी ट्रेन.
ती धावत पकडताना लेडिजमधे कुणी नसेल तर बसावं की जावं जेन्टस्‌मधे अशा विचारात मी असतानाच एक बाई आणि एक दहा बारा वर्षाचा मुलगा लेडिजमधे बसलेले दिसले.
या ताई या... त्या बाईनं अगदी घरी बोलवावं तसं माझं स्वागत केलं.
रात्री उशिराच्या या ट्रेनमधे आणखी कुणीतरी सोबतीला आहे हा धीर तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.
मी दुसरीकडची खिडकी पकडली.
पुस्तक बाहेर काढलं.
ताई कोपर कुठे आलं?
कोपर...? ते तर डोंबिवलीच्या अलीकडे.
आणि विठ्ठलवाडी...?
तुम्हाला कुठं जायचंय?
ती तिच्या जागेवरून माझ्या समोर येऊन बसली. असेल तिशीची. अंगावर बरी साडी. गळ्यात मोत्याची माळ. पण चेहऱ्यावर काबाडकष्टातून आलेलं रापलेपण.
मला जायचंय कोपरला. पण तिथलं काम करून मी जाणार विठ्ठलवाडीला. आधी कुठलं येईल?
तिला कोपरला कसं जायचं सांगितलं.
खरं तर मला हे सगळं टाळायचं होतं. दिवसभराचा शीण घालवण्यासाठी हातातलं पुस्तक वाचायचं होतं. पण ती बाई जी काही सुरू झाली...
काहीही विचारण्याआधी, समजून घेण्याची किमान उत्सुकता दाखवण्याआधीच भडाभडा बोलायला लागली.
तो एक माणूस आहे माझ्या ओळखीचा. त्याला दुकान काढायला पाच हजार रूपये दिले होते, सहा महिन्यापूर्वी. ते घेऊन त्यानं कोपरला दुकान काढलं आणि नेरूळहून कोपरला निघून गेला. त्याचा फोनही लागत नाही. पैसै परत कसे मिळणार माझे म्हणून चालले.
मी फक्त हातातल्या घड्याळाकेड बघितलं. रात्रीचे सव्वा अकरा.
आत्ता? माझ्या चेहऱ्यावर प्रश्‍नचिन्ह.
काय करू ताई? कामातून सुट्टी मिळत नाही. सकाळी मी एका हॉस्पिटलमध्ये साफसफाई, कपडे धुण्याचं काम करते. मग बारा वाजता घरी जाते. पोरांना डाळभात करून घालते. मग दुपारनंतर एका घरी कामाला जाते. तिथं घराची साफसफाई, धुणीभांडी आणि स्वैंपाक ही कामं करते. दहा माणसं आहेत, त्या घरात. ती सगळी काम करून यायला अकरा वाजतातच ताई...
नवरा... ? मी विचारलं.
तशी ती एकदम उसळली.
नाव काढू नका त्या त्या मुडद्याचं... नुसता पितो. प्यायचं आणि बायको पोरांना मारायचं... दुसरं काहीही येत नाही त्याला!
तो काही काम नाही करत?
करतो ना. रंगारी आहे. काम करून पैसा मिळाला की घाल दारूत दुसरं काय?
तिनं एकाएकी माझ्याकडे पाठ करून पाठीवरचे वळ दाखवले. साडी वर करून पायावरच्या जखमा दाखवल्या. चेहऱ्यावरच्या खुणा दाखवल्या.
असा मारतो बघा ताई... त्याचं म्हणणं एकच. मी नीट का राहते. आता माझी ही साडी, हे गळ्यातलं मला कामावरच्या ताईंनी दिलंय. त्या म्हणतात, कुणाच्याही घरी कामाला गेलं तरी नीट जावं. तर हा म्हणतो कशाला पाहिजे हा नट्टापट्टा? आता हा काय नट्टापट्टा आहे का हो?
तो खरंच नट्टापट्टा नव्हता.
आता एवढं दहा माणसांचं काम करायचं, लांब आहे घरापासून. रात्री चालत घरी जायचं, उशीर होणारच, तर विचारतो, कुणाबरोबर फिरायला गेली होती बोल. हल्ली मी पण वैतागते. सांगते, आहे एक मोटारवाला. त्याच्याबरोबर गेले होते. एवढे दिवस मी कसंतरी सहन केलं पण आता माझी पोरं मोठी झालीत. मोठा पोरगा आठवीत आहे. तो कालच बापाला म्हणाला, की परत माझ्या आईला हात लावलास तर तुझे तुकडे करीन. मी खरंच कंटाळले त्याला. आता मी सरळ काडीमोड घेणार आहे. तो आणि त्याचं नशीब.
