Friday, February 27, 2009

"सलाम बॉम्बे'पासून "सलाम गरिबी'पर्यंत

"स्लमडॉग' बघताना सारखी आठवण येत होती ती "सलाम बॉम्बे'ची. मीरा नायर यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा. 1988 मधला. मुंबईबाहेरून मुंबईत आलेल्या कृष्णाची ती कहाणी. गावाकडे परत जायची आस लागलेला, त्यासाठी पाचशे रुपये साठवण्यासाठी धडपडणारा कृष्णा. परतीचे दोर कापले जातात आणि त्या झोपडपट्टीतच आपलं विश्‍व शोधत कृष्णाचा "चायपाव' होतो, त्याची ही गोष्ट आहे. तळागाळातल्या लोकांचं आयुष्य कुठेच न मोजणाऱ्या भारतातल्या श्रीमंत लोकांना तेव्हा मीरा नायरसारख्या परदेशी बाईनं येऊन हे सगळं झोपडपट्टीतलं आयुष्य लोकांना दाखवणं अजिबात आवडलं नव्हतं. तेव्हाही अशा सिनेमांमधून आपल्याकडची गरिबी कलात्मक करून विकण्यावर टीका झाली होती. पण ती बकाली, ती गरिबी हे वास्तव आहे आणि ते बघा, एवढंच "सलाम बॉम्बे' सांगतो. 1988 मधली आपल्या देशाची परिस्थिती तशीच होती. झोपडपट्टी होती, भिकारी होते. गरीब घरातल्या लहान मुलींना अपरिहार्यपणे वेश्‍या व्यवसायाची वाट धरावी लागत होती. सगळा देशच गरीब होता. पै- पैची बचत करणारा. "गरिबी हटाव'चे मार्ग माहीत नसलेला. आहे हे असं आहे, आणि ते असंच असणार आहे, हे वास्तव सगळ्यांनीच जणू काही इतक्‍या अपरिहार्यपणे स्वीकारलं होतं की परिस्थिती बदलेल असं कधी कुणाच्या स्वप्नातही येत नव्हतं. गरिबांच्या तर अजिबातच नाही. जीवनावश्‍यक वस्तू असोत नाहीतर स्कूटरसारख्या "चैनी'च्या वस्तू. सगळ्यांसाठीच नंबर लावण्याचे ते दिवस होते. सगळ्यांच्याच वाट्याला अभावाचं जगणं होतं. "स्लमडॉग'ची कथाही काहीशी "सलाम बॉम्बे'ला समांतर जाणारी. इथेही झोपडपट्टी आहे, झोपडपट्टीतल्या माणसांचं जगणं आहे. तोच बकालपणा आहे, तीच लव्ह स्टोरी आहे.पण "स्लमडॉग मिलेनियर' तिथून पुढे जातो. तो त्या सगळ्या गरिबीबद्दल सांगतोच, पण पुढे हेही सांगतो की "नशिबा'ने साथ दिली तर आता इथं गरीब माणसाच्या गोष्टीचा शेवटही गोड होऊ शकतो. त्याला खूप पैसा मिळू शकतो, त्याच्या आयुष्याची हिरॉईनही त्यालाच मिळू शकते. झोपडपट्टीत राहत असला तरी ज्याच्याकडे विकण्यासारखं काही आहे, त्याला इथं आता "मार्केट' आहे, मग ते शरीर असेल नाहीतर बुद्धिमत्ता. इथं आता सगळं काही ग्लोरीफाय होऊन विकलं जात आहे, जाणार आहे. "सलाम बॉम्बे'तही हे सगळं होतं, पण तेव्हा आपण मार्केटमध्ये उभे नव्हतो. आता ते आहोत. त्यामुळे गरिबांसाठीही हे जग आशावादी आहे, हे स्लमडॉग मिलेनियर सांगतो. तसं खरंच आहे का ही गोष्ट वेगळी. पण त्यातला समजून घ्यायचा मुद्दा एवढाच की "इंडियन एक्‍झॉटिका' मग तो श्रीमंत देशांनी कधीही न बघितलेल्या झोपडपट्टीतल्या गरिबीचा असेल नाहीतर इथल्या बहुसांस्कृतिकतेचा... जगाच्या मार्केटमध्ये त्याला पत निर्माण झाली आहे.
पूर्वप्रसिध्दी सकाळ, 24 फेब्रुवारी

No comments:

Post a Comment