Wednesday, February 4, 2009

त्या मुली याच ना?

ठाणे बोरिवली बसमध्ये मी चढले तेव्हा बस खच्चून भरली होती. बरेचजण तर उभेच होते. लेडीज सीटवर बसलेल्या एकानं तोंड वेडवाकडं करत उढून मला जागा दिली. बस निघाली. माझा प्रवास जेमतेम दहा मिनिटांचा. पण तेवढ्यात ही बस खचाखच भरते. पुढचा स्टॉप आला. झपकन मोढी गर्दी चढली. मागून बायकांचे आवाज यायला लागले. लेडीज सीटवर माझ्या शेजारी बसलेल्याची धूसफूसवजा चूळबूळ वाढली. आता कुणी बाई आली तर त्याला उठावं लागलं असतं.
तेवढ्यात मागून अपेक्षित आवाज आलाच, "एक्‍सक्‍यूज मी, ये लेडीज सीट है' तो उठला. आणि एक चांगलीच उंच मुलगी माझ्या शेजारी येऊन बसली.
तिनं पाठीमागे बघत "थम्पस अप'ची खूण केली आणि मागून एकच गलका आला "दीदीला सीट मिळाली,'..."दीदीला सीट मिळाली,'.
"आप कहॉं उतरनेवाली है?' तिनं मला विचारलं.
"माजिवाडा'.
ती तशीच बसल्याबसल्या मागे वळून ओरडली,
"ए गौरी, विद्या, पमा... कुणीतरी पुढे या गं... इथं एक माजिवाडा सीट आहे!'
तेवढ्यात तिनं पुढच्या सीटवर बसलेल्या माणसालाही विचारलं,"तुम्ही कुठं उतरणार?'
"कॅडबरी' एकजण म्हणाला,
"तत्वज्ञान' दुसऱ्यानं सांगितलं.
दोन बाजूंच्या दोन्ही सीटच्या मधल्या जागेत दाटीवाटीनं माणसं उभी होती. तरीही तिनं बसल्याबसल्या इकडूनतिकडून डोकावत पलीकडच्या लोकांना विचारलं...
कहॉं उतरेंगे?
"कापूरबावडी' "दहिसर'
"ए मुलींनो पुढे या गं सगळ्यांनी. इथं सीट आहेत' तिनं मागे बघून आवाज दिला, तशा मुली सरकत सरकत पुढे यायला लागल्या. सगळ्यांच्याच खांद्यावर सॅक. आठ नऊजणी होत्या. सगळ्या अठरा ते 20 च्या आसपासच्या. त्यांच्या आरड्याओरड्यामुळे एव्हाना सगळ्या बसचं लक्ष या मुलींकडे, त्यांच्या दीदीकडे, त्यांच्या गडबड गोंधळाकडे वेधलं गेलं होतं. बसमध्ये दाटीवाटीनं उभ्या असलेल्या गर्दीला पार करून तीनचार जणी दीदीजवळ पोहोचल्या. तिनं भरभर त्यांना माजिवाड्याला कोण उतरणार, कोण कॅडबरीला आणि कोण तत्वज्ञान विद्यापीठाच्या स्टॉपवर याची माहिती सांगून त्यांना सीटसाठी क्‍लेम लावायला पिटाळलं. वर म्हणालीही लोकलमध्ये आपण लावतो ना तसाच क्‍लेम लावा. मुली तशाच गर्दीत त्या त्या सीटकडे सरकल्या आणि आणि त्या सीटवर बसलेल्या माणसांना तुम्ही उठाल तेव्हा आम्हाला तुमच्या जागा द्या म्हणून सांगायला लागल्या. एव्हाना "दीदी'नं अजून पाठीमागेच असलेल्या तीनचार जणींनाही हाका मारून अशाच पध्दतीनं कुणाकुणाला विचारून जागांना क्‍लेम लावून दिला होता. हे सगळ इतकं पटपट सुरू होतं की आसपास गर्दीत कसरत करत उभे असलेले सगळे अवाक होऊन बघत होते. मुंबईत लोकलमध्ये लेडीज डब्यात जागांना क्‍लेम लावायची पध्दत आहे. डब्यात चढल्यावर बसलेल्यांना पटपट कुठे उतरणार हे विचारलं जातं. जी त्यातल्या त्यात आधी उतरणार असते तिच्या जागेवर क्‍लेम लावला जातो. लेडीज डब्यात क्‍लेमला कायद्याइतकं महत्त्व आहे. गंमत म्हणजे ही भानगड पुरूषांच्या डब्यात नसते. जो कुणी उठेल तिथं जवळपास उभा असलेला माणूस त्या जागेवर बसतो. पण इथं या पोरींनी रेल्वेस्टाईल क्‍लेम लावून जागा बळकावून टाकल्या होत्या. आसपास उभ्या असलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी होती. रात्रीची वेळ. सगळेच दमून आलेले. टेकायला मिळालं तर प्रत्येकालाच हवं होतं. त्यात या पोरींनी चलाखी केली होती. जागा सहज मिळाली तर बसायचं असं न करता त्यांनी त्या मिळवल्या होत्या. अजून