Sunday, April 18, 2010

गंगेमध्ये एक ओंजळ...!

गंगेबद्दल भारतीय माणसाच्या मनात जितका खोलवर रूजलेला जिव्हाळा आहे, तितकीच गंगेच्या प्रदूषणाबद्दल अनास्था. गंगेच्या प्रदूषणामुळे अस्वस्थ झालेल्या फोटोग्राफर विजय मुडशिंगीकरांनी गेली दहा वर्ष आपलं अवघं आयुष्यच गंगार्पण करून टाकलंय. त्यांनी काढलेल्या गंगेच्या विविध फोटोंचं फिरतं प्रदर्शन घेऊन ते येत्या पाच मार्चपासून गंगेच्या उगमापासून ते ती जिथं समुद्राला मिळते त्या टोकापर्यंत फिरणार आहेत. देशभर प्रांतवादाची बिजे पेरली जात असताना एक मराठी माणूस आपल्या खिशाला खार लावून गंगेच्या प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी धडपडतो आहे!
-----
कशासाठी जगायचं या प्रश्‍नाचं उत्तर कुणाला कधी आणि कसं सापडेल याचा नेम नसतो हेच खरं. कुणाला ते आयुष्याच्या सुरूवातीलाच सापडतं आणि त्याच्यासाठी सगळं आयुष्य आनंदयात्रा बनून जातं. तर कुणाला ते सगळे टक्केटोणपे खाऊन झाल्यावर, आता काय उरलं असं वाटत असताना सापडतं आणि मग त्याची आयुष्याची संध्याकाळ सोनेरी होऊन जाते.विजय मुडशिंगीकरांना ते सापडलं स्लिप डिस्कनं अंथरूणाला खिळलेले असताना. कोल्हापुरात पंचगंगेच्या काठावर बालपण गेलेला हा माणूस. क्रॉम्पटन ग्रीव्हजमध्ये साधा कामगार. वाढत्या वयात कधीतरी मित्राच्या नादानं कॅमेरा हातात आला. फोटोग्राफीचं रीतसर प्रशिक्षण कधी घेतलं नाही, पण मित्रामुळेच शिकत शिकत लग्नासाठीचे फोटो काढायला सुरूवात केली. बघता बघता छंदाचा "साईड बिझनेस' झाला. सगळं नीट सुरळीत चाललेलं. पण 1998 मध्ये त्यांना एक अपघात झाला. त्यातून स्लिप डिस्क. जराही हलता यायचं नाही. आता आपण आपल्या पायावर उठून उभे तरी राहू की नाही हा एकच प्रश्‍न मन खात होता. वेळ जाण्यासाठी हातात येतील ती पुस्तकं वाचत होते. अशातच त्यांच्या हातात सुरेशचंद्र वारघडेंचं "हिमयात्री' हे पुस्तक पडलं. ते पुस्तक वाचताना ते इतके भारावून गेले की परत कधीमधी चालू शकलोच तर हिमालयात नक्की जायचं असं त्यांनी ठरवलं. सुदैवानं डॉ. प्रेमानंद रामाणींच्या स्लिप डिस्कवरच्या नव्या शोधामुळे ते ऑपरेशननंतर सातआठ दिवसात ठणठणीत झाले. आता मिळालेलं आयुष्य हे बोनस आहे, असा विचार करत त्यांनी मित्रांना गोळा करून त्यांनी व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा ट्रेक केला. एकदा हिमालय बघायला गेलेल्या माणसाला हिमालय पुन्हापुन्हा तिथं यायला भाग पाडतो. तसंच त्यांचंही झालं. तिथल्या नद्यांच्या तर ते इतक्‍या प्रेमात पडले की गंगेच्या उगमापासून ते गंगासागरपर्यंत टप्प्याटप्प्याने त्यांनी अनेकदा प्रवास केला. गोमुखपासून, हरिद्वार-ऋषिकेशपर्यंत नितळशंख असलेली गंगा पुढेपुढे कानपूर, पाटण्याला इतकी प्रदूषित होत गेलेली बघून ते अतिशय व्यथित झाले. उगमाच्या ठिकाणी अमृत मानलं गेलेलं गंगेचं पाणी नंतर बघवत नाही, इतकं खराब होतं, हे सगळं