Friday, January 29, 2010

मराठी आणि मराठीपणाच्या पलीकडेही!

कुणीतरी म्हटलंय, "रायटिंग इज व्हायोलन्स अगेन्स्ट मायसेल्फ'लिहिणं ही मी माझ्याविरुद्ध केलेली हिंसा असते. स्वतःचा शोध घेण्याची प्रक्रिया ही अशी हिंसकच असते. स्वतःला ओरबाडत, रक्तबंबाळ करत क्रूर थंडबुद्धीने केलेली. ती समजण्याची क्षमता जितकी जास्त तितकं येणारं वैफल्यही जास्त. "आदिमायेचे' मधला तरंगही अठ्ठाविसाव्या वर्षी स्वतःहून ओढवून घेतलेलं मरण दारात येऊन ठेपलेलं असताना स्वतःच्या नकळत स्वतःचा शोध घ्यायला लागतो आणि आपल्या हाताला लागते एक विलक्षण अशी शोधयात्रा. गरगरून टाकणारी माणसं, भोवंडून टाकणारा त्यांच्या जगण्याचा वेग आणि त्या सगळ्याला आवाक्‍यात घेणारी कमालीची रसरशीत, जिवंत, गोळीबंद भाषा. थेट अठ्ठावीस वर्षे वयाच्या ग्लोकल तरुणाची!लेखकाचं नाव राही. राही अनिल बर्वे. (या नावाचा उत्तरार्ध जाणकार मराठी वाचकांना चांगलाच परिचित आहे.) वय 28 वर्षे. एवढ्यातच त्याच्या नावावर "मांजा' नावाची आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेती फिल्म आहे. मुंबईत रस्त्यावर राहणाऱ्या बहीणभावंडांच्या आयुष्यावर असलेली ही फिल्म बघून "स्लमडॉग'चा दिग्दर्शक डॅनी बोएल कसा प्रभावित झाला त्याच्या गोष्टी इंटरनेटवर वाचायला मिळतात. डॅनी बोएलच्या ब्ल्यू रे डीव्हीडीसोबत "मांजा'ची डीव्हीडी दिली जाते. या 42 मिनिटांच्या फिल्ममध्ये चटका लावून जाणाऱ्या कथेसोबतच लक्षात राहतात ते देखण्या फ्रेम्समधले शॉर्टस्‌. एका मुलाखतीत राही म्हणतो, मांजाचं मूळ बजेट 24 लाखांचं होतं, 45 माणसं आणि 32 दिवसांची गरज होती. दोन वर्ष पैशांसाठी अथक परिश्रम करून हरल्यानंतर आम्ही सात जणांनी (त्यातले 3 अभिनेते) 60 हजारांत आणि नऊ दिवसांत बनवला. "मांजा'ला मिळालेलं यश म्हणजे "बिगिनर्स लक' असं म्हणत तो पुढच्या फिल्मच्या "तुंबाड'च्या तयारीलाही लागला आहे. "आदिमायेचे' हा त्याआधीचा टप्पा. त्याहीआधी पूर्णविरामानंतर हा कथासंग्रह. पण हा कथासंग्रह वाचून कुणी लेखकाबद्दल मत बनवायला जाईल, तर फसगत व्हायचीच शक्‍यता जास्त. कारण "पूर्णविरामानंतर' 11 वर्षांनी "आदिमायेचे' ही कादंबरी राहीनं लिहिली आहे. ही मरणाच्या दारात उभं राहून आपल्या अवघ्या 28 वर्षांच्या आयुष्याचा वेध घेऊ पाहणाऱ्या एका तरंग नावाच्या तरुणाची गोष्ट.