किती पगार मिळतो?
ताई, दोन्हीकडे मिळून पाच हजार रूपये मिळतात. त्यात घराचं भाडं, पोरांची शिक्षणं, जगण्याचा खर्च. चालतं कसं तरी.
तरीपण तुम्ही त्या माणसाला पाच हजार रूपये दिले? मी विचारलं
हां ताई... घरात पैसे ठेवायची भीती वाटत होती. बॅंकेचं वगैरे मला माहित नव्हतं. आणि तो माणूस माझ्यापेक्षाही गरीब होता हो. शेवटी गरीबच जाणार ना गरिबाच्या मदतीला.
मी ट्रेनमध्ये चढले तेव्हा तिच्यासमोर बसलेला तो मुलगा इकडे तिकडे फिरत होता. ट्रेनच्या होल्डरला धरून झोके घेत होता.
हा कोण?
काय माहीत?
मला वाटलं तुमच्याबरोबर आहे तो.
नाही तो आपला आपला आलाय.
ए... कोण रे तू...? मी त्याला हाक मारत विचारलं.
गणेश... माझ्याकडे वळून बघत तो मुलगा म्हणाला.
वय असेल साधारण दहा बारा वर्षांचं. काळा, मळलेला रंग, मळलेले कपडे. पायात चप्पलही नव्हती. पलीकडे त्याची एक मळकट पिशवी पडलेली.
कुठून आलास रे? मी विचारलं.
रत्नागिरीहून. त्यानं झोका घेत घेत उत्तर दिलं.
काय? आम्ही दोघीही एकदम.
हां... त्यानं झोका घेणं थांबवून एकदम शांतपणे सांगितलं.
कसा आलास?
असाच ट्रेननी. पनवेलला बदलली.
एकटाच?
हो!
कुठे चाललास?
ठाण्याला.
तो मुलगा एकेका शब्दात उत्तरं देत होता. आपल्याला हे सगळे प्रश्‍न का विचारले जाताहेत याची त्याला गंमतच वाटत होती.
कुणाकडे?
आजीकडे...
कशाला?
तो काहीच बोलला नाही. झोके घेत राहिला.
कितवीत आहेस रे तू?
पुन्हा माझ्याकडे वळून तो मुलगा म्हणाला,
शाळेत नाही जात मी.
का?
धाडत नाहीत.
कोण?
माझे चुलते आणि चुलती.
आणि तुझे आईवडील?... आम्ही दोघींनीही एकदम विचारलं.
नाहीत.
नाहीत?
म्हणजे वडील गेलेत आणि आईनं दुसरं लग्न केलंय. ती दुसरीकडे असते.
आई तुला घेऊन नाही गेली?
नाही... आता हळूहळू त्याचा चेहरा कसनुसा होत गेलेला.
मग तू किती शिकलास?
तिसरीपर्यंत. मी तिसरीत असतानाच वडील गेले. मग चुलते म्हणाले की तुला शिकवता यायचं नाही. तू घरीच थांब.
मग काय करतोस घरी?
घरातली कामं करतो. पाणी भरतो.
मग आता आजीकडे कशाला चाललास?
चुलता म्हणाला तुला जगवता नाही येणार. तू जा. त्यांनी माझे कपडे पिशवीत भरले आणि घराबाहेर पाठवलं.
आणि आजी काय करते?
काम करते लोकांच्या घरी. तिच्याकडे जाऊन जगणार...
आणि आजीन नाही घेतलं घरात तर...? त्या बाईने विचारलं.
तर बघायचं... तो मुलगा झोके घेत घेत म्हणाला. त्याला हा सगळा खेळच वाटत होता.
बाळा तुला शिकायचंय का रे? त्या बाईनं त्याला विचारलं.
हां... तो मुलगाही मान खाली घालून म्हणाला.
ताई, एक कागद द्या... तिनं आता मला ऑर्डरच दिली. दिला.
पेन द्या... दिला.
तेवढ्यात तिनं तिच्या कॅरी बॅगमधून एक लहानशी, मळकट डायरी काढली.
