Friday, February 27, 2009

आपण सही तरी मराठीत करतो का?

मराठी भाषा मरू घातली आहे, असं एक विधान इतिहासाचार्य राजवाड्यांनी केलं होतं. त्यावरून बराच काळ खल होत राहिला. नंतर मराठी भाषेवरून बरेच "राडे' होत राहिले आहेत. या ना त्या रूपात मराठी भाषेच्या अस्तित्वाची चर्चा होते आहे.आपण चर्चेत हिरिरीनं भाग घेतो. उत्तर भारतीयांच्या नावानं बोटं मोडतो; पण आपली मुलं मराठी शाळेत जात नसतात. त्यांना इंग्लिश मीडियममध्ये घालायलाही हरकत नाही. आपलं मूल जगाच्या व्यवहारात कुठंही कमी पडू नये, याची काळजी पालक म्हणून घ्यायला हवीच. त्यासाठी आवश्‍यक ते करायलाही हवं. पण ते करताना "आपल्या' भाषेसाठी आपण काय करतो? इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आपल्या मुलांना "ट्‌विंकल-ट्‌विंकल लिट्‌ल स्टार' बरोबरच मराठी कविता शिकवतो का? आई-वडिलांनी आपल्याला इंग्लिश मीडियममध्ये घातलं नाही... नाही तर आज आपण कुठल्या कुठे गेलो असतो, असं म्हणत आपण कितीदा मराठीच्या नावानं बोटं बोडलेली असतात?रस्त्यावर, बसमध्ये, ट्रेनमध्ये समोरच्या माणसाने इंग्रजीत विचारलेल्या प्रश्‍नाला तेवढ्याच सफाईदार इंग्रजीत उत्तर देता येत नाही म्हणून आपण किती कानकोंडले होतो? फ्रेंच माणूस फ्रान्समध्ये, जर्मन माणूस जर्मनीमध्ये त्याची भाषा सोडून दुसरी भाषा येत नाही म्हणून असा ओशाळत असेल? पण समोरच्या माणसाला मराठी समजत नसेलच असं गृहीत धरून हिंदीत बोलायला सुरुवात करतो. असं बंगालमध्ये घडेल? तमिळनाडूत घडेल? ते जाऊ द्या. तुम्ही वर्षभरात किती मराठी पुस्तकं वाचता? किती मराठी पुस्तकं विकत घेता? तुम्ही एखाद्या मराठी लायब्ररीचे सभासद आहात का? तुम्ही थिएटरमध्ये जाऊन मराठी सिनेमा बघता? तुम्ही सही करता मराठीत?आपण यातल्या कित्येक गोष्टी करीत नसतो. आपल्या भाषेचा विचार आपण आपली अस्मिता म्हणून करीत नाही. राजकारणी त्यांच्या राजकारणासाठी अस्मितेचे अंगार फुलवायला बघतात तेव्हा आपण मराठीच्या रक्षणासाठी कुणीतरी उभं ठाकलं म्हणून समाधान पावतो. पण आपल्या जबाबदारीचं काय?भाषा जशी एकाएकी निर्माण होत नाही, तशी ती एकाएकी संपतही नाही. ती भाषा बोलणारी माणसंच तिला घडत-बिघडवत असतात. एरवी भाषा ही अखंडपणे सुरू असलेली प्रक्रया असते. ही प्रक्रया विलक्षण चैतन्यशील असते. ती समाज घडवते, संस्कृती घडवते. तो समाज आणि त्याची संस्कृतीही त्या भाषेला घडवत असतात. भाषा ही त्या समाजाची आयडेंटिटी असते आणि समाज हे त्या भाषेचं दृश्‍य रूप असतं.घडली ती ज्ञानेश्‍वर, तुकाराम अशा संतांच्या अंगाखांद्यावर. त्यांनी तिला भक्तिरसात डुंबवलं. वस्तुनिष्ठ दृष्टिकोन दिला. सामाजिक भान दिलं. त्यांच्या संस्कारांनी मराठी घडत गेली. तिनं आक्रमकांचे शब्द घेतले, पचवले, रिचवले. इंग्रजीनं जगाची खिडकी उघडली तेव्हा ते वारंही घरात घेतलं. आज "मराठी मागे पडते आहे' ही भावना आहे, तिचं मूळ आहे आपल्यातच. आपल्या भाषेचा आपल्यालाच न्यूनगंड आहे. निधडेपणानं आपण मातृभाषा स्वीकारू, तिला प्रतष्ठा देऊ तेव्हा ती प्रतष्ठित बनेल. पूर्वप्रसिध्दी, मुंबई सकाळ, 21 फेब्रुवारी

