Sunday, April 18, 2010

कुतुहलांचा देश

केसरी टूर्सच्या "माय फेअर लेडी'बरोबर थायलंडला जायचं ठरलं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आठवला पुलंच्या "पूर्वरंग'मधला सयाम! भरपूर पाण्याचा, त्यामुळेच कालव्यांचा देश. दोन्ही हात जोडून ऱ्हदयापासून नमस्कार करणाऱ्या लोकांचा देश! त्याही पूर्वीचा "ऍना अँड द किंग ऑफ सयाम'मधल्या राजपुत्र महामोंगकूटचा देश! पिढ्यानपिढ्या गुलामगिरीत पिचलेल्या या देशात साधारण दीडशे वर्षांपूर्वी ऍना नावाची ब्रिटिश शिक्षिका राजघराण्यातल्या मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी येते. तिथली गुलामगिरी बघून तडफडते, कळवळते. पण त्याचबरोबर शांतपणे मुख्य राजपुत्राच्या, महामोंगकूटच्या मनावर समतेचे, बंधुतेचे संस्कार करते. दोन तीन वर्षात ती निघून जाते. पण तरूणपणी राजा बनल्यावर हाच महामोंगकूट एका फटक्‍यात कायद्यानं गुलामगिरी बंद करून टाकतो. एक साधी शिक्षिका एका देशाचं भवितव्यच कसं बदलून टाकू शकते हे सांगणाऱ्या या कादंबरीनं थायलंडबद्दल कुतुहल निर्माण करण्याचं काम चोख बजावलं होतं. प्रत्यक्ष थायलंडला गेल्यावरही हे कुतुहल पावलोपावली भेटत राहिलं. कधी तृतीयपंथीयांच्या गेली 28 वर्षे सुरू असलेल्या अल्काझार शोच्या रूपात. कधी वॉकिंग स्ट्रीटच्या रूपात. कधी खुलेआम चालणाऱ्या ऍडल्ट शोच्या रूपात. या देशाला स्त्रीदेहाच्या प्रदर्शनाचं, व्यापाराचं, त्यातून मिळणाऱ्या डॉलरचं जराही वावडं नाही, याचा अचंबा वाटावा, पट्टायात चालणारं सेक्‍स टुरिझमचं उघडंनागडं स्वरूप बघून डोकं आणि मन गरगरावं तर बॅंकाकमध्ये भलीमोठी, देखणी बुध्दमंदिरं समोर येतात. आपल्याकडे गणेशोत्सवात आणि एरवीही जसा गणपती वेगवेगळ्या लडिवाळ रूपात दिसतो तसाच यांचा बुध्दही. विश्रांती घेत असलेला, ध्यान लावून बसलेला, चालणारा आणि सोन्याचा बुध्द! वयाच्या विसाव्या वर्षी प्रत्येक थायी पुरूषाला एक वर्षभरासाठी बौध्द भिख्खू बनावं लागतं. आणि नंतरही संसाराचा, नोकरीबिकरीचा कंटाळा आला, विरक्‍त व्हावंसं वाटलं, तर तीन महिन्यांसाठी भिख्खू बनता येतं. त्यासाठी कायद्यानं तीन महिने भर पगारी सुट्टी मिळते.म्हणजे एकीकडे सेक्‍स टुरिझमसाठी विदेशी पर्यटकांना मखमली पायघड्या आणि दुसरीकडे तात्पुरत्या विरक्तीसाठी भरपगारी रजा!बॅंकॉकमधल्या गोल्डन बुध्दाची गोष्टही अशीच! दहा फूट उंच आणि साडेपाच टन किलो वजनाच्या या मूर्तीचं मूळ तेराव्या शतकापर्यंत जातं. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी थायलंडमधल्या अयुध्यावर बर्मी लोकांनी आक्रमण केलं. या आक्रमकांपासून मूर्तीचं रक्षण करण्यासाठी तत्कालीन भिख्खूंनी तिच्यावर मातीसदृश पण कठीण लिंपण केलं. ती मूर्ती बॅंकॉकला आणण्यात आली. 1955 मध्ये मूर्ती नवीन मोठ्या मंदिरात ठेवायची होती. त्यासाठी क्रेनमधून नेताना मूर्ती खाली पडली. हा अपशकून मानून मूर्ती वाहून नेणारे मजूर पळून गेले. रात्रभर मूर्ती तशीच पावसात पडून राहिली. दुसऱ्या दिवशी तिची परिस्थिती बघण्यासाठी आलेल्या भिख्खूंना दिसली ती पावसानं सगळं लिंपण वाहून गेल्यानंतरची लखलखीत सोन्याची मूर्ती! देवळात त्या मूर्तीसमोर बसून हे सगळं ऐकताना फक्त 55 वर्षांपूर्वी घडून गेलेलं हे सगळं अद्‌भूत तसंच्या तसं डोळ्यासमोर उभं राहतं. दगडमातीची म्हणून वाहून नेली जात असलेली मूर्ती अशी सोन्यानं झळाळत समोर आल्यावर त्या भिख्खूंच्या डोळ्यांत काय उमटलं असेल याची कल्पनाच केलेली बरी! थायलंड समोर येतो तो आपल्या देशात आलेल्या पर्यटकांना खूष करून टाकण्याचं व्रत घेतल्यासारखा. स्त्रीदेहापलीकडे ज्यांना निसर्ग, समाज- संस्कृतीबिंस्कृती अशा कशातच रस नाही, त्यांच्यासाठीचा थायलंड वेगळा. पण ज्यांना निसर्गाबरोबर समाधी लावायची आहे, त्यांच्यासाठी पांढरीशुभ्र वाळू आणि निळंशार पाणी असलेला कमालीचा नितळसुंदर समुद्र आहे. पर्यटनाच्या चौकटीत राहून ज्यांना साहस अनुभवायचं आहे, त्यांच्यासाठी पॅरासेलिंगचा, समुद्राखालचं अनोखं जग अनुभवण्याचा थरार आहे. जातीच्या खवय्यांसाठी जिभेचे चोचले पुरवणारं थायी कुझीन आहे. (त्यातही कुणाला वेगळेपणाचा आनंद चाखायचा असेल, तर आपल्याकडे गाडीवर वडापाव, भेळ विकली जाते, तसे वेगवेगळ्या प्रकारचे खारवलेले, तळलेले किडे आहेत.) जातीच्या शॉपिंगबहाद्दरांसाठी बॅंकॉकमधल्या बाजारपेठा ओसंडून वहात असतात. पट्टायामध्ये जगातली सर्वात मोठी हिरे- मोत्यांची शोरूम आहे. पण या शोरूममध्ये शिरण्याआधी एका लहानशा ट्रॉलीमधून एक दहा मिनिटांची सैर घडवून आणली जाते. हिऱ्यांच्या खाणीचा आभास निर्माण करून, हिरे कसे सापडतात, त्यांच्यावर कशी प्रक्रिया केली जाते, पैलू कसे पाडले जातात, ही सगळी प्रक्रिया दाखवून ती ट्रॉली आपल्याला सोडते ती हिरे मोत्यांच्या भव्य शोरूम मध्ये. या दहा मिनिटांच्या ट्रेलरसाठी जी वातावरणनिर्मिती केली आहे, तिच्यामुळे हिऱ्यामोत्यांच्या शोरूममधून तुम्ही आपोआपच काहीतरी मौल्यवान खरेदी करून बाहेर पडता. नोंग नूंच व्हिलेजमधला कल्चरल शो असो की हत्तींचा शो. सफारी वर्ल्ड मधला ओरांग ऊटांग शो, डॉल्फिन शो असो की स्टंटमॅन शो!हे सगळे शो तुम्हाला खिळवून ठेवतातच, पण ते सादर करताना कुठेही, थायी भाषेची कास सोडलेली नसते. शोच्या शेवटी इंग्रजीत त्याचा सारांश सांगितला जातो एवढंच. परक्‍यांच्या भाषेला आपलं मानण्यात आणि आपल्या भाषेला परकं करण्यात जगात आपला हात कुणीच धरू शकणार नाही हेच खरं!समुद्रावरचे थरारक खेळ असोत की जंगल सफारी, ते पाहताना वाटत होतं, आपल्याला किती विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला आहे, किल्ले आहेत, जंगलं, प्राणी, हवामान या सगळ्याचं आपल्याकडे किती वैविध्य आहे. आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्याही कमी नाही. पण या सगळ्याचं आपण काय करतो? मुद्दाम जंगलं निर्माण करून, देशाबाहेरून प्राणीपक्षी आणून सफारी वर्ल्ड निर्माण करायची आपल्याला गरज नाही की नोंग नूंचसारखं खेडं तयार करून पर्यटकांना रिझवण्याची आपल्याला काहीच गरज नाही. निसर्गानं, संस्कृतीनं आपल्याला उदंड हस्ते दिलं आहे. गरज आहे ती त्या सगळ्याचं नीट व्यवस्थापन करण्याची!