ती माझ्या हातात देऊन म्हणाली, यात सीताबाई बोंबले नाव शोधा.
तुम्हाला नाही वाचता येत?
नाही.
मी ते नाव शोधलं. नाव, पत्ता होता.
मी दिलेला कागद पेन माझ्याच हातात देऊन ती म्हणाली, ते नाव पत्ता लिहा याच्यावर. आणि नावानंतर माझ्या कामाच्या ताईंचा मोबाईल नंबर आहे, तो पण लिहा.
माझं लिहून झाल्यावर तिनं तो कागद त्या मुलाच्या हातात दिला. आणि म्हणाली, आजीकडे दोनचार दिवस रहा. म्हातारी तरी काय तुला जगवणार? आणि नंतर या पत्त्यावर ये. पुढच्या महिन्यात शाळा सुरू होईल. माझ्या घराजवळच आहे, शाळा. तुझंही नाव घालीन. माझ्या पोरांबरोबर शीक. पण गाड्या धुवायची वगैरे कामं करून तुझे पैसे तुला मिळवावे लागतील. तेवढं करत असशील तर तुला शिकवीन बघ माझ्या पोरांबरोबर.
त्या मुलानं तो पत्ता घेऊन मान डोलावली.
तेवढ्यात ठाणं आलं. शेवटपर्यंत डब्यात आम्ही तिघंच होतो.
तिघंही खाली उतरलो.
खाल्लस का रे सकाळपासून काही?
तो अगदीच संकोचला.
खोटं उत्तर द्यायचा सराईतपणा त्याच्याकडे नव्हता.
नाही खाल्लंस ना काही? हे घे... तिनं चटकन पर्स उघडून दहा रूपयाची नोट काढली.
त्याच्या हातात कोंबली.
खा काहीतरी... आणि शिकायचं असेल तर ये माझ्याकडे असं सांगत ती पुढची ट्रेन पकडायला धावलीसुध्दा!
आता प्लॅटफॉर्मवर आम्ही दोघंच. तो छोटा मुलगा आणि मी. एकमेकांकडे पहात.
सतत "नकोसं' असल्याची वागणूक मिळाल्यानंतर माणूसकीची ही झुळूक अनुभवून विस्मयचकीत झालेला तो.
आणि आयुष्याच्या कक्षा विस्तारल्या तरी जगण्याच्या मर्यांदांचं भान अचानक जाणवल्यामुळे भांबावलेली मी!

Thursday, May 20, 2010

न्यायाचा सरकारी चेहरा

न्यायाचा सरकारी चेहरा
मुंबई हल्ल्यावरच्या निकालपत्राच्या वाचनाचं सोमवारचं कामकाज संपलं तेव्हा प्रसारमाध्यमांनी सगळ्यात पहिला गराडा घातला तो विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना. कसाबखालोखाल तो दिवस जणू काही उज्ज्वल निकम यांचाच होता. त्यांच्या मुलाखती, त्यांचे बाईट, असं सगळं सकाळपासूनच सुरू होतं. त्यामुळेच निकालपत्राच्या पहिल्या दिवसाच्या वाचनानंतरही सगळ्यात महत्त्वाची होती ती त्यांची प्रतिक्रिया. "येस यू आर गिल्टी' हा कसाबवरचा अहवाल दाखवत तेही ती हिरिरीने देत होते. 1994 मध्ये मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्यापासूनचा उज्ज्वल निकम यांचा प्रवास कुणालाही थक्क करणारा आहे. त्यांचा जन्म जळगावचा. वडील देवराव निकमही वकील. त्यामुळे व्यवसायाचं बाळकडूच मिळालेलं. सायन्सची आणि नंतर लॉच्या पदवीपर्यंतचं शिक्षण त्यांनी जळगावातच पूर्ण केलं. काही काळ तिथल्याच सत्र न्यायालयात सरकारी वकील म्हणून कामही केलं. पण मुंबईचे माजी सहआयुक्त एम. एन सिंग यांनी त्यांना मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात जळगावहून बोलावलं. त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आणि बघता बघता ते या बिनचेहऱ्याच्या यंत्रणेचा चेहरा बनून गेले. तेरा बॉम्बस्फोटांच्या मालिकेवरचा 14 वर्षे चाललेला हा खटला आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता, असं ते सांगतात. हा प्रदीर्घ, संवेदनशील खटला हाताळल्यानंतर उज्ज्वल निकम यांच्याकडे गुलशनकुमार खून खटला, नदीम खटला, खैरलांजी हत्याकांड, प्रमोद महाजन खून खटला असे अनेक महत्तवाचे खटले येत गेले. आणि त्या सगळ्यामधून त्यांची कारकीर्द झळाळत राहिली. तीस वर्षांच्या त्यांच्या कारकीर्दीमध्ये त्यांच्या युक्तिवादामुळे आत्तापर्यंत 613 जणांना जन्मठेप तर 33 जणांना फाशीची शिक्षा जाहीर झाली आहे. या सगळ्या हाय प्रोफाईल खटल्यांचे वकील असल्यामुळ
े उज्ज्वल निकम यांना झेड सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. आपल्या सगळ्या यशामध्ये कोणतीही तक्रार न करता आपल्याबरोबर दिवसरात्र फिरणाऱ्या या सुरक्षा रक्षकांचाही वाटा आहे असं त्यांना वाटतं. या सगळ्या तीस वर्षांच्या प्रवासात त्यांना निशब्द साथ दिली आहे ती त्यांच्या कुटुंबाने. सततचा प्रवास, वेगवेगळ्या मोठमोठ्या खटल्यांची धावपळ या सगळ्या पार्श्‍वभूमीवर ते जमेल तेवढा वेळ कुटुंबासाठी काढायचा प्रयत्न करतात. पण या सगळ्या दगदगीत कुटुंबानंही आपल्याला समजून घेतलंय, हे ते आवर्जुन सांगतात. त्यांचं दिनक्रम बघतला तरी त्यांच्या रोजच्या दगदगीची कल्पना येते. ते रोज सकाळी चार वाजता उठतात. रोज नियमित व्यायाम करतात. सहा वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत त्यांच्याकडे असलेल्या खटल्यांचा अभ्यास, पोलीस अधिकाऱ्यांना ब्रिफिंग, नोट्‌स काढणं, केसची तयारी हे सगलं चालतं. अकरा ते पाच कोर्ट, पाच ते सात पेपर वाचणं, बातम्या बघणं, इतर गोष्टी समजून घेणं आणि रात्री साडेदहाला झोप. ते रात्रीच्या पार्ट्यांना जात नाहीत. मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या पहिल्या दिवशी ते कोर्टात गेले तेव्हा विशेष टाडा न्यायालयात शंभराच्या वर पत्रकार त्यांची वाट पहात होते. मला तेव्हा भारताचा पंतप्रधान झाल्यासारखंच वाटलं, तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही, असं ते सांगतात.
कसाबचा खटला देशासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. त्याला ताबडतोब फासावर लटकवा असा लोकांचा आक्रोश सुरू झाला होता. पण हा आंतरराष्ट्रीय खटला होता. तो नीट चालवून आपल्या देशात इतर काही देशांसारखं मध्ययुगीन वातावरण नाही, इथे एक नीट न्याययंत्रणा आहे, हे जगापुढे मांडणं आवश्‍यक होतं. त्याचं शिवधनुष्य निकम यांना पेलायचं होतं. हे अक्षरश शिवधनुष्य होतं. सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलेला, मोठा खटला होता तो. त्याचं चार्जशीटच अकरा हजार पानांचं होतं. 650 साक्षीदारांचे जबाब नोंदवून घ्यायचे होते. कसाबवर देशाविरूध्द युध्द पुकारण्यापासूनचे एकूण 86 आरोप होते.
असा सगळा खटला उज्ज्वल निकम यांना हाताळायचा होता. तो त्यांनी कसा हाताळला याचं फलित म्हणजे कसाबला झालेली फाशीची शिक्षा.
