Tuesday, May 4, 2010

सोशल मीडिया पूरकच... पण!

तंत्रज्ञानाची जसजशी प्रगती होत गेली आहे तसतसा मीडिया बदलत गेला आहे हे आपण सगळेच पहात आहोत. आधीची अक्षरजुळणी गेली, ऑफसेट प्रिटिंग आले तसतसं वर्तमानपत्राची छपाई सोपी सुलभ होत गेली.
गेल्या दहा वर्षात इलेक्‍ट्रॉनिक्‍स माध्यमातल्या बदलांनी मीडियाचा चेहरा मोहरा आपल्यासमोरच बदलत गेला आहे. एखादी घटना घडत असताना ती घरबसल्या समोर पहायला मिळणं हा थरार आता सामान्य माणसालाही नवीन राहिलेला नाही. त्याचाच पुढचा टप्पा अर्थातच इंटरॅक्‍टिव्ह मीडिया हा होता. तिथूनच माहितीचा स्त्रोत मीडियाकडून लोकांकडे जाणं ही पारंपरिक रचना बदलायला सुरूवात झाली. आणि लोकांकडून मीडियाकडे माहितीचा स्त्रोत सुरू झाला.
खरं म्हणजे आपण अशा युगात वावरत आहोत जिथे माहिती ही कुणा एकाची मक्तेदारी असू शकत नाही. ती कुणाहीकडे असू शकते. पूर्वीही ती होतीच पण ती प्रसारीत करणं ही तांत्रिक अडचण होती. आता व्टीटर, ब्लॉग्ज, बझ अशा माध्यमांमुळे आपला मुद्दा मांडणं आणि तो अनेकांपर्यंत पोहोचवणं अगदी सोपं झालं आहे. अमिताभ बच्चन यांनी रात्री अडीच वाजता ब्लॉग पोस्ट केला की पावणेतीन वाजता त्याच्यावर पहिली प्रतिक्रिया पडलेली असते. अमिताभ आणि त्याच्या चाहत्यांचा हा थेट, मुक्त संवाद कुणीही "फिल्टर' करू शकत नाही. दोन टोकांमधलं माध्यम म्हणून मीडियाचं जे महत्त्व होतं त्याला हादरा बसला आहे तो तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे. मीडियाबद्दलच्या अविश्‍वासार्हतेची त्याला जोड मिळाली आहे इतकंच.
आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की तंत्रज्ञानातले हे बदलच यापुढच्या काळात अनेक गोष्टींना भुईसपाट करणार आहेत. अनेक नव्या गोष्टी आणणारही आहेत. व्टीटरची एक ओळ आयपीएलच्या साम्राज्याला धक्का देईल हे दहा वर्षापूर्वी आपल्याला "कल्पनारम्य' वाटलं असतं. चॅनल सर्फिंग ज्या वेगानं केलं जातं, त्याच वेगाने आपल्या आसपास घटना घडतात. त्याच वेगानं त्या आपल्याला समजतात. इंटरनेटवरून तुम्ही कधीही कुणाशीही संपर्क साधू शकता तेव्हा देशांच्या भौगोलिक सीमाही नावापुरत्या ठरतात.
ज्यांच्या अगदी वडिलांनीही गावाबाहेर पाऊल टाकलेलं नाही अशी मुलं नोकरीसाठी देशोदेशी फिरतात. अशा वातावरणात लोकांच्या आकांक्षा वाढलेल्या आहेत. जगण्याच्या कक्षा बदलल्या आहेत. त्यांची समज वाढलेली आहे. आणि मीडियाकडून असलेल्या अपेक्षा बदलल्या आहेत. मीडिया हे बदललेलं समाजमन समजून घ्यायला तयार नाही. आणि त्यात तंत्रज्ञान स्वस्त आणि सोपं होत लोकांच्या हातात पोहोचलं आहे. सोशल मीडिया हे त्याचंच फलित.
सोशल मीडियाची ही सगळी नांदी बघितली तर फक्त माहिती देणं हा आपला रोल आता बदलला आहे, हे मीडियानं लक्षात घ्यायला हवं.

No comments:

Post a Comment