Tuesday, February 10, 2009

"लिटील चॅम्प'नं महाराष्ट्राला काय दिलं?

वैशाली चिटणीसगेले सहा महिने अवघ्या महाराष्ट्राला "लिटील गंधर्वां'नी नादावलं होतं. आळंदीसारख्या छोट्याशा गावातून आलेली कार्तिकी गायकवाड महागायिका ठरली आणि ही स्पर्धा संपली. खरं तर कार्तिकी म्हणाली त्याप्रमाणे ती एकटी जिंकली नाही तर पाचही जण जिंकले. पाचही जण महागायक ठरले आहेत. आता काही दिवस रसिकांच्या मनात ही स्पर्धा रुंजी घालत राहील. नवीन स्पर्धा सुरू झाली की तिची चर्चा सुरू होईल; पण तरीही लिटील चॅम्पची स्पर्धा झी टीव्हीपुरती न राहता सगळ्या मराठी माणसांशी जोडली गेली. तिनं आपल्याला भरभरून दिलं. गाणी ऐकण्याच्या आनंदापलीकडे या स्पर्धेनं काय दिलं याचा ताळेबंद मांडायला हवा.लिटील चॅम्पचं सगळ्यात महत्त्वाचं क्रेडिट म्हणजे या रिऍलिटी शो'नं लोकांना सास-बहूच्या, कौटुंबिक भांडणांच्या, लफड्यांच्या, हिंसाचाराच्या, पुनर्जन्म वगैरेंसारख्या विषयांमधून बाहेर खेचून आणून दाखवलं आहे. म्हणजे एरवी लोकांनी सोमवार मंगळवार वगळता इतर नेहमीचे कार्यक्रम बघितलेही असतील; पण आठवडाभर सगळीकडे चर्चा रंगायची ती लिटील चॅम्पचीच. दर्जेदार मनोरंजन दिलं तर ते लोक डोक्‍यावर घेतात, असाच याचा अर्थ नाही का?इथेच "लोकांना आवडतं तेच आम्ही देतो' असं म्हणत उथळ, सवंग, हिणकस कार्यक्रम लोकांच्या माथी मारणाऱ्यांचे दावे फोल ठरतात. तुम्ही चांगले कार्यक्रम दिलेत तर लोक योग्य तो प्रतिसाद देतातच. मग लोकांना त्या भयंकर सिरीयल्स हव्या आहेत, त्यांना कुटुंबातल्या कुटुंबात चालणारी ती भांडणं, प्रेमप्रकरणं, कारस्थानं हेच बघायला आवडतं, हे कसं ठरवलं जातं?आणखी एक महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा लिटील चॅम्पनी अधोरेखित केली ती म्हणजे महाराष्ट्राला स्वतःचा असा सांस्कृतिक चेहरा आहे. सुमारे पन्नासेक वर्षांपूर्वी गणेशोत्सवात मेळे, भावगीतगायन तो काळही असाच भारलेला होता. या वेळी कुणी काय गायलं याच्या चर्चा नंतर बराच काळ चालत राहायच्या. ही लहान मुलं काय गातात, त्यांच्या गाण्याची पातळी, ती कुणाची गाणी गातात, त्या गाण्यांचं, कवी-गीतकारांचं, संगीतकारांचं महत्त्व, ते सगळं समजून-उमजून होणारं या मुलांचं सादरीकरण हे सगळं समजायला आणि त्याला तसा प्रतिसाद द्यायला रसिकही तेवढे प्रगल्भ असावे लागतात. जशी सादर करणाऱ्या कलावंताची तयारी असायला हवी, तशीच ते समजून घेण्याची, दाद देण्याची रसिकांची क्षमता हवी. म्हणजे त्याचाही तसाच अभ्यास हवा. मराठी माणसाच्या प्रगल्भ रसिकतेमधूनच राज्याचा सांस्कृतिक चेहरा कसा संपन्न आहे, हेच दिसतं. या सगळ्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यापूर्वी सांस्कृतिक पातळीवर पुण्या-मुंबईची अक्षरशः दादागिरी असायची. आपण डावलले जातो, आपल्या कलेला पुरेसा वाव मिळत नाही, अशी पुणे-मुंबई वगळता राज्याच्या इतर भागातल्या कलावंतांची खंत असायची; पण लिटील चॅम्पसारख्या रिऍलिटी शोमधून हा समजही भिरकावला गेला आहे. या पाचही मुलांमध्ये फक्त एकच जण म्हणजे आर्या पुण्याची होती. बाकी सगळी मुलं निमशहरांमधून, छोट्या गावांमधून आलेली, मध्यमवर्गीय घरातली आहेत. एरवी मोठमोठ्या स्पर्धांवर निकाल फिक्‍स केल्यासारखे आरोप होत असतात. पण टीव्हीसारखं माध्यम नीट वापरून टॅलेंट कसं शोधता येऊ शकतं, हेही "लिटील चॅम्प'नं दाखवून दिलं आहे.शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आजचं युग स्पर्धेचं आहे. तुम्हाला टिकायचं असेल तर धावा, धावा आणि फक्त धावा. जिंकण्यासाठी आवश्‍यक ते सगळं करा; पण लक्षात ठेवा फक्त तुम्हालाच जिंकायचं आहे, अशी उरफोड करणाऱ्या आजच्या जगात स्पर्धा निर्विष असू शकते, ती निरोगी आणि एकमेकांना विकसित करत नेणारी असू शकते, हेही लिटील चॅम्पनंच दाखवून दिलं आहे.
published in mumbai sakal on 10 feb 2009

No comments:

Post a Comment