तरंगचं सगळं आयुष्यच बेफाट. तशीच त्याच्या आयुष्यात असलेली माणसंही. नैतिकता-अनैतिकतेच्या समाजमान्य चौकटीच्या आसपासही न फिरणारी. त्यांच्या लेखी जगणंच इतकं महत्त्वाचं, की अशा कोणत्याही चौकटी संदर्भहीन ठराव्यात. कोणत्याही समाजात अशी माणसं असतातच. त्यांचं काय करायचं हे समाजाला कळत नसतं आणि समाजाचं काय करायचं हे त्या माणसांना वळत नसतं. त्यामुळे दोघंही एकमेकांना फाट्यावर मारत राहतात. तरंगच्या या आयुष्यात सगळी माणसं अशीच. वसुषेण मिथ्रिल, इंद्रदेव कोट्टीयन, अस्सल पारशी मेहरा, स्वामीनायकन या सगळ्या व्यक्तिरेखा आपल्याच समाजातल्या; पण आपल्या जगण्याच्या परिघापलीकडच्या. जाहिरातीसारखं क्षेत्र आपल्याला रोज दिसणारं; पण त्यात आत काय चालतं, त्याचे आंतरराष्ट्रीय लागेबांधे या सगळ्याशी तसा सामान्य मराठी समाज अनभिज्ञच. या सगळ्या माणसांमुळे, त्यांच्या जगण्यामुळे मराठी असूनही ही कादंबरी सुरुवातीपासूनच मराठीपणाच्या कक्षांपलीकडची आहे. ती मराठी आहे आणि तरीही मराठी नाही, हे तिचं वेगळेपण! दुसऱ्याचं दुख उमजण्याची क्षमता असलेला आणि त्यामुळेच वेदनेचा जन्मजात शाप घेऊन आलेला तरंग या सगळ्यातून भिरभिरत राहतो. आपलं मरण समोर दिसत असतानाही त्याला अप्रूप वाटत राहतं ते लाटांशी बिनदिक्कतपणे जीवघेणा खेळ खेळणाऱ्या इवल्याशा फुलपाखराचं. कारण तोही आपल्या आयुष्याशी असाच खेळला आहे. या कादंबरीची म्हणून सलग अशी "गोष्ट' नाही. तरंगला आठवत गेलेलं त्याचं आयुष्य हेच तिचं कथानक; पण त्या सगळ्याला ना काळाची म्हणून सुसूत्रता आहे, ना कथानकाची. तरंगच्या प्रत्येक सांगण्यात "बिटविन द लाईन्स'ही भरपूर. त्यामुळेच त्या शोधत, समजून घेत, लेखकानं मांडलेले भाषेचे खेळ अनुभवताना आपली पुरती दमछाक होते. राहीनं मात्र हे सगळे खेळ सहजपणे पेलले आहेत. या कादंबरीतून दिसणारा एक सामाजिक फरक नोंदवण्यासारखा आहे. तरंगला "जन्म दिलेला माणूस' आणि त्या माणसाच्या मित्रानं साठीच्या दशकात आपले कम्युनिस्ट मित्र सोबत घेऊन "गाय आमची माता आहे, तिची हत्या थांबवा' असं म्हणत गायीला घेऊन मोर्चे काढणाऱ्या संघ कार्यकर्त्यांच्या मोर्चात "म्हैस आमची मावशी आहे, तिचीही हत्या थांबवा' असं म्हणत म्हैस घेऊन सामील व्हायचा आचरटपणा केलेला असतो. तरंग आणि एकविसाव्या शतकातले त्याचे मित्र अशा सामाजिक पातळीवर जगतच नाहीत. त्यांचं सगळं जगणं व्यक्तिवादी आहे. आपल्या अव्यवहारी कम्युनिस्ट बापजाद्यांसारखा हमखास बुडण्यासाठीचे व्यवसाय ते करत नाहीत. ते नीट बिझनेस करतात. पैसा मिळवतात. आपल्या कर्तृत्वाने तो बुडवतात ही गोष्ट वेगळी. ही कादंबरी म्हणजे निव्वळ वेदनांचा प्रवास आहे. प्रत्येकाच्या वेदनेची जातकुळी वेगळी. त्यातही बाईच्या वाट्याला आलेल्या वेदना अधिक करूण. त्यांची अपरिहार्यता कळायला तिथं तरंगच बनायला हवं. आणि ती पोहोचवायला शब्द या माध्यमाची ताकद माहीत असणारा लेखक हवा. राही हा ती ताकद माहीत असलेला ताज्या दमाचा लेखक आहे.