कसाबला फाशी का दिली पाहिजे याचा युक्तिवाद करताना त्यांनी आठ कारणं दिली आहेत. कसाब हे पाकिस्तानात तयार झालेले किलिंग मशीन असून त्याला अजिबात जिवंत रहाण्याचा अधिकार नाही. असं सांगून ते न्यायाधीशांना म्हणाले की कसाबची केस ही दुर्मिळातली दुर्मिळ केस आहे. या सैतानाच्या एजंटला फाशीच दिली पाहिजे. एक तर त्याचं सगळं कृत्य पूर्वनियोजित, पूर्वप्रशिक्षित होतं. तरूण, वृध्द, हिंदू, मुस्लिम, ज्यू, ख्रिश्‍चन असा कोणताही विचार न करता त्याने सरसकट सगळ्यांनाच ठार केलं आहे. त्यानं कोणतीही दयामाया न दाखवता अत्यंत योजनाबद्ध रीतीने लोकांना मारलं आहे, हे त्याला फाशी देण्याचं दुसरं कारणं. ते अधिक स्पष्ट करताना ते म्हणतात कसाबनं आणि अबू इस्माईलनं आठ स्त्रिया, सात लहान मुलं तसंच 14 पोलिसांसह 72 लोकांना ठार केलं. हे सगळे लोक असहाय होते. ते कोणताही प्रतिकार करू शकत नव्हते. आणि कसाबनं त्यांना मारावं असं कोणतंही कृत्य त्यांनी केलेलं नव्हतं.
कसाबला फाशी दिलीच पाहिजे याचं समर्थन करताना त्यांनी मांडलेला आणखी तिसरा मुद्दा म्हणजे कसाबने फक्त माणसांना जीवे मारलं नाही तर माणसे मारणं एन्जॉय केलं. यातून त्याचा माणसांच्या जगण्याकडे बघण्याचा तुच्छतावादी दृष्टिकोन दिसून येतो. कसाबला फाशीच दिली पाहिजे हे ठासून मांडताना त्यांनी मांडलेला चौथा मुद्दा म्हणजे सीएसटी स्टेशनवर अपेक्षेपेक्षा कमी गर्दी बघून कसाबला जास्त माणसं मारता येणार नाही याचं वाईट वाटलं. त्यामुळे कसाब हा जनावरांपेक्षाही घातक आहे. कसाबच्या कबुलीजबाबाचा संदर्भ देऊन ते म्हणतात की समुद्रमार्गे प्रवास करून मुंबईत पोहोचायला या सगळ्या दहशतवाद्यांना एक तास उशीर झाला. त्यामुळे त्यांना त्या संध्याकाळी सीएसटी स्टेशनवर अपेक्षित गर्दी मिळाली नाही. कसाब आणि इस्माईलनं कुबेर या त्यांनीच पळवलेल्या बोटीच्या खलाशाची हत्या केली. त्याची हत्या ही अकारण केलेली अत्यंत क्रूर हत्या आहे. कसाब म्हणजेच कसाई, खाटिक. आणि या कसाबनं नावाप्रमाणेच कृत्य केलं.
कसाबला फाशी दिलीच पाहिजे यासंदर्भातल्या पाचव्या मुद्‌द्‌याचं समर्थन करताना त्यांनी न्यायाधीशांना विनंती केली की कसाबच्या चेहऱ्यावर जाऊ नका. माणसांना मारून सीएसटी स्टेशनवर फिरतानाचे त्याचे फोटोच त्यांनी कोर्टापुढे सादर केले. कसाब मुंबईत आला तो दहा जणांच्या गटाबरोबर. त्या सगळ्यांनी मिळून कोणतंही कारण नसताना 160 निष्पाप लोकांची हत्या केली. अनेकांना जखमी केलं. हे सगळं म्हणजे केवळ घडून आलेली हत्या नाही तर थंड डोक्‍याने जाणीवपूर्वक केलेलं कृत्य आहे. या कृत्यामुळे समाजमनाला हादरा बसला. इतक्‍या माणसांच्या हत्येमुळेच केवळ हा दुर्मिळातला दुर्मिळ खटला आहे असं नाही तर ज्या पध्दतीने माणसांना मारण्यात आलं, त्यातलं क्रौर्य पाहता कसाबला फाशीच दिली पाहिजे. कसाबला जर फाशीपेक्षा कमी शिक्षा दिली तर भारत हा अतिरेक्‍यांचे "सॉफ्ट टार्गेट' बनेल. त्यामुळे कोणतीही दयामाया न दाखवता कसाबला फाशीच दिली पाहिजे. जो दुसऱ्यांचे जीव घेतो त्याला जगण्याचा कोणताही अधिकार नाही.
हा उज्ज्वल निकम यांचा कसाबला फाशी देण्यासाठीचा युक्तिवाद होता.
सगळ्या जगाचं लक्ष लागलेल्या या खटल्याचं शिवधनुष्य लीलया पेलत उज्ज्वल निकम यांनी मुंबईवर हल्ला करणाऱ्या कसाबला फाशीच्या तख्ता पर्यंत नेऊन पोहोचवलं आहे.

Tuesday, May 4, 2010

सोशल मीडिया पूरकच... पण!

तंत्रज्ञानाची जसजशी प्रगती होत गेली आहे तसतसा मीडिया बदलत गेला आहे हे आपण सगळेच पहात आहोत. आधीची अक्षरजुळणी गेली, ऑफसेट प्रिटिंग आले तसतसं वर्तमानपत्राची छपाई सोपी सुलभ होत गेली.
गेल्या दहा वर्षात इलेक्‍ट्रॉनिक्‍स माध्यमातल्या बदलांनी मीडियाचा चेहरा मोहरा आपल्यासमोरच बदलत गेला आहे. एखादी घटना घडत असताना ती घरबसल्या समोर पहायला मिळणं हा थरार आता सामान्य माणसालाही नवीन राहिलेला नाही. त्याचाच पुढचा टप्पा अर्थातच इंटरॅक्‍टिव्ह मीडिया हा होता. तिथूनच माहितीचा स्त्रोत मीडियाकडून लोकांकडे जाणं ही पारंपरिक रचना बदलायला सुरूवात झाली. आणि लोकांकडून मीडियाकडे माहितीचा स्त्रोत सुरू झाला.
खरं म्हणजे आपण अशा युगात वावरत आहोत जिथे माहिती ही कुणा एकाची मक्तेदारी असू शकत नाही. ती कुणाहीकडे असू शकते. पूर्वीही ती होतीच पण ती प्रसारीत करणं ही तांत्रिक अडचण होती. आता व्टीटर, ब्लॉग्ज, बझ अशा माध्यमांमुळे आपला मुद्दा मांडणं आणि तो अनेकांपर्यंत पोहोचवणं अगदी सोपं झालं आहे. अमिताभ बच्चन यांनी रात्री अडीच वाजता ब्लॉग पोस्ट केला की पावणेतीन वाजता त्याच्यावर पहिली प्रतिक्रिया पडलेली असते. अमिताभ आणि त्याच्या चाहत्यांचा हा थेट, मुक्त संवाद कुणीही "फिल्टर' करू शकत नाही. दोन टोकांमधलं माध्यम म्हणून मीडियाचं जे महत्त्व होतं त्याला हादरा बसला आहे तो तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे. मीडियाबद्दलच्या अविश्‍वासार्हतेची त्याला जोड मिळाली आहे इतकंच.
आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की तंत्रज्ञानातले हे बदलच यापुढच्या काळात अनेक गोष्टींना भुईसपाट करणार आहेत. अनेक नव्या गोष्टी आणणारही आहेत. व्टीटरची एक ओळ आयपीएलच्या साम्राज्याला धक्का देईल हे दहा वर्षापूर्वी आपल्याला "कल्पनारम्य' वाटलं असतं. चॅनल सर्फिंग ज्या वेगानं केलं जातं, त्याच वेगाने आपल्या आसपास घटना घडतात. त्याच वेगानं त्या आपल्याला समजतात. इंटरनेटवरून तुम्ही कधीही कुणाशीही संपर्क साधू शकता तेव्हा देशांच्या भौगोलिक सीमाही नावापुरत्या ठरतात.
ज्यांच्या अगदी वडिलांनीही गावाबाहेर पाऊल टाकलेलं नाही अशी मुलं नोकरीसाठी देशोदेशी फिरतात. अशा वातावरणात लोकांच्या आकांक्षा वाढलेल्या आहेत. जगण्याच्या कक्षा बदलल्या आहेत. त्यांची समज वाढलेली आहे. आणि मीडियाकडून असलेल्या अपेक्षा बदलल्या आहेत. मीडिया हे बदललेलं समाजमन समजून घ्यायला तयार नाही. आणि त्यात तंत्रज्ञान स्वस्त आणि सोपं होत लोकांच्या हातात पोहोचलं आहे. सोशल मीडिया हे त्याचंच फलित.
सोशल मीडियाची ही सगळी नांदी बघितली तर फक्त माहिती देणं हा आपला रोल आता बदलला आहे, हे मीडियानं लक्षात घ्यायला हवं.