चौकट
केसरीची "माय फेअर लेडी' चार वर्षांपूर्वी झाली ती थायलंडमधून. "एखादं कुटुंब पर्यटनाला जातं, तेव्हा त्या कुटुंबातली बाई ही नवऱ्याला काय हवं नको, मुलांच्या गरजा यातच गुरफटलेली असते. ती खऱ्या अर्थानं पर्यटनाचा आनंद घेऊ शकत नाही. तिनंही पर्यटन एन्जॉय करावं म्हणून माय फेअर लेडीची कल्पना पुढे आली.' केसरी टूर्सच्या प्रमुख वीणा पाटील सांगतात. आता माय फेअर लेडी दरवर्षी थायलंडच्याच चार टूर करते. त्याशिवाय अमेरिका, इंग्लंडसाठीही माय फेअर लेडीला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आता माय फेअर लेडी देशांतर्गत टूरही करते आहे. "होम मिनिस्टर'चे आदेश बांदेकर माय फेअर लेडीचे ब्रॅंड ऍम्बॅसिटर आहेत. मार्च महिन्यात थायलंडला गेलेला माय फेअर लेडीचा ग्रुप 56 जणींचा होता. यात मायलेकींच्या, विहिणींच्या, नणंदभावजयांच्या जोड्या होत्या. काहीजणी तर मुलीनं, मुलान किंवा सुनेनं टूर गिफ्ट दिली म्हणून एकेकट्याच पहिल्यावहिल्या परदेशप्रवासासाठी आल्या होत्या. वयोगट पंचवीस वर्षापासून 75 वर्षांपर्यंत. ना रोजच्या स्वयंपाकाची कटकट, ना नवऱ्याची, मुलांची भूणभूण, ना रोजच्या रूटीनचा ससेमिरा... रोज नवनवीन गोष्टी बघायच्या, नवनवीन अनुभव घ्यायचे, हसायचं, नाचायचं, गायचं, पाण्यात डुंबायचं, हवेत उडायचं, पाण्याखालचं जग बघायचं... पट्टायात कमीत कमी कपड्यात वावरणाऱ्या स्त्रियांपासून रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या खारवलेल्या किड्यांपर्यंत सगळंच नवीन, वेगळं. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याचा अनुभव असो की आदेश बांदेकर यांच्या भाषेत सगळ्या माय फेअर लेडींचं "इंटरनॅशनल' फॅशन शोमध्ये कॅट वॉक असो, हे आठ दिवस या सगळ्या जणींना पुढची कित्येक वर्षे इतकी उर्जा देतात. जाताना विमानात "ऑरेंज ज्यूस या रेड वाईन' या एअर होस्टेसच्या प्रश्‍नाला एका सत्तरीच्या पुढच्या आजींनी "रेड वाईन' हे उत्तर दिलं आणि डोळे मिचकावून म्हणाल्या एकदा घेऊन बघायचीच होती कशी लागते ते! परतायच्या आदल्या दिवशी ग्रुपमधल्या एका मध्यमवयीन बाईंनी विचारलं, "मला तुमची जीन्स द्याल एक दिवस घालायला. कधीतरी घालून बघायची आहे.'आपल्या मनातल्या गोष्टी करून बघायला आपल्या बायकांना दुसरा देश गाठावा लागतो, हे आपल्या संस्कृतीचं अपयश मानायचं की "माय फेअर लेडी'चं यश?

1 comment:

  1. Yekcha Blog donda post karaychi idea bhari ahe Madam tumchi! Man gaye!

    ReplyDelete