Thursday, January 14, 2010

विद्यार्थी मित्रांनो, जगण्यात मजा आहे...---

एक तरूण एका मानसोपचारतज्ञांना भेटायला आला. तो शिकणारा विद्यार्थी होता. आपल्याला जगायचंच नाहीय असं त्याचं म्हणणं होतं. जगण्यात कसा अर्थ नाही ते तो पुन्हा पुन्हा सांगत होता. मी आज ना उद्या माझं जीवन संपवल्याशिवाय राहणार नाही.बोलता बोलता तो थांबला आणि टेबलवर असलेल्या पाण्याच्या ग्लासकडे बोट दाखवून म्हणाला, या ग्लासमध्ये अगदी काठोकाठ मीठ भरलं तर काय होईल? सॅच्युरेशन! तेच झालंय माझ्या आयुष्याचं. म्हणून मला जगायचं नाहीय.आपण आपली बाजू मांडताना केवढा चांगला युक्तिवाद केला अशा थाटात तो होता.मानसोपचारतज्ञ शांतपणे म्हणाले, पण हेच मीठ चांगल्या पिंपभर पाण्यात घातलं, वर साखर आणि लिंबू घातलं तर उत्तम सरबत होईल. कितीतरी तहानलेल्यांना ते थंडावा देईल!या युक्तिवादावर त्या तरूणाकडे उत्तर नव्हतं. कारण विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, जगण्याला उत्तर जगणं हेच असू शकतं.कारण खरी मजा जगण्यातच आहे. पर्ल बकच्या "द गुड अर्थ' मधला कोवळा चिनी शेतकरी तुम्हाला माहीत आहे का? किंवा मार्गारेट लंडनच्या "गॉन विथ द विंड'मधली एवढीशी स्कार्लेट ओ हारा?जगावं की मरावं असा प्रश्‍न पडावा अशी संकटं त्यांच्यावर येतात. पण एखादी दोरी घेऊन गळफास लावावा आणि सगळे प्रश्‍न एकदाचे संपवून टाकावेत हा "सोपा' पर्याय ते निवडत नाहीत. ते निवडतात जगण्याशी भिडण्याचा मार्ग. कधी थकतात. कधी थांबतात. कधी आनंदाच्या शिखरावर चढतात. पण ते लढतात.आपल्याकडेही जगण्याशी भिडणाऱ्यांची उदाहरणं काही कमी नाहीत. रामायण-महाभारतात राम- लक्ष्मणावर पांडवांवर आकाशच कोसळलं होतं, तेव्हा ते तुमच्याच वयाचे होते. शिवाजी महाराजांनी अशाच तुमच्यासारख्याच वयात हिंदवी स्वराज्याचा वसा घेतला आणि अवघ्या मुगल साम्राज्याला अंगावर घेतलं तेव्हा भावी संकटांचा किती ताण त्यांच्या मनावर असेल?देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात नंतर मोठी झालेली अनेकांनी आपल्या शालेय जीवनातच स्वतला इंग्रज राजवटीविरूध्द झोकून दिलं तेव्हा जगण्याचा सगळा ताण त्यांच्यावर असणारच की!तुम्हाला आवडणारे, क्रिकेटपटू घ्या, सिनेमातले हिरो घ्या. त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले ताणतणाव त्यांनी अनुभवलेले असतात. "टू बी ऑर नॉट टू बी' या प्रश्‍नाला तेही सामोरे गेलेले असतात. पण त्यांचं यश हेच असतं की मरावं का या प्रश्‍नाला त्यांनी "जगून बघावं' हेच उत्तर शोधलेलं असतं. दोस्त हो, जगणं सोपं नाही. ते अवघडच आहे. पण म्हणूनच त्याचं आव्हान स्वीकारण्यात खरी गंमत आहे. ही गंमत तुम्ही कधी अनुभवली आहे का?सचिन तेंडुलकरला जास्तीत जास्त रन काढायच्या असतात. पीचवर उभं राहिल्यावर येणारा त्याचा ताण आणि मग मनसोक्त सेंच्युरी मारल्यानंतर हलकं होणारं त्याचं मन... अभ्यासाचा तुम्हाला येणारा ताण आणि चांगले मार्क मिळाल्यावर खुलणारं हसू सचिनपेक्षा वेगळं असू शकतं का सांगा? आहे की नाही यात गंमत?