त्या उभ्याच होत्या. पण आता लौकरच बसायला मिळणार या आनंदात त्यांचा गलका वाढला होता. पुढे बसलेल्या, मधे बसलेल्या, मागे बसलेल्या असा सगळ्यांचा सुखसंबाद सुरू झाला. आपण बसमधे आहोत, सगळी गर्दी आपल्याला बघते आहे, ऐकते आहे हे लक्षातही न येता त्या मुक्तपणे एकमेकींना हाका मारत, एकमेकींच्या टोप्या उडवत त्यांची धमाल सुरू होती. कॅडबरीचा एक मोठा बारही वाटून झाला. तो एकमेकींकडे पोहोचवण्यासाठी त्यांनी गर्दीचीच मदत घेतली. कुणाकुणाचं हाफ तिकीट काढायचं आणि कुणाचं फुल असे विनोद करून झाले. एव्हाना सगळ्या बसला यातली गौरी कुठली, विद्या कुठली, नीता कुठली आणि दीदी कोण हे समजलं होतं.
मलाही राहवेना. मी माझ्या शेजारी बसलेल्या "दीदी'ला विचारलं,
"कुठे जायचंय तुम्हाला सगळ्यांना?'"
वसईला'
"मग इथून ठाण्यातून थेट वसई बसेस आहेत'
"ना. त्यांची शेवटची बस रात्री साडेआठला गेली. आमचा कार्यक्रम संपायला उशीर झाला.'
"कसला कार्यक्रम?'
"म्हणजे मॅचेस होत्या. त्या संपल्यावर बक्षीस समारंभ होता. तो उशिरा संपला.'
या मुलींबद्दल कुतुहल वाटल्यामुळे म्हणा किंवा कानावर पडतंच होतं म्हणून म्हणा आमचा संवादही आसपासची गर्दी एकत होती.
"कसली मॅच? काय खेळता तुम्ही लोक?'
"कबड्डी'
"अरे वा! कॉलेजची टीम आहे वाटतं!'
"नाही. आमची एका क्‍लबची टीम आहे. पण या सगळ्या मुली कॉलेजात शिकतात. मी त्यांची कोच आहे. म्हणजे मी पण खेळते. पण मी कोच आहे आणि प्लेअरपण'
हे सगळं बोलताना तिचं लक्ष "तिच्या' मुली, त्या काय करताहेत, नीट उभ्या आहेत ना याकडेच होतं.
"आता बस घोडबंदर रोडला लागली की होईलच रिकामी. मिळतील त्यांना जागा' मी म्हटलं.
"ते ठीक आहे हो. पण दिवसभर खेळून दमल्यात ना सगळ्या... म्हणून...'
तिनं आणखी एक कॅडबरीचा बार काढून तो मुलींकडे पाठवायला सुरूवात केली.आमचा संवाद ऐकणाऱ्यांचे सगळ्यांचे चेहरे एव्हाना बदलले होते. जागा मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या, गोंधळ घालणाऱ्या या मुली आधी सगळ्यांना निव्वळ बालिश, स्वार्थी वाटल्या होत्या. पण आता ते संपलं होतं. या मुलींचा गोंधळ म्हणजे त्यांचा किलबिलाट झाला. त्यांचा चाललेला दंगा हा त्यांचा खोडकरपणा, अवखळपणा वाटायला लागला. त्यांचं एकमेकांच्या टोप्या उडवणं लोक एन्जॉय करायला लागले. त्या खेळून दमून आल्या आहेत हे कळल्यावर तर एकदोघांनी उठून त्यांना बसायला जागा दिली.
त्या त्यांची कबड्डीची मॅच जिंकल्या होत्या की नाही माहीत नाही, इथं मात्र त्यांनी वातावरण जिंकलं होतं. काहीही न करता त्यांनी बघणाऱ्यांची "नजर' बदलवून टाकली होती.
नाराजीपासून कौतुकापर्यंत!
माझा सगळा प्रवास इनमिन दहा मिनिटांचा. तेवढ्यात या मुलींनी बसचा सगळा मूडच बदलून टाकला होता. आणि आपण काय केलंय हे त्यांच्या गावीही नव्हतं.
त्या एकमेकींमध्येच होत्या.
तशाच... स्वच्छंद.. अवखळ... मोकळ्या!
महात्मा फुले, महर्षी अण्णासाहेब कर्वे...
तूम्हाला अपेक्षित होत्या त्या मुली याच ना?

1 comment:

  1. A Real Journalism -
    Its Apratim,Dear... and its u Vaishali. Very nicely written and told, in true sense. This is the apprach, what we need. media should nt cover only events but must write about d process of this change. you are doing this... its nt lalit lekhan Vaishali, but a real reporting.
    Cheers.

    - sunjay awate

    ReplyDelete