Friday, January 28, 2011

तुही मातृभाषा कंची?

आईकडून मिळते ती भाषा म्हणजे मातृभाषा ही मातृभाषेची सहजसोपी व्याख्या; पण गेल्या वीसेक वर्षात मातृभाषेबद्दलचे अनेक प्रश्‍न पुढे आले आहेत.
---
बिरबल बादशहाची एक गोष्ट आहे. बादशहाकडे एक विद्वान येतो. त्याला एकाच वेळी पाच-सात भाषा येत असतात. या सगळ्याच भाषा तो इतक्‍या अस्खलित बोलत असतो, की यातली माझी मातृभाषा कोणती ते ओळखून दाखवा, असं त्याचं आव्हान असतं. त्याला येणाऱ्या सगळ्या भाषा जाणणाऱ्या विद्वानांना बोलावलं जातं. त्याच्या भाषाज्ञानापुढे हे विद्वानही हात टेकतात. आता काय करायचं? दरबारातल्या कुणालाही त्याची मातृभाषा ओळखून दाखवण्याचं आव्हान पेलता आलं नाही, तर बादशहाची नाचक्की होणार. बादशहा अपेक्षेने बिरबलाकडे पाहतो. बिरबल एक युक्ती करतो. एका सेवकाला बोलवून त्या विद्वानाच्या पाठीवर चाबकाचा एक फटका द्यायला सांगतो. तो फटका बसल्याक्षणी तो विद्वान ओरडतो. हीच याची मातृभाषा, बिरबल सांगतो.
000000
आपल्या देशासारख्या सामाजिक, सांस्कृतिक पातळीवर वैविध्य आणि तितकीच गुंतागुंत असलेल्या देशात तर मातृभाषा हा प्रश्‍न आणखीनच गुंतागुंतीचा आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे एकेकाळचे माध्यम सल्लागार शारदा प्रसाद यांनी 2001 मध्ये झालेल्या जनगणनेसंदर्भात एक लेख लिहिला होता. त्या लेखात ते म्हणतात, माझी मातृभाषा कन्नड, माझ्या पत्नीची मातृभाषा तेलुगु, आमची मुलं वाढली दिल्लीत, शिकली तिथल्याच आसपासच्या शाळांमध्ये. हिंदी आणि इंग्लिश याच भाषा त्यांच्या कानावर पडल्या. शिकवल्या गेल्या. त्यांच्या शालेय शिक्षणात त्यांचा कुठेही आमच्या म्हणजे आई-वडिलांच्या मातृभाषेचा संबंध आला नाही. त्यामुळे जनगणनेत मातृभाषा कोणती, हा प्रश्‍न आला तेव्हा मुलांची मातृभाषा हिंदी अशीच नोंदवली गेली.
त्यांच्या मुलांची मातृभाषा खरोखरच हिंदी असू शकते का?
000
मातृभाषा म्हणजे काय, या प्रश्‍नाचं ढोबळमानाने उत्तर आई बोलते ती भाषा. ते जास्त व्यापक केलं तर आई-वडिलांची म्हणजेच त्या घरात बोलली जाते, ती भाषा असं म्हणता येईल. एकेकाळी आपल्याकडे लोकांची मोबिलिटी कमी होती. नोकरीव्यवसायानिमित्ताने या राज्यातून त्या राज्यात जाऊन स्थिरस्थावर होण्याचं प्रमाण तुलनेत कमी होतं. गेल्या वीस वर्षांत हे प्रमाण विशेषतः आयटीवाल्यांमुळे प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. वेगवेगळ्या दोन राज्यांतले तरुण-तरुणी तिसऱ्याच राज्यात भेटतात, लग्न करतात, तिथेच स्थायिक होतात. त्यांच्या घरात त्या राज्यातली भाषा बोलली जात नसते, त्या दोघांनाही एकमेकांची मूळ भाषा येत नसते. परिणामी घरात सामाईक भाषा हिंदी किंवा इंग्रजी बोलली जाते. तीच त्यांच्या मुलांचीही भाषा बनते; पण ती त्यांची मातृभाषा म्हणायची का?
