Tuesday, May 25, 2010

चतकोरातली श्रीमंती

रात्री अकराची नेरूळहून ठाण्याला जाणारी ट्रेन.
ती धावत पकडताना लेडिजमधे कुणी नसेल तर बसावं की जावं जेन्टस्‌मधे अशा विचारात मी असतानाच एक बाई आणि एक दहा बारा वर्षाचा मुलगा लेडिजमधे बसलेले दिसले.
या ताई या... त्या बाईनं अगदी घरी बोलवावं तसं माझं स्वागत केलं.
रात्री उशिराच्या या ट्रेनमधे आणखी कुणीतरी सोबतीला आहे हा धीर तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.
मी दुसरीकडची खिडकी पकडली.
पुस्तक बाहेर काढलं.
ताई कोपर कुठे आलं?
कोपर...? ते तर डोंबिवलीच्या अलीकडे.
आणि विठ्ठलवाडी...?
तुम्हाला कुठं जायचंय?
ती तिच्या जागेवरून माझ्या समोर येऊन बसली. असेल तिशीची. अंगावर बरी साडी. गळ्यात मोत्याची माळ. पण चेहऱ्यावर काबाडकष्टातून आलेलं रापलेपण.
मला जायचंय कोपरला. पण तिथलं काम करून मी जाणार विठ्ठलवाडीला. आधी कुठलं येईल?
तिला कोपरला कसं जायचं सांगितलं.
खरं तर मला हे सगळं टाळायचं होतं. दिवसभराचा शीण घालवण्यासाठी हातातलं पुस्तक वाचायचं होतं. पण ती बाई जी काही सुरू झाली...
काहीही विचारण्याआधी, समजून घेण्याची किमान उत्सुकता दाखवण्याआधीच भडाभडा बोलायला लागली.
तो एक माणूस आहे माझ्या ओळखीचा. त्याला दुकान काढायला पाच हजार रूपये दिले होते, सहा महिन्यापूर्वी. ते घेऊन त्यानं कोपरला दुकान काढलं आणि नेरूळहून कोपरला निघून गेला. त्याचा फोनही लागत नाही. पैसै परत कसे मिळणार माझे म्हणून चालले.
मी फक्त हातातल्या घड्याळाकेड बघितलं. रात्रीचे सव्वा अकरा.
आत्ता? माझ्या चेहऱ्यावर प्रश्‍नचिन्ह.
काय करू ताई? कामातून सुट्टी मिळत नाही. सकाळी मी एका हॉस्पिटलमध्ये साफसफाई, कपडे धुण्याचं काम करते. मग बारा वाजता घरी जाते. पोरांना डाळभात करून घालते. मग दुपारनंतर एका घरी कामाला जाते. तिथं घराची साफसफाई, धुणीभांडी आणि स्वैंपाक ही कामं करते. दहा माणसं आहेत, त्या घरात. ती सगळी काम करून यायला अकरा वाजतातच ताई...
नवरा... ? मी विचारलं.
तशी ती एकदम उसळली.
नाव काढू नका त्या त्या मुडद्याचं... नुसता पितो. प्यायचं आणि बायको पोरांना मारायचं... दुसरं काहीही येत नाही त्याला!
तो काही काम नाही करत?
करतो ना. रंगारी आहे. काम करून पैसा मिळाला की घाल दारूत दुसरं काय?
तिनं एकाएकी माझ्याकडे पाठ करून पाठीवरचे वळ दाखवले. साडी वर करून पायावरच्या जखमा दाखवल्या. चेहऱ्यावरच्या खुणा दाखवल्या.
असा मारतो बघा ताई... त्याचं म्हणणं एकच. मी नीट का राहते. आता माझी ही साडी, हे गळ्यातलं मला कामावरच्या ताईंनी दिलंय. त्या म्हणतात, कुणाच्याही घरी कामाला गेलं तरी नीट जावं. तर हा म्हणतो कशाला पाहिजे हा नट्टापट्टा? आता हा काय नट्टापट्टा आहे का हो?
तो खरंच नट्टापट्टा नव्हता.
आता एवढं दहा माणसांचं काम करायचं, लांब आहे घरापासून. रात्री चालत घरी जायचं, उशीर होणारच, तर विचारतो, कुणाबरोबर फिरायला गेली होती बोल. हल्ली मी पण वैतागते. सांगते, आहे एक मोटारवाला. त्याच्याबरोबर गेले होते. एवढे दिवस मी कसंतरी सहन केलं पण आता माझी पोरं मोठी झालीत. मोठा पोरगा आठवीत आहे. तो कालच बापाला म्हणाला, की परत माझ्या आईला हात लावलास तर तुझे तुकडे करीन. मी खरंच कंटाळले त्याला. आता मी सरळ काडीमोड घेणार आहे. तो आणि त्याचं नशीब.
किती पगार मिळतो?
ताई, दोन्हीकडे मिळून पाच हजार रूपये मिळतात. त्यात घराचं भाडं, पोरांची शिक्षणं, जगण्याचा खर्च. चालतं कसं तरी.
तरीपण तुम्ही त्या माणसाला पाच हजार रूपये दिले? मी विचारलं
हां ताई... घरात पैसे ठेवायची भीती वाटत होती. बॅंकेचं वगैरे मला माहित नव्हतं. आणि तो माणूस माझ्यापेक्षाही गरीब होता हो. शेवटी गरीबच जाणार ना गरिबाच्या मदतीला.