रोखण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, या त्यांच्या अस्वस्थपणाला उत्तर होतं, फोटोग्राफी! अर्थात हातात पैसे नसत, रजा मिळत नसत, पण डोक्‍यात फक्त उगमापासून नितळस्वच्छ असलेली आणि दुसऱ्या टोकाला प्रदूषित होत गेलेली गंगा नदी असायची. महिन्याच्या पगाराचे पैसे खर्च करून ते गंगेचं खोरं गाठत. त्यामुळे ते तिकडे जाऊन नेमकं काय करतात हे बघायला त्यांची पत्नी थेट त्यांच्याबरोबर गोमुखला आली होती. उगमापासून, टोकापर्यंतच्या गंगेच्या टप्प्यांचे त्यांनी अनेकदा फोटो काढले. या सगळ्या फोटोंची संख्या जवळपास पाच हजारांच्या घरात जाईल. घरातल्या लोकांना त्यांचं हे काम करण्याची मनापासूनची ओढ लौकरच लक्षात आल्यामुळे त्यांना पहिल्यापासूनच सहकार्य मिळायला लागलं. इतकं की निवडक 120 फोटोंचं प्रदर्शन मांडून लोकांमध्ये गंगेच्या प्रदूषणाबाबत जनजागृती करायचं त्यांनी ठरवलं तेव्हा फोटोंना लॅमिनेशन करण्याचा खर्च वाचवण्यासाठी त्यांचं सगळं कुटुंब घरात लॅमिनेशन करत बसायचं. जणू काही विक्रोळीला कन्नमवार नगरात, कामगारवस्तीत असलेल्या त्यांच्या सव्वादोनशे फुटांच्या घरात हे सगळे फोटोच रहायचे आणि उरलेल्या जागेत घरातली माणसं! नंतर त्यांच्या एका मित्रानं फोटो प्रदर्शन ठेवायला जागा दिली. गंगेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या प्रवास मांडणारे फोटो काढायचे हा प्रकल्प म्हणून त्यांनी स्वतशीच ठरवला तेव्हा मुख्य प्रश्‍न होता पैशांचा. इतर कुणी मदत करेल का, एवढंच नाही तर अशी मदत करणारी लोकं असू शकतात, एनजीओ काढता येऊ शकते असं काहीही समोर नसताना केवळ आपली इच्छा म्हणून मुडशिंगीकर गंगेच्या खोऱ्यात जात राहिले. 2005 मधली गोष्ट. त्यांना बिहारमध्ये गंगेच्या काठावर होणाऱ्या छटपूजेचे फोटो काढायचे होते. नेहमीप्रमाणे हातात पैसे नव्हतेच. इकडे कंपनीत ले ऑफ जाहीर झालेला. दोन दोन, तीन तीन महिने पगार होत नव्हता. बरोबरच्या लोकांमध्ये उद्या नोकरीचं काय होणार ही चिंता तर मुडशिंगीकर पटण्याला जाण्यासाठी पाच-सहा हजार रूपये गोळा करण्यात गुंतलेले. बरोबरचे सहकारी म्हणत अरे, कंपनीत काय चाललंय आणि तू काय करतोयस? शेवटी त्यांनी हे काम करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली. ते म्हणतात, माझ्याकडे तर पैसे नसायचेच. मग मी तिकीट काढायचो आणि तिकडे पोहोचायचो. गंगेसाठी हे काम करतो आहे, हे सांगितलं की सामान्य लोक पैसे द्यायचे. सगळीकडे असणाऱ्या महाराष्ट्र मंडळांमध्ये जाऊन मी काय आणि का करतो ते सांगितलं की राहण्याची व्यवस्था तीनशे रूपयात असेल तर मला शंभर सव्वाशे रूपयात जागा मिळायची. क्रॉम्पटन ग्रीव्हजमधल्या वरिष्ठांनी बिनपगारी रजांच्या बाबतीत सगळ्या मर्यादा संपल्यावरही या प्रकल्पासाठी म्हणून सहकार्य केलं आहे. हे सगळं काम पुढे नेण्यासाठी त्यांनी आता "गंगाजल नेचर फाऊंडेशन' नावाची संस्था स्थापन केली आहे.