"सलाम बॉम्बे'पासून "सलाम गरिबी'पर्यंत

"स्लमडॉग' बघताना सारखी आठवण येत होती ती "सलाम बॉम्बे'ची. मीरा नायर यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा. 1988 मधला. मुंबईबाहेरून मुंबईत आलेल्या कृष्णाची ती कहाणी. गावाकडे परत जायची आस लागलेला, त्यासाठी पाचशे रुपये साठवण्यासाठी धडपडणारा कृष्णा. परतीचे दोर कापले जातात आणि त्या झोपडपट्टीतच आपलं विश्‍व शोधत कृष्णाचा "चायपाव' होतो, त्याची ही गोष्ट आहे. तळागाळातल्या लोकांचं आयुष्य कुठेच न मोजणाऱ्या भारतातल्या श्रीमंत लोकांना तेव्हा मीरा नायरसारख्या परदेशी बाईनं येऊन हे सगळं झोपडपट्टीतलं आयुष्य लोकांना दाखवणं अजिबात आवडलं नव्हतं. तेव्हाही अशा सिनेमांमधून आपल्याकडची गरिबी कलात्मक करून विकण्यावर टीका झाली होती. पण ती बकाली, ती गरिबी हे वास्तव आहे आणि ते बघा, एवढंच "सलाम बॉम्बे' सांगतो. 1988 मधली आपल्या देशाची परिस्थिती तशीच होती. झोपडपट्टी होती, भिकारी होते. गरीब घरातल्या लहान मुलींना अपरिहार्यपणे वेश्‍या व्यवसायाची वाट धरावी लागत होती. सगळा देशच गरीब होता. पै- पैची बचत करणारा. "गरिबी हटाव'चे मार्ग माहीत नसलेला. आहे हे असं आहे, आणि ते असंच असणार आहे, हे वास्तव सगळ्यांनीच जणू काही इतक्‍या अपरिहार्यपणे स्वीकारलं होतं की परिस्थिती बदलेल असं कधी कुणाच्या स्वप्नातही येत नव्हतं. गरिबांच्या तर अजिबातच नाही. जीवनावश्‍यक वस्तू असोत नाहीतर स्कूटरसारख्या "चैनी'च्या वस्तू. सगळ्यांसाठीच नंबर लावण्याचे ते दिवस होते. सगळ्यांच्याच वाट्याला अभावाचं जगणं होतं. "स्लमडॉग'ची कथाही काहीशी "सलाम बॉम्बे'ला समांतर जाणारी. इथेही झोपडपट्टी आहे, झोपडपट्टीतल्या माणसांचं जगणं आहे. तोच बकालपणा आहे, तीच लव्ह स्टोरी आहे.पण "स्लमडॉग मिलेनियर' तिथून पुढे जातो. तो त्या सगळ्या गरिबीबद्दल सांगतोच, पण पुढे हेही सांगतो की "नशिबा'ने साथ दिली तर आता इथं गरीब माणसाच्या गोष्टीचा शेवटही गोड होऊ शकतो. त्याला खूप पैसा मिळू शकतो, त्याच्या आयुष्याची हिरॉईनही त्यालाच मिळू शकते. झोपडपट्टीत राहत असला तरी ज्याच्याकडे विकण्यासारखं काही आहे, त्याला इथं आता "मार्केट' आहे, मग ते शरीर असेल नाहीतर बुद्धिमत्ता. इथं आता सगळं काही ग्लोरीफाय होऊन विकलं जात आहे, जाणार आहे. "सलाम बॉम्बे'तही हे सगळं होतं, पण तेव्हा आपण मार्केटमध्ये उभे नव्हतो. आता ते आहोत. त्यामुळे गरिबांसाठीही हे जग आशावादी आहे, हे स्लमडॉग मिलेनियर सांगतो. तसं खरंच आहे का ही गोष्ट वेगळी. पण त्यातला समजून घ्यायचा मुद्दा एवढाच की "इंडियन एक्‍झॉटिका' मग तो श्रीमंत देशांनी कधीही न बघितलेल्या झोपडपट्टीतल्या गरिबीचा असेल नाहीतर इथल्या बहुसांस्कृतिकतेचा... जगाच्या मार्केटमध्ये त्याला पत निर्माण झाली आहे.
पूर्वप्रसिध्दी सकाळ, 24 फेब्रुवारी

Tuesday, February 10, 2009

"लिटील चॅम्प'नं महाराष्ट्राला काय दिलं?