यापेक्षाही जास्त गंमत आपल्या रोजच्या आयुष्यात आहे. फक्त आपल्याकडे बघायची नजर हवी. रोज उगवणारा सूर्य तोच. मावळणारा सूर्य तोच. तीच पूर्व दिशा, तीच पश्‍चिम. पण आपला दिवस मात्र रोज नवा. यात गंमत नाही?एकीकडे रोज सकाळी चिवचिवत येणाऱ्या चिमण्या, तर दुसरीकडे लाखो किलोमीटरचं अंतर कापून आपल्याला दर्शन द्यायला येणारे फ्लेमिंगो ही निसर्गाची किती मोठी गंमत आहे! आपण बटण दाबलं की उजेड पडतो, एक फोन हातात घेतला बोटांच्या टोकावर सगळी दुनिया असते. आपण टीव्ही लावला तर एका क्षणात जगाच्या कानाकोपऱ्यातला "आँखो देखा' समजून घेऊ शकतो. इंटरनेटवर जाऊन माहितीच्या महापुरात हरखून जाऊ शकतो. ही सगळी किती मजा आहे. जगण्यावर प्रेम असणाऱ्या माणसांनी आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीत जीव झोकून दिला. तहानभूक हरपून जगण्याचा शोध घेतला म्हणूनच हे सगळे शोध लागले. ग्रॅहम बेलनं जगण्याचा, अभ्यासाचा किंवा कोणताही ताण सहन होत नाही म्हणून आत्महत्येचा मार्ग निवडला असता तर आपण टेलिफोन आलाच नसता. आपल्याला या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचं कौतुक वाटतं. कवी लोकांना तर जमिनीचं कवच भेदून उगवणाऱ्या हिरव्या कौतुकाची, साध्या गवताच्या पात्याचीही मजा वाटते. अशा पहिल्यावहिल्या हिरव्या तृणपात्याचा सत्कार करायला ते उत्सुक असतात. तेव्हा सगळ्या ताणतणावांना झेलत, आव्हानांना सामोरं जात जगण्याला भिडा. दोस्तहो मनसोक्त जगा.हे सगळं जग खास तुमच्यासाठी आहे.तुम्हाला कुणी दिला आत्महत्या करायचा अधिकार?

Thursday, January 7, 2010

थ्री इडियट्‌स' आणि शहाणा लेखक

चेतन भगतच्या बाबतीत "आम के आम, गुठलियोंके भी दाम' ही म्हण सध्या अगदी फिट्ट बसणारी आहे. प्रसिद्ध झालेल्या तीनही पुस्तकांना तरुणांच्या पातळीवरून देशभर प्रचंड लोकप्रियता, डोळे फिरविणारे खपाचे आकडे, हे कमी म्हणून की काय त्यावरून बॉलीवूडमध्ये आमीर खानसारख्या कलाकाराला घेऊन निघणारा सिनेमा, विधू विनोद चोप्रासारखा निर्माता, राजकुमार हिरानीसारखा दिग्दर्शक, "थ्री इडियट्‌स'लाही प्रेक्षकांचा तुफानी प्रतिसाद आणि हे सगळं कमी आहे म्हणून की काय बॉलीवूडमध्ये नेहमीच पथ्यावर पडणारी कॉन्ट्रोव्हर्सी."थ्री इडियट्‌स'च्या श्रेयनामावलीत चेतन भगतच्या बाबतीत नेमकं काय झालं, ते जसजसं पुढे येत गेलं तसतशी सगळी सहानुभूती चेतनला मिळत जाणं अगदी साहजिक होतं. गेली चार-पाच वर्ष सतत चर्चेत असलेला हा भारतातल्या तरुणांचा आवडता, बेस्ट सेलर तरुण लेखक. आयआयटी दिल्ली आणि आयआयएमचा पदवीधर. आंतरराष्ट्रीय पातळीवरची बॅंकिंगच्या क्षेत्रातली नोकरी सोडून पूर्णवेळ लेखक बनायचं त्यानं ठरवलं आणि "फाइव्ह पॉइंट समवन, व्हॉट नॉट टू डू ऍट आयआयटी' ही त्याची पहिली कादंबरी आली. काहीशी आत्मचरित्रात्मक. वेगवगेळ्या पार्श्‍वभूमीतून आयआयटीत गेलेली तीन पोरं एकमेकांचे मित्र बनतात आणि आपल्या तिथल्या शिकण्याच्या काळात काय करतात त्याचं वर्णन करणारी ही धमाल कादंबरी तरुणांनी उचलून धरली नसती तरच आश्‍चर्य होतं. शिकण्यासाठी जिथं समाजातलं बुद्धिमत्तेचं "क्रीम' जमा होतं, असं आयआयटीसारखं ठिकाण असलं म्हणून काय झालं, तिथंही कॉलेज लाईफच्या बाबतीत इतर कॉलेजांपेक्षा फार वेगळं काही चालत नाही, हे अधोरेखित करीत "फाईव्ह पॉइंट'नं आयआयटीचं दारच जगाला उघडून दिलं. पुस्तक तुफान खपलं. पहिल्या पुस्तकानंच चेतनला तरुणांचा आयकॉन बनवलं. तो झपाटा ओसरायच्या आतच "वन नाईट ऍट कॉल सेंटर' आलं. प्रवासात लेखकाला एक तरुणी भेटते. वेळ घालविण्यासाठी दोघं गप्पा मारत असतात. ती त्याला एक गोष्ट सांगायला लागते. त्याआधी तिची अट असते, की त्या गोष्टीवर त्यानं आपलं दुसरं पुस्तक लिहिलं पाहिजे. त्याला ही अट थोडी खटकते; पण तरीही जातिवंत लेखकाप्रमाणे तो तिची गोष्ट ऐकायचं कबूल करतो. एका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या सहा जणांची गोष्ट ती सांगायला लागते. त्यांना त्या कॉल सेंटरमध्ये काम करीत असताना एका रात्री एक फोन येतो. थेट देवाकडून. त्याची गोष्ट म्हणजे वन नाईट ऍट कॉल सेंटर. आजच्या तरुणांची भाषा बोलणारं, त्यांच्या विश्‍वाबद्दल सांगणारं हे पुस्तकही तरुणांनी डोक्‍यावर घेतलं."द थ्री मिस्टेक्‍स ऑफ माय लाईफ' हे चौथं पुस्तक चेतननं लिहिलं. अहमदाबादमध्ये गोविंद नावाचा तरुण आपल्या दोन मित्रांसह खेळाचं साहित्य विकणारं दुकान सुरू करतो. त्यांना पैसे मिळवायचे असतात. यशस्वी व्हायचं असतं; पण ते काही सहजसोपं नसतं. भूकंप होतो, गुजरात दंगल होते, प्रेम प्रकरण आडवं येतं. मित्रांमध्ये समज - गैरसमज होतात. या सगळ्याचा खोलवर परिणाम होत त्यांच्या स्वप्नाचा प्रवास सुरू राहतो. त्याची गोष्ट म्हणजे "द थ्री मिस्टेक्‍स ऑफ माय लाईफ'. "टू स्टेटस- द स्टोरी ऑफ माय मॅरेज' हे चेतनचं चौथं पुस्तक आहे. पहिल्या पुस्तकाप्रमाणेच तेही आत्मचरित्रात्मक आहे. धर्म, जात, वंश, राज्य, भाषा अशा सगळ्या गोष्टींत विविधता असणाऱ्या भारतासारख्या देशात लव्ह मॅरेज करताना मुलगा-मुलगी एकमेकांना आवडले एवढंच पुरेसं नसतं. दोघांच्या घरातल्या लोकांनाही ते आवडावे लागतात. क्रिश आणि अनन्या यांच्या घरांतूनही विरोध असतो. तरीही ते लग्न करतात आणि सगळ्या संघर्षाला कसे तोंड देतात, त्याची धमाल या पुस्तकात आहे. चेतनच्या या पुस्तकालाही तरुणांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. त्याला "थ्री इडियट्‌स'मुळे निर्माण झालेल्या वादंगाचीही पार्श्‍वभूमी आहे. त्याच्या "वन नाईट ऍट कॉल सेंटर' या कादंबरीवरून हॅलो नावाचा सिनेमा आला होता. त्या सिनेमाचं स्क्रिप्टही चेतननंच लिहिलं होतं. तो सिनेमा व्यावसायिकदृष्ट्या फारसा यशस्वी झाला नाही; पण "फाईव्ह पॉइंट समवन'वरचा "थ्री इडियट्‌स' मात्र निर्मिती प्रक्रियेपासूनच चर्चेत होता. आता निर्मात्या, दिग्दर्शकाबरोबरच्या वादंगाची फोडणी त्याला मिळाली आहे. त्याचा सगळ्यात जास्त फायदा अर्थातच चेतनलाच होतो आहे. कारण- एक तर तो तरुणांचा आयकॉन ठरलेला, गेली काही वर्षे चर्चेत असलेला लेखक आहे. भारतातला आजवरचा सर्वाधिक खपाचा इंग्रजी कादंबरीकार असं "न्यूयॉर्क टाइम्स'नं त्याचं वर्णन केलं आहे. यावरून चेतनच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल. "फाइव्ह पॉईंट समवन'वरून प्रेरणा घेऊन एखादा सिनेमा काढला जात असेल, तर लेखकाचं जे असेल ते श्रेय त्याला द्यायलाचं हवं, असंच जनमत आहे. चेतननं या विषयावर त्याच्या ब्लॉगवर लिहिलेल्या लेखांना ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत, त्यावरून हाच सूर आहे. ैया सगळ्याबद्दल चेतन त्याच्या ब्लॉगवर लिहितो, थ्री इडियट्‌स हा सिनेमा कादंबरीवर आधारित आहे, असं म्हटलं जातं तेव्हा तो सिनेमा कादंबरीपासून वेगळा कसा होऊ शकतो? राजकुमार हिरानी आणि अभिजात जोशी दोघांनीही सिनेमाची पटकथा लिहिली आहे; पण, सिनेमाची स्टोरी मूळ त्यांची नाही हे ते का लपवून ठेवत आहेत? त्यांनी माझ्या स्टोरीवर आधारित सिनेमा बनवला आहे; नवीन स्टोरी तयार केलेली नाही. मग त्यांनी माझं श्रेय का नाकारावं? माझं म्हणणं इतकंच आहे, की लेखकाच्या श्रेयनामावलीत माझंही नाव द्या.चेतनचे मुद्दे कुणालाही पटतील असेच आहेत. कादंबरीचे हक्क विकले, तसं कॉन्ट्रॅक्‍ट केलेलं असलं तरी लेखकाला त्याचं श्रेय मिळायलाच हवं. चेतनसाठी जमेची बाजू म्हणजे आज सगळी तरुणाई त्याच्या बाजूनं आहे. नैतिक लढाई त्यानं जिंकल्यातच जमा आहे.हा सगळा वादविवाद बाजूला ठेवला आणि निव्वळ लेखक म्हणून चेतन भगत कसा आहे? चेतन वर्तमानकाळाचा लेखक आहे. तो आजच्या, आत्ताच्या विषयांना भिडतो. तो तरुण असल्यानं त्याचे विषयही तरुणांचे असतात. त्यामुळे कॉलेजजीवन, कॉल सेंटर, बिझनेस करणं आणि त्या सगळ्यातून येणारे अनुभव तो मांडतो. त्याच्या लिखाणात एक प्रकारचा सच्चेपणा आहे. त्याची पात्रं याच मातीतून जन्मलेली, इथलीच असतात. साधी सोपी, प्रवाही इंग्रजी ही तर त्याची सर्वांत मोठी जमेची बाजू आहे. त्याची भाषा गोष्टीवेल्हाळ, वर्णनात्मक आहे. माणसाबद्दलचं अपार कुतूहल, जगण्यातल्या विसंगतीतून निर्माण होणारा विनोद आणि चेतन त्यातून टिपतो ते कारुण्य यामुळे त्याच्या कादंबऱ्या वेगळ्या ठरतात. लेखकाकडे असावी लागते ती करुणा चेतनकडे नक्कीच आहे. मनोरंजन हे आपल्या कादंबरीलिखाणाचं महत्त्वाचं मूल्य आहे हे त्यालाही मान्य आहे. पुस्तक, सिनेमा हे मनोरंजनासाठी असतात. मला जे गंभीरपणे सांगायचं असतं, त्यासाठी मी स्तंभलेखन करतो, असंही तो सांगतो. (चेतनबाबत काही गमतीशीर निरीक्षणंही आहेत. त्याच्या एका तरी पात्राचं नाव श्रीकृष्णाशी संबंधित म्हणजे गोविंद, हरी, श्‍याम असतं. त्याच्या प्रत्येक कादंबरीच्या नावात एक तरी अंक असतो. उदा. फाइव्ह पॉईंट समवन, वन नाईट ऍट कॉल सेंटर, थ्री मिस्टेक्‍स ऑफ माय लाईफ इत्यादी. त्याबद्दल चेतन म्हणतो. शेवटी मी एक बॅंकर आहे. आकडे माझ्या डोक्‍यातून जातच नाहीत. असो!)वेबसाईट, ब्लॉग, ट्‌विटर अशा आजच्या काळातल्या संपर्कमाध्यमांचा तो पुरेपूर वापर करतो. ट्‌विटरवर तर चेतनचे 27,000 फॉलोअर्स आहेत. पायरेटेड पुस्तकं घ्यावीत की नाही या मुद्द्यावरून अलीकडेच त्याचा ट्‌विटरवर त्याच्या दोन वाचकांशी घनघोर वाद झाला. चेतननं चिडून त्यांचे ट्‌विट्‌स ब्लॉक करण्यापर्यंत मजल गेली होती. चेतन भगतच्या लिखाणाला नाकं मुरडणारे, त्याला निव्वळ "पॉप्युलर' लेखकांच्या पंक्तीत बसविणारेही आहेत; पण पहिल्याच पुस्तकानं तरुणांचा आयकॉन बनलेला चेतन आता या सगळ्यांच्या पलीकडे पोचला आहे.