गंगेला जशा अनेक नद्या येऊन मिळतात, तशी मुडशिंगीकरांच्या कामाशी अनेक लहानमोठी माणसं जोडली गेली असली तरी या सगळ्या डोलाऱ्याचा मुख्य खांब ते स्वतच आहेत. शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये गंगेच्या नितळ सौंदर्याचे, तसंच तिच्या प्रदूषणाच्या फोटोंची आजवर अनेक प्रदर्शनं मांडून त्यांनी नव्या पिढीला गंगेच्या समृध्द वारशाची तसंच तिच्या प्रदूषणाच्या प्रश्‍नांची जाणीव करून दिली आहे. सामान्य माणूस गंगेकडे धार्मिक, भावनिक दृष्टीने बघत असतो, त्याला गंगेच्या प्रदूषणाबाबत जागृत केलं पाहिजे, म्हणून ते फोटो प्रदर्शनाचा खटाटोप सतत मांडत राहतात. या सगळ्या कामासाठी त्यांनी बॅंकेकडे कर्ज मागितलं. पण गंगेचं सुंदर, मोहक रूपडं दाखवण्यासाठी बॅंका कर्ज द्यायला तयार आहेत, मात्र प्रदूषणाचा एकही फोटो दाखवायचा नाही, अशी त्यांची अट आहे. महाराष्ट्रातले राजकारणी त्यांना गंगा ही "आपली' नव्हे तर "त्यांची' नदी आहे, मग आपण कशाला पैसे द्यायचे, असं उत्तर देतात. तर उत्तर प्रदेशातले राजकारणी हा सगळा खटाटोप "आमच्याकड'ची माणसं करतील की त्यासाठी महाराष्ट्रातून कुणी कशाला यायला हवं, असं उत्तर देतात. तर अलाहाबादमधली एक संस्था म्हणते, हे सगळं फोटो प्रदर्शन आम्हाला विकत द्या. आणि तुम्ही या सगळ्या कामातून बाजूला व्हा, आम्ही ते पुढे नेऊ.यातला कोणताच पर्याय मुडशिंगीकरांना मान्य नाही. ते म्हणतात, गंगा सुंदर आहेच, पण ती कशी प्रदूषित झाली आहे, ते दाखवलं जाईल तेव्हाच तिचं सौंदर्य टिकवलं पाहिजे याचं गांभीर्य पटेल. आणि हे काम मी सुरू केलं आहे आणि मला त्याच्याशी जोडलेलं रहायचं आहे. निव्वळ कुणी पैसे देतं म्हणून मी यातून कसा बाजूला होऊ? हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. म्हणूनच येत्या पाच मार्चपासून मी आणि माझे काही मित्र गंगेच्या उगमापासून ते गंगासागरपर्यंत गंगेच्या फोटोंचं प्रदर्शन घेऊन फिरणार आहोत. गंगेच्या काठावर येणारे हजारो लोक रोज हे प्रदर्शन बघतील. आपण या प्रदूषणाला कळत-नकळत कसे हातभार लावतो हे त्यांच्या लक्षात येईल तेव्हा ते जागे होतील. या सगळ्या टप्प्यांवर आम्ही आमच्या पातळीवरून गंगा शुध्दीकरण शिबिरं भरवणार आहोत. या सगळ्या दरम्यानच्या गंगेच्या पाण्याचे नमुने घेऊन त्याच्या प्रदूषणाचा अहवाल सगळ्यात शेवटी सरकारला सादर केला जाणार आहे. गंगेच्या प्रदूषणाबद्दल आस्था असलेल्या सर्वसामान्य लोकांकडून मिळेल ती मदत घेऊन महिनाभराचा हा दौरा आहे. या दौऱ्यासाठी सामान्य माणसांनी जवळपास पाच लाखांचा आर्थिक हातभार लावला आहे.अनंत अडचणी, आर्थिक तोशीस असं सगळं असूनही विजय मुडशिंगीकर आपल्या या कामावर ठाम आहेत.का?ते म्हणतात, मला परत उभं तरी राहता येईल की नाही, अशी शंका होती अशा काळात मला मी इथे ओढला गेलो. आता या सगळ्या परिसरासाठी, गंगेसाठी काहीतरी करणं ही मला माझी जबाबदारी वाटते!
----
चौकट- 1भारतीय माणसाच्या दृष्टीनं गंगा ही फक्त जीवनदायिनी नदी नाही तर त्याच्या सगळ्या जन्मजन्माच्या फेऱ्यांशी जोडली गेलेली गंगामैय्या आहे. गोमुखपासून म्हणजे उगमापासून अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करून गंगा कोलकात्याजवळ गंगासागर इथं समुद्राला मिळते. या सगळ्या प्रवासात तिला जवळपास ऐंशी नद्या येऊन मिळत. सगळ्या नद्यांनी वाहून य गाळामुळे समृध्द झालेल्या गंगेच्या खोऱ्यावर आजही आपली चाळीस टक्के लोकसंख्या अलंबून आहे. गंगेचं आर्थिक, सामाजिक, धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन राजीव गांधींच्या काळात गंगा ऍक्‍शन प्लान आला. हरिद्वारला लावलेल्या फिल्ट्रेशन प्लान्टमुळे हरिद्वार ऋषिकेशला गंगेचं पाणी स्वच्छ आहे, पण खरा प्रश्‍न आहे, तो पुढेच. वाराणसीमध्ये घाटावर आंघोळ करायला, कपडे धुवायला, गायीम्हशी पाण्यात सोडायला बंदी आहे. आणि ती काटेकोरपणे पाळली जाते. पण त्याच नदीत शहराचं सांडपाणी सोडलं जातं, मुडशिंगीकर सांगतात. पुढे कानपूर पटण्याला तर शहराचं सांडपाणी, नदीच्या काठाकाठानं असलेल्या कारखान्यांमधलं रसायनमिश्रित पाणी या सगळ्यामुळे गंगेचं प्रदूषण वाढत गेलं आहे. चौकट-2गंगेच्या उगमापाशी म्हणजे गोमुखला श्रावण महिन्यात भरणाऱ्या कावड यात्रेवर आता उत्तरांचल सरकारनं पूर्ण बंदी आणली आहे. ही कावड यात्रा म्हणजे यात्रेकरू प्लास्टिकची कावड घेऊन गोमुखला जातात. तिथे ती विसर्जित करून नव्या कावडीमध्ये गंगाजल घेऊन त्याचा अभिषेक गावातल्या शंकराला करायचा अशी प्रथा. यात वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकमुळे या यात्रेवर बंदी आहे. आता गोमुखला फक्त गिर्याहोरकांनाच सोडलं जातं. तेही ते नेतील त्या वस्तूंची यादी करून. त्या वस्तू त्यांनी परत आणल्या हेही तपासलं जातं. गोमुखला होणारं प्रदूषण रोखण्यासाठी ही काळजी घेतली जाते.
----
वेबसाईट- http://www.gangagal.org.in/
vijaymudshingikar@gangajal.org.in

----

पूर्वप्रसिध्दी- सकाळ, सप्तरंग पुरवणी

No comments:

Post a Comment