वैशाली चिटणीसगेले सहा महिने अवघ्या महाराष्ट्राला "लिटील गंधर्वां'नी नादावलं होतं. आळंदीसारख्या छोट्याशा गावातून आलेली कार्तिकी गायकवाड महागायिका ठरली आणि ही स्पर्धा संपली. खरं तर कार्तिकी म्हणाली त्याप्रमाणे ती एकटी जिंकली नाही तर पाचही जण जिंकले. पाचही जण महागायक ठरले आहेत. आता काही दिवस रसिकांच्या मनात ही स्पर्धा रुंजी घालत राहील. नवीन स्पर्धा सुरू झाली की तिची चर्चा सुरू होईल; पण तरीही लिटील चॅम्पची स्पर्धा झी टीव्हीपुरती न राहता सगळ्या मराठी माणसांशी जोडली गेली. तिनं आपल्याला भरभरून दिलं. गाणी ऐकण्याच्या आनंदापलीकडे या स्पर्धेनं काय दिलं याचा ताळेबंद मांडायला हवा.लिटील चॅम्पचं सगळ्यात महत्त्वाचं क्रेडिट म्हणजे या रिऍलिटी शो'नं लोकांना सास-बहूच्या, कौटुंबिक भांडणांच्या, लफड्यांच्या, हिंसाचाराच्या, पुनर्जन्म वगैरेंसारख्या विषयांमधून बाहेर खेचून आणून दाखवलं आहे. म्हणजे एरवी लोकांनी सोमवार मंगळवार वगळता इतर नेहमीचे कार्यक्रम बघितलेही असतील; पण आठवडाभर सगळीकडे चर्चा रंगायची ती लिटील चॅम्पचीच. दर्जेदार मनोरंजन दिलं तर ते लोक डोक्‍यावर घेतात, असाच याचा अर्थ नाही का?इथेच "लोकांना आवडतं तेच आम्ही देतो' असं म्हणत उथळ, सवंग, हिणकस कार्यक्रम लोकांच्या माथी मारणाऱ्यांचे दावे फोल ठरतात. तुम्ही चांगले कार्यक्रम दिलेत तर लोक योग्य तो प्रतिसाद देतातच. मग लोकांना त्या भयंकर सिरीयल्स हव्या आहेत, त्यांना कुटुंबातल्या कुटुंबात चालणारी ती भांडणं, प्रेमप्रकरणं, कारस्थानं हेच बघायला आवडतं, हे कसं ठरवलं जातं?आणखी एक महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा लिटील चॅम्पनी अधोरेखित केली ती म्हणजे महाराष्ट्राला स्वतःचा असा सांस्कृतिक चेहरा आहे. सुमारे पन्नासेक वर्षांपूर्वी गणेशोत्सवात मेळे, भावगीतगायन तो काळही असाच भारलेला होता. या वेळी कुणी काय गायलं याच्या चर्चा नंतर बराच काळ चालत राहायच्या. ही लहान मुलं काय गातात, त्यांच्या गाण्याची पातळी, ती कुणाची गाणी गातात, त्या गाण्यांचं, कवी-गीतकारांचं, संगीतकारांचं महत्त्व, ते सगळं समजून-उमजून होणारं या मुलांचं सादरीकरण हे सगळं समजायला आणि त्याला तसा प्रतिसाद द्यायला रसिकही तेवढे प्रगल्भ असावे लागतात. जशी सादर करणाऱ्या कलावंताची तयारी असायला हवी, तशीच ते समजून घेण्याची, दाद देण्याची रसिकांची क्षमता हवी. म्हणजे त्याचाही तसाच अभ्यास हवा. मराठी माणसाच्या प्रगल्भ रसिकतेमधूनच राज्याचा सांस्कृतिक चेहरा कसा संपन्न आहे, हेच दिसतं. या सगळ्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यापूर्वी सांस्कृतिक पातळीवर पुण्या-मुंबईची अक्षरशः दादागिरी असायची. आपण डावलले जातो, आपल्या कलेला पुरेसा वाव मिळत नाही, अशी पुणे-मुंबई वगळता राज्याच्या इतर भागातल्या कलावंतांची खंत असायची; पण लिटील चॅम्पसारख्या रिऍलिटी शोमधून हा समजही भिरकावला गेला आहे. या पाचही मुलांमध्ये फक्त एकच जण म्हणजे आर्या पुण्याची होती. बाकी सगळी मुलं निमशहरांमधून, छोट्या गावांमधून आलेली, मध्यमवर्गीय घरातली आहेत. एरवी मोठमोठ्या स्पर्धांवर निकाल फिक्‍स केल्यासारखे आरोप होत असतात. पण टीव्हीसारखं माध्यम नीट वापरून टॅलेंट कसं शोधता येऊ शकतं, हेही "लिटील चॅम्प'नं दाखवून दिलं आहे.शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आजचं युग स्पर्धेचं आहे. तुम्हाला टिकायचं असेल तर धावा, धावा आणि फक्त धावा. जिंकण्यासाठी आवश्‍यक ते सगळं करा; पण लक्षात ठेवा फक्त तुम्हालाच जिंकायचं आहे, अशी उरफोड करणाऱ्या आजच्या जगात स्पर्धा निर्विष असू शकते, ती निरोगी आणि एकमेकांना विकसित करत नेणारी असू शकते, हेही लिटील चॅम्पनंच दाखवून दिलं आहे.
published in mumbai sakal on 10 feb 2009

Wednesday, February 4, 2009

त्या मुली याच ना?

ठाणे बोरिवली बसमध्ये मी चढले तेव्हा बस खच्चून भरली होती. बरेचजण तर उभेच होते. लेडीज सीटवर बसलेल्या एकानं तोंड वेडवाकडं करत उढून मला जागा दिली. बस निघाली. माझा प्रवास जेमतेम दहा मिनिटांचा. पण तेवढ्यात ही बस खचाखच भरते. पुढचा स्टॉप आला. झपकन मोढी गर्दी चढली. मागून बायकांचे आवाज यायला लागले. लेडीज सीटवर माझ्या शेजारी बसलेल्याची धूसफूसवजा चूळबूळ वाढली. आता कुणी बाई आली तर त्याला उठावं लागलं असतं.
तेवढ्यात मागून अपेक्षित आवाज आलाच, "एक्‍सक्‍यूज मी, ये लेडीज सीट है' तो उठला. आणि एक चांगलीच उंच मुलगी माझ्या शेजारी येऊन बसली.
तिनं पाठीमागे बघत "थम्पस अप'ची खूण केली आणि मागून एकच गलका आला "दीदीला सीट मिळाली,'..."दीदीला सीट मिळाली,'.
"आप कहॉं उतरनेवाली है?' तिनं मला विचारलं.
"माजिवाडा'.
ती तशीच बसल्याबसल्या मागे वळून ओरडली,
"ए गौरी, विद्या, पमा... कुणीतरी पुढे या गं... इथं एक माजिवाडा सीट आहे!'
तेवढ्यात तिनं पुढच्या सीटवर बसलेल्या माणसालाही विचारलं,"तुम्ही कुठं उतरणार?'
"कॅडबरी' एकजण म्हणाला,
"तत्वज्ञान' दुसऱ्यानं सांगितलं.
दोन बाजूंच्या दोन्ही सीटच्या मधल्या जागेत दाटीवाटीनं माणसं उभी होती. तरीही तिनं बसल्याबसल्या इकडूनतिकडून डोकावत पलीकडच्या लोकांना विचारलं...
कहॉं उतरेंगे?
"कापूरबावडी' "दहिसर'
"ए मुलींनो पुढे या गं सगळ्यांनी. इथं सीट आहेत' तिनं मागे बघून आवाज दिला, तशा मुली सरकत सरकत पुढे यायला लागल्या. सगळ्यांच्याच खांद्यावर सॅक. आठ नऊजणी होत्या. सगळ्या अठरा ते 20 च्या आसपासच्या. त्यांच्या आरड्याओरड्यामुळे एव्हाना सगळ्या बसचं लक्ष या मुलींकडे, त्यांच्या दीदीकडे, त्यांच्या गडबड गोंधळाकडे वेधलं गेलं होतं. बसमध्ये दाटीवाटीनं उभ्या असलेल्या गर्दीला पार करून तीनचार जणी दीदीजवळ पोहोचल्या. तिनं भरभर त्यांना माजिवाड्याला कोण उतरणार, कोण कॅडबरीला आणि कोण तत्वज्ञान विद्यापीठाच्या स्टॉपवर याची माहिती सांगून त्यांना सीटसाठी क्‍लेम लावायला पिटाळलं. वर म्हणालीही लोकलमध्ये आपण लावतो ना तसाच क्‍लेम लावा. मुली तशाच गर्दीत त्या त्या सीटकडे सरकल्या आणि आणि त्या सीटवर बसलेल्या माणसांना तुम्ही उठाल तेव्हा आम्हाला तुमच्या जागा द्या म्हणून सांगायला लागल्या. एव्हाना "दीदी'नं अजून पाठीमागेच असलेल्या तीनचार जणींनाही हाका मारून अशाच पध्दतीनं कुणाकुणाला विचारून जागांना क्‍लेम लावून दिला होता. हे सगळ इतकं पटपट सुरू होतं की आसपास गर्दीत कसरत करत उभे असलेले सगळे अवाक होऊन बघत होते. मुंबईत लोकलमध्ये लेडीज डब्यात जागांना क्‍लेम लावायची पध्दत आहे. डब्यात चढल्यावर बसलेल्यांना पटपट कुठे उतरणार हे विचारलं जातं. जी त्यातल्या त्यात आधी उतरणार असते तिच्या जागेवर क्‍लेम लावला जातो. लेडीज डब्यात क्‍लेमला कायद्याइतकं महत्त्व आहे. गंमत म्हणजे ही भानगड पुरूषांच्या डब्यात नसते. जो कुणी उठेल तिथं जवळपास उभा असलेला माणूस त्या जागेवर बसतो. पण इथं या पोरींनी रेल्वेस्टाईल क्‍लेम लावून जागा बळकावून टाकल्या होत्या. आसपास उभ्या असलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी होती. रात्रीची वेळ. सगळेच दमून आलेले. टेकायला मिळालं तर प्रत्येकालाच हवं होतं. त्यात या पोरींनी चलाखी केली होती. जागा सहज मिळाली तर बसायचं असं न करता त्यांनी त्या मिळवल्या होत्या. अजून त्या उभ्याच होत्या. पण आता लौकरच बसायला मिळणार या आनंदात त्यांचा गलका वाढला होता. पुढे बसलेल्या, मधे बसलेल्या, मागे बसलेल्या असा सगळ्यांचा सुखसंबाद सुरू झाला. आपण बसमधे आहोत, सगळी गर्दी आपल्याला बघते आहे, ऐकते आहे हे लक्षातही न येता त्या मुक्तपणे एकमेकींना हाका मारत, एकमेकींच्या टोप्या उडवत त्यांची धमाल सुरू होती. कॅडबरीचा एक मोठा बारही वाटून झाला. तो एकमेकींकडे पोहोचवण्यासाठी त्यांनी गर्दीचीच मदत घेतली. कुणाकुणाचं हाफ तिकीट काढायचं आणि कुणाचं फुल असे विनोद करून झाले. एव्हाना सगळ्या बसला यातली गौरी कुठली, विद्या कुठली, नीता कुठली आणि दीदी कोण हे समजलं होतं.
मलाही राहवेना. मी माझ्या शेजारी बसलेल्या "दीदी'ला विचारलं,
"कुठे जायचंय तुम्हाला सगळ्यांना?'"
वसईला'
"मग इथून ठाण्यातून थेट वसई बसेस आहेत'
"ना. त्यांची शेवटची बस रात्री साडेआठला गेली. आमचा कार्यक्रम संपायला उशीर झाला.'
"कसला कार्यक्रम?'
"म्हणजे मॅचेस होत्या. त्या संपल्यावर बक्षीस समारंभ होता. तो उशिरा संपला.'
या मुलींबद्दल कुतुहल वाटल्यामुळे म्हणा किंवा कानावर पडतंच होतं म्हणून म्हणा आमचा संवादही आसपासची गर्दी एकत होती.
"कसली मॅच? काय खेळता तुम्ही लोक?'
"कबड्डी'
"अरे वा! कॉलेजची टीम आहे वाटतं!'
"नाही. आमची एका क्‍लबची टीम आहे. पण या सगळ्या मुली कॉलेजात शिकतात. मी त्यांची कोच आहे. म्हणजे मी पण खेळते. पण मी कोच आहे आणि प्लेअरपण'
हे सगळं बोलताना तिचं लक्ष "तिच्या' मुली, त्या काय करताहेत, नीट उभ्या आहेत ना याकडेच होतं.
"आता बस घोडबंदर रोडला लागली की होईलच रिकामी. मिळतील त्यांना जागा' मी म्हटलं.
"ते ठीक आहे हो. पण दिवसभर खेळून दमल्यात ना सगळ्या... म्हणून...'
तिनं आणखी एक कॅडबरीचा बार काढून तो मुलींकडे पाठवायला सुरूवात केली.आमचा संवाद ऐकणाऱ्यांचे सगळ्यांचे चेहरे एव्हाना बदलले होते. जागा मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या, गोंधळ घालणाऱ्या या मुली आधी सगळ्यांना निव्वळ बालिश, स्वार्थी वाटल्या होत्या. पण आता ते संपलं होतं. या मुलींचा गोंधळ म्हणजे त्यांचा किलबिलाट झाला. त्यांचा चाललेला दंगा हा त्यांचा खोडकरपणा, अवखळपणा वाटायला लागला. त्यांचं एकमेकांच्या टोप्या उडवणं लोक एन्जॉय करायला लागले. त्या खेळून दमून आल्या आहेत हे कळल्यावर तर एकदोघांनी उठून त्यांना बसायला जागा दिली.
त्या त्यांची कबड्डीची मॅच जिंकल्या होत्या की नाही माहीत नाही, इथं मात्र त्यांनी वातावरण जिंकलं होतं. काहीही न करता त्यांनी बघणाऱ्यांची "नजर' बदलवून टाकली होती.
नाराजीपासून कौतुकापर्यंत!
माझा सगळा प्रवास इनमिन दहा मिनिटांचा. तेवढ्यात या मुलींनी बसचा सगळा मूडच बदलून टाकला होता. आणि आपण काय केलंय हे त्यांच्या गावीही नव्हतं.
त्या एकमेकींमध्येच होत्या.
तशाच... स्वच्छंद.. अवखळ... मोकळ्या!
महात्मा फुले, महर्षी अण्णासाहेब कर्वे...
तूम्हाला अपेक्षित होत्या त्या मुली याच ना?

मीडिया खरोखरच दहशतवादी आहे का?

मुंबईवर झालेल्या 26 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याला दोन महिने पूर्ण झाले आहेत. पहिल्या महिनाभरातला प्रतिक्रियात्मक भर ओसरून आता अधिक शांतपणे त्या सगळ्या घटनेचं विश्‍लेषण सुरू आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. जगातलं एक महत्त्वाचं शहर. तेव्हा त्याच्या सुरक्षेसाठी जास्त सजग राहिलं पाहिजे या भूमिकेतून आता आत्मपरीक्षण सुरू आहे. सागरी सुरक्षा, पोलिस यंत्रणा, दळणवळण यंत्रणा, संपर्क-संवाद यंत्रणा या सगळ्या यंत्रणा त्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत.26 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेत इलेक्‍ट्रॉनिक मीडिया अर्थात न्यूज चॅनेल्सवर सगळ्यात जास्त टीका झाली. या घटनेदरम्यानचं मीडियाचं वागणं अत्यंत आक्रस्ताळी, खरं तर दहशतवादीचं होतं आणि असं वागणाऱ्या मीडियावर काही तरी नियंत्रण हवं असा सूर त्यानंतर निघत राहिला. इलेक्‍ट्रॉनिक्‍स मीडियासाठी आचारसंहिता असावी, हा त्यातूनच पुढे आलेला मुद्दा. म्हणूनच हा मीडिया खरोखरच दहशतवादी आहे का, ही चर्चा होणं आवश्‍यक आहे.प्रिंट मीडिया, टीव्ही मीडिया आणि न्यू मीडिया म्हणजे इंटरनेट ही आजच्या काळातली तीन मुख्य माध्यमं आहेत. हे तीनही मासमिडिया आहेत. म्हणजेच ते एकाच वेळी अनेकांशी संवाद साधतात. एकाच वेळी अनेकांवर प्रभाव निर्माण करणारी ही आधुनिक माध्यमे आहेत.त्यातही प्रिंट मीडिया म्हणजे मुख्यतः वर्तमानपत्र. त्यांना दीडशे वर्षांची परंपरा आहे. स्वातंत्र्यलढ्यासारख्या भव्यपटाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांची सुरुवात झाली. त्यामुळे प्रिंट मीडियाला आपोआपच एक ओजाची परंपरा मिळाली. मराठीपुरतं बघितलं तरी टिळक-आगरकर-परांजपे अशा दिग्गजांनी एकेकट्याच्या बळावर सुरू केलेली, पेलून दाखवलेली त्या काळातली नियतकालिकं त्या त्या व्यक्तींच्या अस्तित्वामुळे, त्यांच्या व्यासंगामुळे व्यापक भान असणारी, सामाजिक उत्तरदायित्व मानणारी होती. ती त्या काळाचं प्रॉडक्‍टही होती. एकेका माणसानं वर्तमानपत्रं सुरू करून चालवणं, त्याला असलेलं जबाबदारीचं भान वैयक्तिक नफ्यापेक्षाही सामाजिक जाणीव महत्त्वाची (त्यापेक्षाही वैयक्तिक नफ्याचं भानच नसणं) ही भावना या सगळ्यांमुळे प्रिंट मीडिया आपोआपच जबाबदार होत गेला. त्या काळातल्या प्रिंटिंग टेक्‍नॉलॉजीमुळे खपाच्या मर्यादा, साक्षरतेचं तुलनेत कमी प्रमाण या सगळ्यांमुळे त्याला चुका करायला, शिकायला, प्रयोग करायला वावही मिळाला. यामधूनही तो घडत गेला. हे माध्यमच मूळतः नवीन, धकाधकीच्या काळात तयार होत गेलेलं. त्यामुळे त्याची इतर कुठल्याही माध्यमाशी तुलनाही होऊ शकत नव्हती. तुलना करण्यासाठी म्हणून दुसरं माध्यमही उपलब्ध नव्हतं.त्या तुलनेत टीव्ही मीडिया पाहिली तर काय दिसतं? आपल्याकडे या मीडियाचं वयच मुळात जेमतेम 15 ते 20 वर्षांचं आहे. संपादकापासून सगळेच जण या माध्यमात अनुभव घेत, प्रयोग करीत, शिकत, घडत असलेले. त्याची सतत तुलना होणार ती दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या प्रिंट मीडियाशी. हे माध्यम पूर्णपणे टेक्‍नॉलॉजीवर अवलंबून असलेलं. 1991 च्या आर्थिक उदारीकरणानंतर या तांत्रिक बदलांनी वेग घेतला. तिकडे प्रिंट मीडियात शब्द हे माध्यम तर इथं दृश्‍य हे माध्यम महत्त्वाचं. त्यात हळूहळू अपारहार्यपणे 24 तास चालणारी चॅनेल्स सुरू झाली. अगदी तरुण असलेलं हे माध्यम सुरुवातीपासूनच सातत्यानं टीकेला बली पडतं आहे. कामाची एनर्जी ही या माध्यमाची गरज असल्यामुळे इथं काम करणारे तरुण पत्रकार, 24 तासांची मर्यादा असल्यामुळे घड्याळ्याच्या काट्याशी करावी लागणारी स्पर्धा, ब्रेर्किंग न्यूजचं सततचं दडपण, टेक्‍नॉलॉजी हे सामर्थ्य अशी सगळी या माध्यमाची वैशिष्ट्ये आहेत.पण त्याच त्याच्या मर्यादाही आहेत.इथं काम करणाऱ्या सीनियर मंडळींचं सरासरी वय 30 ते 40 आहे, तर ज्युनियर मंडळींचे वय 20 ते 25. साधारण 2 ते 3 वर्षं हा इथला "बर्नआऊट रेट' आहे असं म्हटलं जातं. म्हणजे एवढा काळ काम केल्यानंतर त्या माणसाला त्या कामातून बाहेर पडावसं वाटतं. त्याची एनर्जी संपून जाते. या काळात त्यानं रोज 15-16 तास काम केलेलं असतं. त्याचं वैयक्तिक जगणं जणू संपून गेलेलं असतं. प्रचंड गतिमानता ही या माध्यमाची गरज असल्यामुळे सतत नवनवीन गोष्टींच्या मागे असणं, सगळ्यांच्या आधी आपणच बातम्या ब्रेक करणं यामागे टीव्ही पत्रकार असतात. आज त्यांच्या हातून घडताहेत त्या सगळ्या चुका प्रचंड स्पर्धेतून आलेल्या ब्रेकिंग न्यूजच्या दडपणातून घडताहेत.मुख्य म्हणजे हे दडपण दोन्ही बाजूंनी आहे. समजा सगळ्या चॅनेल्सवर पंतप्रधानांच्या बायपासची बातमी दाखवली जात आहे आणि एखादं चॅनेल ती बातमी वाढवायची नाही असा जाणीवपूर्वक निर्णय घेऊन थोडक्‍यात तपशील सांगून दुसरीकडं वळलं तर बघणारे "बाकी सगळे ती बातमी दाखवत असताना हे झोपले होते' असं म्हणू शकतात. त्याचा त्या चॅनेलच्या इमेजवर परिणाम होऊ शकतो. त्याचा परिणाम पुढे जाहिरातींवर होतो. कोण अशा रीतीनं जाणीवपूर्वक आपल्या पायावर धोंडा मारून घेईल? त्यापेक्षा सगळ्यांबरोबर, नव्हे सगळ्यांच्या पुढे राहण्यासाठी कोणतीही घटना घडली की तिच्यातले वेगवेगळे अँगल्स बाहेर काढण्यात आपण कसे "सबसे तेज' आहोत हे सिद्ध करीत राहा, हाच पर्याय उरतो.हे सगळं 26 नोव्हेंबरच्या हल्ल्यात अधिक ठळकपणे पुढे आलं. न्यूज चॅनेल्सनी अतिउत्साहाचाही अतिरेक केला, आततायीपणा केला असे आक्षेप घेणारे हे विसरतात की, वृत्तवाहिन्यांमुळेच जे घडलं ते तातडीनं जगासमोर आलं, हल्ल्याची तीव्रता समजली. न्यूज चॅनेल्स एनएसजी कमांडो नरिमन हाऊसवर उतरत असतानाचं जे फुटेज दाखवत होती, ते बघून अतिरेकी आपली धोरणं उठवत होते, असं म्हणणं अगदीच हास्यास्पद आहे. 26 नोव्हेंबरची घटना घटल्यानंतर अत्यंत उत्तेजित होऊन, अत्यंत आक्रमकपणे वृत्तवाहिन्यांनी काम केलं ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे एकच घटना, एखादी बातमी वेगवेगळ्या चॅनेल्सवर वेगवेगळ्या अँगल्सनी येत होती. तिचा विपर्यास होत होता हेही खरं; पण या जशा न्यूज चॅनेल्सच्या चुका होत्या तशा सरकारकडूनही होत्या. इराकमध्ये गेली पाच वर्षे काम करणारे जय देशमुख हे एएफपीचे युद्ध वार्ताहर सांगतात की, अशा घटना घडतात तेव्हा विकसित देशांमध्ये दर तासा-दोन तासांनी सरकारकडून अधिकृत माहिती दिली जाते. आपल्याकडे अशी कोणतीही व्यवस्था नव्हती. तशी व्यवस्था असती तर अधिकृत माहिताचा आधार न्यूज चॅनेल्सना घ्यावाच लागला असता, याचा जाब सरकारला कोण विचारणार?ताज आणि ओबेरॉयमध्ये तीन दिवस एनएसजीची ऑपरेशन्स सुरू होती. या काळात हा सगळा परिसर बघ्यांनी भरून गेला होता. पिकनिकला यावं तशी लोक मुलाबाळांना घेऊन एनएसजीची ऑपरेशन्स बघायला येत होते. मोबाईलवर फोटो काढत होते. ही गर्दी आवरता आवरता पोलिसांच्या नाकी नऊ येत होते.अशा ठिकाणी जाऊन गर्दी करू नये, यंत्रणेवर ताण आणू नये, अशी संवेदनशीलता लोकांनी दाखवली नाही आणि हे लोक वर्तमानपत्रात पत्र लिहून न्यूज चॅनल्स कशी बेजबाबदार आहेत, याचा धोशा लावत होते. त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीचं काय? जबाबदारी, संवेदनशीलता फक्त मीडियानेच दाखवायची असते का?दुसऱ्या दिवशी लगोलग घटनास्थळाला भेट देऊन गुजरातचे नरेंद्र मोदी यांनी राजकीय भाषणं ठोकली. मदत जाहीर केली. त्याला जबाबदारीचं भान म्हणायचं का? मुंढे यांच्यासारख्या इतरही भाजप नेत्यांनी घटनास्थळाला भेटी दिल्या, राजकीय भाषणं केली. ही राजकारण करायची जागा नाही आणि वेळही नाही याचं भान त्यांनी तरी कुठं ठेवलं? ताजची पाहणी करण्यासाठी रामगोपाल वर्माला घेऊन जाणं, महत्त्वाच्या घटनेत शिथिल बोलणं याची किंमत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना मोजावी लागली; पण इतरांचं काय?याचा अर्थ इतरांच्या चुका दाखवायच्या आणि मीडियाच्या झाकायच्या असा नाही. मीडियाकडूनह चुका झाल्या. इतक्‍या तीव्रतेचा हा हल्ला ही इतकी अनपेक्षित गोष्ट होती की ती हाताळायची कशी, हे सगळ नेमकं किती दिवस चालणार, याचा अंदाजच नसल्यामुळे सगळी व्यवस्थाच गडबडलेली होती. अशा वेळी आक्षेप मात्र घेतले गेले ते एकट्या मीडियावरच. मीडियानं सलग तीन दिवस जीव धोक्‍यात घालून कामही केलं.एरवीही काही अपवाद वगळता हा मीडिया जबाबदारीनं काम करताना दिसतो. देशाच्या कुठल्यातरी कोपऱ्यातल्या गावातला प्रिन्ससारखा अगदी सामान्य मुलगा बोअरवेलमध्ये पडण्यासारखी घटना असो, चांद्रयान मोहीम असो, ग्रहण असो की अगदी पंतप्रधानांची बायपास सर्जरी. ती ती निमित्त पकडून दक्षिणोत्तर, पूर्व पश्‍चिम पसरलेल्या अंधश्रद्धा, अज्ञान, निरक्षरता यांचा प्रभाव असलेल्या आपल्या देशात लोकशिक्षण करणं ही सोपी गोष्ट नाही. पंतप्रधानांच्या बायपास सर्जरीचं निमित्त साधून गेल्या आठवड्यात बायपास सर्जरीची माहिती या पद्धतीनं न्यूज चॅनेल्सवरून दिली गेली ती यासाठी महत्त्वाची होती का आपल्या समाजाचा ज्ञानापेक्षाही मनोरंजनावर जास्त भर आहे? वाचकांपेक्षा प्रेक्षकांचं "मानसिक वय', "प्रगल्भता' नेहमीच कमी असते, त्याला वेगवेगळी निमित्त पकडून मनोरंजनाकडून माहितीकडे, ज्ञानाकडे वळवण्याचं महत्त्वाचं काम मीडिया करतो. आपण चुकांबद्दल फटकारे ओढतो तेव्हा या विधायक गोष्टींबद्दल बोलतो का?26 नोव्हेंबर घ्यानंतर तर मीडियाचा अतिउत्साह अतिरेकी होता, हेच जणू दहशतवादी आहेत अशा चर्चा रंगल्या; पण अशा चर्चा करणारे ना कधी मीडियाच्या कामाच्या पद्धती समजून घेतात, ना त्यांच्या अडचणी. आपल्यासमोर घडत असलेल्या या मीडियाला आपण परिपक्व होण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे.

