Sunday, May 31, 2009

रेखाचा गुस्सा!

"रा ज कपूर जीवनगौरव' पुरस्कार जाहीर झाल्यावर आपल्या रेखाताईंनी एक वक्तव्य काय केलं; सगळा गहजब उडाला."जीवनगौरव' या नावाला रेखाताई वैतागल्या म्हणे.त्यांना असं वाटलं, की जीवनगौरव पुरस्कार देताहेत म्हणजे आपल्याला आता काम थांबवा आणि घरी निवांत बसा, असंच अप्रत्यक्षपणे सांगितलं जातंय. म्हणजे थोडक्‍यात आता रिटायर व्हा, असा सल्ला आपल्याला दिला जातोय असा अर्थ लावला रेखाताईंनी आणि जाम तडतड केली. सरकारनंही काय घोटाळा झाला, हे लक्षात आल्यावर चक्क पुरस्काराचं नावच बदलून टाकलं आणि "राज कपूर जीवनगौरव'ऐवजी "राज कपूर प्रतिभागौरव' पुरस्कार रेखाला दिला जाईल, असं जाहीर केलं.इथपर्यंत सगळं नीट चाललं होतं. आता काय पुरस्कार देण्याचाच तेवढा उपचार.पण मामला वाढतच गेला. कुणी एक धमाल विनोदी वक्तव्य केलं, की सरकार एका बाईपुढे नमलं. कुणी म्हणालं, सरकारनं असं काहीतरी करणं हे अजिबातच चुकीचं आहे. सरकारनं असं पुरस्काराचं नाव काय म्हणून बदलावं वगैरे वगैरे.आपल्या एका स्त्रीहट्टामुळे काय काय झालं याची तिकडे आपल्या रेखाताईंना कल्पनाच नाही. कशी असेल म्हणा? एक-एक पुरस्कार मिळविण्यासाठी काय काय करावं लागतं, त्यांना काय माहीत?कोण स्वतः मोठं होण्यासाठी दुसऱ्यांना पुरस्कार देत असतात. कोण मोठं होण्यासाठी पुरस्कार अगदी प्रयत्नपूर्वक मिळवीत असतात. काही वेळा पुरस्कार ठरवून दिले जातात; तर काही वेळा ते खिरापतीसारखे वाटले जातात म्हणे! काही वेळा पुरस्कार घेणाऱ्यांना तुम्ही आम्हाला "धन' द्या; आम्ही तुम्हाला पुरस्काररूपी "मान' मिळवून देऊ, असंही सांगितलं जातं म्हणे!मुंबईत काम करणाऱ्या एका पत्रकार महोदयांना आलेला पुरस्काराबाबतचा अनुभव अगदी सांगण्यासारखा आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांना "परभणी भूषण' पुरस्कार देण्याचा प्रस्ताव थेट परभणीहून आला. आपली थेट परभणीपर्यंत पसरलेली लोकप्रियता बघून त्यांना अगदी भरून आलं. पुरस्कार घ्यायला त्यांना जायला जमलं नाही; पण पुढच्याच महिन्यात कामासाठी गेल्यावर त्यांनी संबंधित संस्थेशी संपर्क साधला. तेव्हा त्या कार्यक्रमात असे तीसेक जण "परभणी भूषण' झाले होते. त्यातले काही वेगवेगळ्या शहरांमधले पत्रकार होते. हा धक्का कमी होता म्हणून की काय, पुरस्काराचं स्मृतिचिन्हही त्यांना दिलं नाही. कारण काय; तर तुम्हाला आम्ही एवढा पुरस्कार जाहीर केला; पण तुम्ही आमची बातमी कुठे जाहीर केली तुमच्या पेपरात?त्याच वर्षी सुरू झालेल्या त्या गल्लीतल्या संस्थेला आपल्या त्याच वर्षी सुरू झालेल्या पुरस्कारांची बातमी राज्यभरात छापून आणायची होती. त्यासाठी त्यांनी राज्यभरातल्या वेगवेगळ्या पत्रकारांनाच पुरस्कार द्यायची शक्कल लढविली होती. ही तर पुरस्काराची एक साधी कहाणी. पुरस्कारांच्या अशा किती रम्य आणि सुरस कहाण्या सांगाव्यात?अर्थात याचा अर्थ असा नाही, की पुरस्कारांच्या दुनियेत प्रामाणिकपणे काही घडतच नाही!खरोखर चांगलं काम करणारी माणसं आणि खरोखर योग्य माणसांना पुरस्कार देणाऱ्या संस्था आहेतच की!पण ही सगळी मंडळी हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच.अभिनयाच्या क्षेत्रात रेखाचं स्थानही असंच आहे. खरं तर रेखाचा हा पुरस्कार आहे सिनेमासृष्टीसाठी.त्यामुळे "जीवनगौरव' म्हटलं काय आणि "प्रतिभागौरव' म्हटलं काय रेखाला का फरक पडावा?पण नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार या लेखाच्या सुरुवातीला रेखाताई म्हटल्याचाही राग आलाय म्हणे त्यांना!
published in mumbai sakal 30 may

No comments:

Post a Comment