आलाप चित्रांमधले!

चित्रकाराचं नाव होतं, यशोवर्धन. कुठेतरी माहिती वाचली होती की तो कुमार गंधर्वांचा मुलगा. पण तसलं काहीही डोक्‍यात न राहता निव्वळ चित्रं बघायची म्हणून त्याची चित्रं बघायला गेले. तो रंगरेषांचा, लयीचा, नादाचा, तालाचा उत्सव होता. जाणवणारही नाहीत असे रंग, नृत्यांगनेची लय पकडणाऱ्या मोजक्‍या रेषा... एकेका चित्रावरून नजर फिरत नव्हती. नृत्यांगनेच्या गिरकीचं चित्रं... गिरकी कधी पकडता येते का? पण त्या गिरकीनं निर्माण झालेली लय तर पकडता येते... हे कधीच लक्षात कसं आलं नाही? कोणतीही हालचाल बाई लयबध्द करते तर पुरूषाच्या हालचालीत आवेश असतो. त्यामुळे तिच्या उठण्याबसण्यात नाजूकपणा तर त्याच्या वागण्यासवरण्यात ताकद. यशोवर्धननं हे सगळं नेमकं पकडलं होतं. नुसतंच पकडलं नव्हतं तर जाणवून दिलं होतं. आणि हे जाणवून देणंही कसं तर त्यातली तरलता मनात रेंगाळत राहील असं. कॅनव्हासवर अवतरलेली ही चित्रं, चित्रं नाहीतच. चित्रकाराच्या मनात चाललेला रंगरेषांचा खेळच तो. कागदावर तो जेवढा उतरला त्याच्या कितीतर पट तरलतेने त्याच्या मनात रंगला असेल. एक चित्र पहावं, तिथेच थबकावं तर वाटतं हातात काहीतरी सापडतंय...आणि पुढे जावं तर काहीतरी निसटल्याची भावना. पण निसटलं तरी कसं म्हणायचं? कारण पुढेही तितकंच तरल काहीतरी आहेच...फिगरेटिव्ह आणि ऍब्सर्डिटीच्या मधलं काहीतरी... कळतंयही पण कळतही नाही... सापडतंय पण सापडतंही नाही! गिरकी घेणारी नृत्यांगना, तिच्याभोवतीची वलयं हे सगळं पुन्हापुन्हा कुठेतरी ओळखीचं वाटतंय. पण त्यात काय ओळखीचं आहे ते शोधताना अचानक मनात कुठेतरी निनादले ते कुमारजींचे आलाप. त्या सगळ्या गिरक्‍यांमध्ये, त्या चित्रांमधल्या वलयांमध्येही आलाप होते. कुमारजींच्या आलापांनी कानांभोवती रिंगण घातलं होतं, तर या आलापांनी नजरेभोवती रिंगण घातलं. त्यांनी सुरांना नृत्य करायला लावलं होतं. यशोवर्धननं रंगरेषांना नृत्याच्या माध्यमातून आलाप घ्यायला लावले आहेत.