रिपोर्टर काय करतो?

रोजच्या रुटीनमध्ये कॅमेऱ्यासमोर उभं राहून बोलणाऱ्या रिपोर्टरला माहिती गोळा करायला वेळ मिळत असतो; पण ब्रेकिंग न्यूजच्या वेळी त्यालाही त्या घटनास्थळी कॅमेऱ्यासमोर उभं राहून अखंड बोलावं लागतं. एखादी दुर्घटना घडली आहे. रिपोर्टर तिथं ओबी व्हॅन घेऊन पोचला आहे. ताबडतोब लाइव्ह कव्हरेज सुरू होतं. तिथं गेल्या गेल्या रिपोर्टिंग सुरू होतं. इकडे अँकरला सूचना मिळालेली असते, "खींचना है'. म्हणजेच आपल्याला या बातमीवर राहायचं आहे. कारण त्या क्षणी तीच बातमी महत्त्वाची असते. लोकांचे डोळे त्याच बातमीवर लागलेले असतात. मग रिपोर्टरही तेच तेच बोलत राहतो. त्याला माहिती गोळा करायला वेळही मिळालेला नसतो; मग माहिती मिळवणं, त्या घटनेचे अपडेटस्‌ देणं, प्रतिक्रिया देण्यासाठी लोक गोळा करणं अशा सगळ्या आघाड्यांवर रिपोर्टर एकाच वेळी लढत असतो. यातूनच मग "आपको अभी कैसे लग रहा है'सारखे प्रश्‍न येतात. ते खूपदा निर्बुद्धपणातून येण्यापेक्षाही कॅमेऱ्यासमोर त्या क्षणी वेळ सांभाळणं, काही तरी देत राहणं यातून येतात.

अँकर काय करतो?

रुटीन काम सुरू असतं, तेव्हा आपण काय बोलायचं आहे, ते अँकरनं आधी वाचलेलं असतं; पण खरी कसोटी असते ब्रेकिंग न्यूजच्या वेळी. निवडणुका, बजेट अशा घडामोडींचा अभ्यास अँकरनं आधी केलेला असू शकतो; पण खरोखरची एखादी ब्रेकिंग न्यूज येते, तेव्हा त्या वेळी लाइव्ह बुलेटिन करणाऱ्या अँकरला ती अक्षरशः पेलायची असते. अशा वेळी त्याच्या जागेवर आपण असू तर काय, याचा विचार केला तरी अँकरचं नेमकं काय होत असेल, ते लक्षात येईल. अशा वेळी पीसीआर (प्रॉडक्‍शन कंट्रोल रुम) टॉकबॅकवरून (कानात असलेल्या फोनवरुन) त्याच्याशी बोलत असतं. तिथून त्याला पुढच्या सूचना मिळत असतात. पुढे कुणाचे फोन किंवा मुलाखत आहे, कोणते नवीन प्रश्‍न विचारता येतील, पुढच्या घडामोडी काय घडलेल्या आहेत, नवीन माहिती काय आहे, हे सगळं त्याला सांगितलं जात असतं. हे सगळं सुरू असतं अँकर आपल्याला माहिती सांगत असतानाच. आपल्याशी बोलत असताना पीसीआरला ऐकणं, त्याप्रमाणे पुढच्या गोष्टी करणं, स्वतः विचार करणं हे सगळं अँकर करत असतो, तेही चेहऱ्यावर तसं काहीही न दाखवता. त्याला पीसीआरकडून पुढचे मुद्दे मिळत नाहीत, तोपर्यंत त्याला त्या क्षणी हातात असलेल्या माहितीवरच अवलंबून राहावं लागतं. आणि स्वतःलाच किल्ला लढवावा लागतो.

मॅच्युरिटीची प्रक्रिया

जेव्हा काही घडत नसतं, तेव्हा लोक आपापल्या सोयीनुसार बातम्या बघतात; पण जेव्हा खरोखरीची ब्रेकिंग न्यूज येते, तेव्हा न्यूज चॅनेल्सचा "टीआरपी'वर जातो. याचा अर्थ त्या क्षणी मनोरंजन सोडून बातम्या बघण्याचं प्रमाण वाढलेलं असतं. हे सगळं आपल्यापर्यंत आणणाऱ्या न्यूज चॅनेल्सचं भारतातलं वय आहे जेमतेम 15 ते 20 वर्षांचं. या क्षेत्रात सगळ्या आघाड्या सांभाळणाऱ्यांचं वय सरासरी 35 वर्ष. प्रचंड वेळ घेणाऱ्या या क्षेत्राचा बर्नआऊट रेट दोन वर्षं. म्हणजे दोन वर्षं इथं कोणताही माणूस न कंटाळता, आनंदानं काम करतो. प्रचंड ऊर्जा असलेल्या थोड्या लोकांचा अपवाद वगळता फ्रंट आघाडी सांभाळणारी माणसं दोन वर्षांत बाजूला होतात, नवी तरुण माणसं समोर येतात, कारण- कामासाठी लागणारी ऊर्जा ही या माध्यमाची महत्त्वाची गरज असते. त्यामुळे आपल्याला तिथं सतत नवी तरुण माणसं येताना-जाताना दिसतात. त्याबरोबरच नाट्यमयता, आक्रमकता याही या माध्यमाच्या गरजा आहेत. त्यामुळे तशाच प्रकारची माणसं आपल्याला तिथं दिसतात. न्यूज चॅनेल्सवर जे आक्षेप घेतले जातात, त्या प्रकारच्या चुका याच मंडळींकडून होताना दिसतात. जसजसं हे माध्यम जुनं होत जाईल, तसतशा या चुका कमी होत जातील आणि हे माध्यम परिपक्‍व होत जाईल. मुख्य म्हणजे ही सगळी प्रक्रिया आपल्या सगळ्यांसमोरच घडणार आहे. कारण- कॅमेरा काहीच लपवत नाही; लपवू शकत नाही.

ब्रेकिंग न्यूज घडते तेव्हा...

एकदा ब्रेकिंग न्यूज आली, की चॅनेलवर सुरू असलेल्या रुटीन बातम्या बाजूला पडतात आणि त्या एकाच बातमीचा पाठपुरावा सुरू होतो. सगळ्यात पहिली गरज असते, त्या बातमीची दृश्‍यं मिळविणं. त्या ठिकाणाजवळ असलेल्या रिपोर्टरला ताबडतोब धाडलं जातं. ओबी व्हॅन (आऊटडोअर ब्रॉडकास्टिंग व्हॅन) पाठवली जाते. दृश्‍यं उपलब्ध होईपर्यंत चॅनेलवरची डेस्कची मंडळी ग्राफिक्‍स बनविणं, वेगवेगळ्या संबंधित लोकांचे फोन इन घेणं, या कामाला लागतात. ब्रेकिंग न्यूज ही अर्थातच अचानक आलेली बातमी असते. ती येते तेव्हा अँकर, रिपोर्टर, कॅमेरामन, ड्युटीवर हजर असलेली पडद्यामागची मंडळी या सगळ्यांचाच कस लागत असतो. ब्रेकिंग न्यूज असेल, तेव्हा सतत त्या बातमीवर राहणं आवश्‍यक असतं; कारण बातमी तेवढीच महत्त्वाची असते. न्यूज चॅनेलवर आपल्याला अँकर, रिपोर्टर ही दोन माणसं दिसत असतात, तेव्हा त्यांच्यामागे 100 माणसांचा ताफा राबत असतो. त्यात संपादकीय टीम, कॅमेरामन, प्रॉडक्‍शन, व्हिज्युअल एडिटर ही सगळी टीम असते. खरोखरची मोठी ब्रेकिंग न्यूज येते, तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणांहून दृश्‍यं येत असतात. ती तातडीनं एडिट करून दाखवायची असतात; शिवाय ही ब्रेकिंग न्यूज पुढे कशी कशी डेव्हलप होत जाईल, याचा अंदाज घेऊन किती वेळ याच बातमीवर राहायचं (ब्रेक न घेता एकाच बातमीवर सलग राहणं याला न्यूज चॅनेलच्या भाषेत "कार्पेट बॉम्बिंग' म्हणतात), पुढे काय दाखवायचं, आणखी कोणत्या स्टोऱ्या मिळवायच्या, संबंधितांचे बाईटस्‌ मिळवायचे, हे सगळं तितक्‍याच तातडीनं, खरं तर इतरांपेक्षा आधीच करायची मानसिक सक्ती प्रत्येक चॅनेलनं स्वतःवर घालून घेतलेली असते. त्यामुळे ब्रेकिंग न्यूज आली, की या सगळ्यासाठी प्रचंड घाई-गडबड सुरू होते. ब्रेकिंग न्यूज जास्तीत जास्त चांगली कव्हर करण्याची इच्छा असते. तसा प्रयत्न असतो. या सगळ्या कामाचा ताण असतो, तशी त्याची नशाही असते. "सबसे आगे' राहण्याच्या व्यावसायिक गरजेतून मग चुकाही होतात.