मी ट्रेनमध्ये चढले तेव्हा तिच्यासमोर बसलेला तो मुलगा इकडे तिकडे फिरत होता. ट्रेनच्या होल्डरला धरून झोके घेत होता.
हा कोण?
काय माहीत?
मला वाटलं तुमच्याबरोबर आहे तो.
नाही तो आपला आपला आलाय.
ए... कोण रे तू...? मी त्याला हाक मारत विचारलं.
गणेश... माझ्याकडे वळून बघत तो मुलगा म्हणाला.
वय असेल साधारण दहा बारा वर्षांचं. काळा, मळलेला रंग, मळलेले कपडे. पायात चप्पलही नव्हती. पलीकडे त्याची एक मळकट पिशवी पडलेली.
कुठून आलास रे? मी विचारलं.
रत्नागिरीहून. त्यानं झोका घेत घेत उत्तर दिलं.
काय? आम्ही दोघीही एकदम.
हां... त्यानं झोका घेणं थांबवून एकदम शांतपणे सांगितलं.
कसा आलास?
असाच ट्रेननी. पनवेलला बदलली.
एकटाच?
हो!
कुठे चाललास?
ठाण्याला.
तो मुलगा एकेका शब्दात उत्तरं देत होता. आपल्याला हे सगळे प्रश्‍न का विचारले जाताहेत याची त्याला गंमतच वाटत होती.
कुणाकडे?
आजीकडे...
कशाला?
तो काहीच बोलला नाही. झोके घेत राहिला.
कितवीत आहेस रे तू?
पुन्हा माझ्याकडे वळून तो मुलगा म्हणाला,
शाळेत नाही जात मी.
का?
धाडत नाहीत.
कोण?
माझे चुलते आणि चुलती.
आणि तुझे आईवडील?... आम्ही दोघींनीही एकदम विचारलं.
नाहीत.
नाहीत?
म्हणजे वडील गेलेत आणि आईनं दुसरं लग्न केलंय. ती दुसरीकडे असते.
आई तुला घेऊन नाही गेली?
नाही... आता हळूहळू त्याचा चेहरा कसनुसा होत गेलेला.
मग तू किती शिकलास?
तिसरीपर्यंत. मी तिसरीत असतानाच वडील गेले. मग चुलते म्हणाले की तुला शिकवता यायचं नाही. तू घरीच थांब.
मग काय करतोस घरी?
घरातली कामं करतो. पाणी भरतो.
मग आता आजीकडे कशाला चाललास?
चुलता म्हणाला तुला जगवता नाही येणार. तू जा. त्यांनी माझे कपडे पिशवीत भरले आणि घराबाहेर पाठवलं.
आणि आजी काय करते?
काम करते लोकांच्या घरी. तिच्याकडे जाऊन जगणार...
आणि आजीन नाही घेतलं घरात तर...? त्या बाईने विचारलं.
तर बघायचं... तो मुलगा झोके घेत घेत म्हणाला. त्याला हा सगळा खेळच वाटत होता.
बाळा तुला शिकायचंय का रे? त्या बाईनं त्याला विचारलं.
हां... तो मुलगाही मान खाली घालून म्हणाला.
ताई, एक कागद द्या... तिनं आता मला ऑर्डरच दिली. दिला.
पेन द्या... दिला.
तेवढ्यात तिनं तिच्या कॅरी बॅगमधून एक लहानशी, मळकट डायरी काढली.
ती माझ्या हातात देऊन म्हणाली, यात सीताबाई बोंबले नाव शोधा.
तुम्हाला नाही वाचता येत?
नाही.
मी ते नाव शोधलं. नाव, पत्ता होता.
मी दिलेला कागद पेन माझ्याच हातात देऊन ती म्हणाली, ते नाव पत्ता लिहा याच्यावर. आणि नावानंतर माझ्या कामाच्या ताईंचा मोबाईल नंबर आहे, तो पण लिहा.
माझं लिहून झाल्यावर तिनं तो कागद त्या मुलाच्या हातात दिला. आणि म्हणाली, आजीकडे दोनचार दिवस रहा. म्हातारी तरी काय तुला जगवणार? आणि नंतर या पत्त्यावर ये. पुढच्या महिन्यात शाळा सुरू होईल. माझ्या घराजवळच आहे, शाळा. तुझंही नाव घालीन. माझ्या पोरांबरोबर शीक. पण गाड्या धुवायची वगैरे कामं करून तुझे पैसे तुला मिळवावे लागतील. तेवढं करत असशील तर तुला शिकवीन बघ माझ्या पोरांबरोबर.
त्या मुलानं तो पत्ता घेऊन मान डोलावली.
तेवढ्यात ठाणं आलं. शेवटपर्यंत डब्यात आम्ही तिघंच होतो.
तिघंही खाली उतरलो.
खाल्लस का रे सकाळपासून काही?
तो अगदीच संकोचला.
खोटं उत्तर द्यायचा सराईतपणा त्याच्याकडे नव्हता.
नाही खाल्लंस ना काही? हे घे... तिनं चटकन पर्स उघडून दहा रूपयाची नोट काढली.
त्याच्या हातात कोंबली.
खा काहीतरी... आणि शिकायचं असेल तर ये माझ्याकडे असं सांगत ती पुढची ट्रेन पकडायला धावलीसुध्दा!
आता प्लॅटफॉर्मवर आम्ही दोघंच. तो छोटा मुलगा आणि मी. एकमेकांकडे पहात.
सतत "नकोसं' असल्याची वागणूक मिळाल्यानंतर माणूसकीची ही झुळूक अनुभवून विस्मयचकीत झालेला तो.
आणि आयुष्याच्या कक्षा विस्तारल्या तरी जगण्याच्या मर्यांदांचं भान अचानक जाणवल्यामुळे भांबावलेली मी!

1 comment: