Friday, January 29, 2010

मराठी आणि मराठीपणाच्या पलीकडेही!

कुणीतरी म्हटलंय, "रायटिंग इज व्हायोलन्स अगेन्स्ट मायसेल्फ'लिहिणं ही मी माझ्याविरुद्ध केलेली हिंसा असते. स्वतःचा शोध घेण्याची प्रक्रिया ही अशी हिंसकच असते. स्वतःला ओरबाडत, रक्तबंबाळ करत क्रूर थंडबुद्धीने केलेली. ती समजण्याची क्षमता जितकी जास्त तितकं येणारं वैफल्यही जास्त. "आदिमायेचे' मधला तरंगही अठ्ठाविसाव्या वर्षी स्वतःहून ओढवून घेतलेलं मरण दारात येऊन ठेपलेलं असताना स्वतःच्या नकळत स्वतःचा शोध घ्यायला लागतो आणि आपल्या हाताला लागते एक विलक्षण अशी शोधयात्रा. गरगरून टाकणारी माणसं, भोवंडून टाकणारा त्यांच्या जगण्याचा वेग आणि त्या सगळ्याला आवाक्‍यात घेणारी कमालीची रसरशीत, जिवंत, गोळीबंद भाषा. थेट अठ्ठावीस वर्षे वयाच्या ग्लोकल तरुणाची!लेखकाचं नाव राही. राही अनिल बर्वे. (या नावाचा उत्तरार्ध जाणकार मराठी वाचकांना चांगलाच परिचित आहे.) वय 28 वर्षे. एवढ्यातच त्याच्या नावावर "मांजा' नावाची आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेती फिल्म आहे. मुंबईत रस्त्यावर राहणाऱ्या बहीणभावंडांच्या आयुष्यावर असलेली ही फिल्म बघून "स्लमडॉग'चा दिग्दर्शक डॅनी बोएल कसा प्रभावित झाला त्याच्या गोष्टी इंटरनेटवर वाचायला मिळतात. डॅनी बोएलच्या ब्ल्यू रे डीव्हीडीसोबत "मांजा'ची डीव्हीडी दिली जाते. या 42 मिनिटांच्या फिल्ममध्ये चटका लावून जाणाऱ्या कथेसोबतच लक्षात राहतात ते देखण्या फ्रेम्समधले शॉर्टस्‌. एका मुलाखतीत राही म्हणतो, मांजाचं मूळ बजेट 24 लाखांचं होतं, 45 माणसं आणि 32 दिवसांची गरज होती. दोन वर्ष पैशांसाठी अथक परिश्रम करून हरल्यानंतर आम्ही सात जणांनी (त्यातले 3 अभिनेते) 60 हजारांत आणि नऊ दिवसांत बनवला. "मांजा'ला मिळालेलं यश म्हणजे "बिगिनर्स लक' असं म्हणत तो पुढच्या फिल्मच्या "तुंबाड'च्या तयारीलाही लागला आहे. "आदिमायेचे' हा त्याआधीचा टप्पा. त्याहीआधी पूर्णविरामानंतर हा कथासंग्रह. पण हा कथासंग्रह वाचून कुणी लेखकाबद्दल मत बनवायला जाईल, तर फसगत व्हायचीच शक्‍यता जास्त. कारण "पूर्णविरामानंतर' 11 वर्षांनी "आदिमायेचे' ही कादंबरी राहीनं लिहिली आहे. ही मरणाच्या दारात उभं राहून आपल्या अवघ्या 28 वर्षांच्या आयुष्याचा वेध घेऊ पाहणाऱ्या एका तरंग नावाच्या तरुणाची गोष्ट.तरंगचं सगळं आयुष्यच बेफाट. तशीच त्याच्या आयुष्यात असलेली माणसंही. नैतिकता-अनैतिकतेच्या समाजमान्य चौकटीच्या आसपासही न फिरणारी. त्यांच्या लेखी जगणंच इतकं महत्त्वाचं, की अशा कोणत्याही चौकटी संदर्भहीन ठराव्यात. कोणत्याही समाजात अशी माणसं असतातच. त्यांचं काय करायचं हे समाजाला कळत नसतं आणि समाजाचं काय करायचं हे त्या माणसांना वळत नसतं. त्यामुळे दोघंही एकमेकांना फाट्यावर मारत राहतात. तरंगच्या या आयुष्यात सगळी माणसं अशीच. वसुषेण मिथ्रिल, इंद्रदेव कोट्टीयन, अस्सल पारशी मेहरा, स्वामीनायकन या सगळ्या व्यक्तिरेखा आपल्याच समाजातल्या; पण आपल्या जगण्याच्या परिघापलीकडच्या. जाहिरातीसारखं क्षेत्र आपल्याला रोज दिसणारं; पण त्यात आत काय चालतं, त्याचे आंतरराष्ट्रीय लागेबांधे या सगळ्याशी तसा सामान्य मराठी समाज अनभिज्ञच. या सगळ्या माणसांमुळे, त्यांच्या जगण्यामुळे मराठी असूनही ही कादंबरी सुरुवातीपासूनच मराठीपणाच्या कक्षांपलीकडची आहे. ती मराठी आहे आणि तरीही मराठी नाही, हे तिचं वेगळेपण! दुसऱ्याचं दुख उमजण्याची क्षमता असलेला आणि त्यामुळेच वेदनेचा जन्मजात शाप घेऊन आलेला तरंग या सगळ्यातून भिरभिरत राहतो. आपलं मरण समोर दिसत असतानाही त्याला अप्रूप वाटत राहतं ते लाटांशी बिनदिक्कतपणे जीवघेणा खेळ खेळणाऱ्या इवल्याशा फुलपाखराचं. कारण तोही आपल्या आयुष्याशी असाच खेळला आहे. या कादंबरीची म्हणून सलग अशी "गोष्ट' नाही. तरंगला आठवत गेलेलं त्याचं आयुष्य हेच तिचं कथानक; पण त्या सगळ्याला ना काळाची म्हणून सुसूत्रता आहे, ना कथानकाची. तरंगच्या प्रत्येक सांगण्यात "बिटविन द लाईन्स'ही भरपूर. त्यामुळेच त्या शोधत, समजून घेत, लेखकानं मांडलेले भाषेचे खेळ अनुभवताना आपली पुरती दमछाक होते. राहीनं मात्र हे सगळे खेळ सहजपणे पेलले आहेत. या कादंबरीतून दिसणारा एक सामाजिक फरक नोंदवण्यासारखा आहे. तरंगला "जन्म दिलेला माणूस' आणि त्या माणसाच्या मित्रानं साठीच्या दशकात आपले कम्युनिस्ट मित्र सोबत घेऊन "गाय आमची माता आहे, तिची हत्या थांबवा' असं म्हणत गायीला घेऊन मोर्चे काढणाऱ्या संघ कार्यकर्त्यांच्या मोर्चात "म्हैस आमची मावशी आहे, तिचीही हत्या थांबवा' असं म्हणत म्हैस घेऊन सामील व्हायचा आचरटपणा केलेला असतो. तरंग आणि एकविसाव्या शतकातले त्याचे मित्र अशा सामाजिक पातळीवर जगतच नाहीत. त्यांचं सगळं जगणं व्यक्तिवादी आहे. आपल्या अव्यवहारी कम्युनिस्ट बापजाद्यांसारखा हमखास बुडण्यासाठीचे व्यवसाय ते करत नाहीत. ते नीट बिझनेस करतात. पैसा मिळवतात. आपल्या कर्तृत्वाने तो बुडवतात ही गोष्ट वेगळी. ही कादंबरी म्हणजे निव्वळ वेदनांचा प्रवास आहे. प्रत्येकाच्या वेदनेची जातकुळी वेगळी. त्यातही बाईच्या वाट्याला आलेल्या वेदना अधिक करूण. त्यांची अपरिहार्यता कळायला तिथं तरंगच बनायला हवं. आणि ती पोहोचवायला शब्द या माध्यमाची ताकद माहीत असणारा लेखक हवा. राही हा ती ताकद माहीत असलेला ताज्या दमाचा लेखक आहे.

No comments:

Post a Comment