000
मातृभाषा या संकल्पनेचं सांख्यिक महत्त्व आपल्याकडे लक्षात आलं ते जनगणनेमुळे. 1961 साली झालेल्या जनगणनेत मातृभाषेसंदर्भातले प्रश्‍न विचारले गेले. ही जनगणना करताना ती करणाऱ्या प्रगणकांना लोक मातृभाषेबाबत सांगतील ती माहिती तशीच उतरवून घ्यायला सांगितलं गेलं होतं. त्या माहितीवर प्रगणकांनी आपल्या ज्ञानानुसार कोणतेही संस्कार करायचे नव्हते. गंमत म्हणजे लोकांनी जात, धर्म, व्यवसाय, गाव यांची नावं मातृभाषा म्हणून सांगितली. या जनगणनेत मिळालेल्या माहितीचं संकलन, विश्‍लेषण केलं गेलं. त्यातून असं पुढे आलं की आपल्या देशात 1652 मातृभाषा बोलल्या जातात. या सगळ्याच भाषांना लिपी आहे, असं नाही. त्याशिवाय जवळपास 400 भाषा बोलल्या जातात. या सगळ्या भाषांचं इंडो आर्यन, द्राविडीयन, ऑस्ट्रिक, तिबेटो-बर्मन या चार प्रमुख भाषाकुलांमध्ये वर्गीकरण केलं गेलं आहे.
000
2001 च्या जनगणनेमध्ये लोकांना मातृभाषेचं नाव आणि येत असलेल्या इतर भाषांची नावं हे नवे प्रश्‍न विचारले गेले. या जनगणनेमध्ये मातृभाषेची व्याख्या लहानपणी त्या व्यक्तीची आई तिच्याशी ज्या भाषेत बोलली असेल ती भाषा, असं करण्यात आलं आहे. त्या व्यक्तीची आई लहानपणीच मरण पावली असेल तर कुटुंबात बोलली जाणारी भाषा ही त्या व्यक्तीची मातृभाषा मानली गेली आहे. बोलू न शकणारी, तान्ही मुलं, मतिमंद तसंच मुक्‍या बहिऱ्या व्यक्तींच्या बाबतीतही तिच्या आईची भाषा ही तिची भाषा मानली गेली आहे. कुटुंबात आई-वडिलांची भाषा वेगवेगळी असेल, तर त्या दोन्ही भाषा मातृभाषा म्हणून नोंदवल्या गेल्या आहेत.
000
म्हणूनच मातृभाषेबद्दल आजच्या काळात अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. उदाहरणार्थ, आई-वडील मराठी आहेत आणि ते मुलांशी इंग्रजीतच बोलतात तर त्या मुलाची भाषा कोणती धरायची? आईची मातृभाषा अहिराणी आणि वडिलांची कोकणी असेल, ते मुलांशी कधी अहिराणीत कधी कोकणीत तर कधी प्रमाण मराठीत बोलत असतील तर मुलांची मातृभाषा कोणती? आईची भाषा बंगाली, वडिलांची उरिया आणि त्यांनी मुलांना त्या दोन्ही भाषा शिकवल्या आहेत, तर त्या मुलांची मातृभाषा कोणती? एका व्यक्तीच्या दोन दोन मातृभाषा असू शकतात का? आई-वडिलांची दोघांचीही मातृभाषा तेलुगु, ते दोघंही मुंबईत वाढल्यामुळे त्यांना तेलुगु येत नसेल तर त्यांची मुलं आपली मातृभाषा तेलुगु असल्याचा दावा करू शकतील का? वेगवेगळ्या राज्यांमधली मुस्लिम कुटुंबं आपली मातृभाषा उर्दू असल्याचं सांगत असतील तर? जात, धर्म, व्यवसाय, प्रदेश यावरून मातृभाषा ठरवता येते का?

No comments:

Post a Comment