Tuesday, May 26, 2009

कार्ड मनसेचं!

सबाजी शांताराम देसाई हे मनसे कार्यकर्ते. नातेवाईकांच्या लग्नासाठी ते मुंबईहून सिंधुदुर्गात कळणे येथे आले असता सिंधुदुर्गातील एका नागराजांनी त्यांच्या घरात चक्क घुसखोरी केली. "माझ्या घरात यायची तुझी हिंमत झालीच कशी? तुला माहीत नाही मी "मनसे'चा कार्यकर्ता आहे?'सबाजींनी त्या नागाला विचारलं."फुस्स्‌... फुस्सफुस्स्‌...' नागराज उत्तरले."तू मला ओळखत नाहीस? तुला माझं मनसेचं कार्ड दाखवू?' "फुस्स्‌... फुस्सफुस्स्‌...'"अरे काय समजतोस काय तू स्वतःला? तुला मनसे माहीत नाही की काय? माझ्याकडे मनसेचं कार्ड आहे आणि तरीही तू माझ्या घरात शिरतोस?' सबाजींच्या प्रश्‍नावर नागमहाशय काहीच उत्तर देत नव्हते. नुसतेच फुसफुसत होते. "अरे माझ्यासारख्या मराठी माणसाच्या घरात तू घुसखोरी केल्याचं उद्या राजसाहेबांना कळलं, तर काय होईल तुझं माहिती आहे ना तुला? मराठी माणसावर झालेला अन्याय त्यांना जराही खपत नाही...' "फुस्स्‌... फुस्सफुस्स्‌...'"अरे फुसफुस काय करतोस? सगळ्या मराठी माणसांनाही आमच्या राजसाहेबांची ही भूमिका सॉलिड पसंत आहे. म्हणूनच या लोकसभा निवडणुकीत आम्ही एवढी मतं काढलीत'"फुस्स्‌... फुस्सफुस्स्‌...'"आणि आता माहितेय ना विधानसभा आल्यात. आमचे राजसाहेब म्हणताहेत की पुढचा मुख्यमंत्री मीच ठरवणार'"फुस्स्‌... फुस्सफुस्स्‌...'"महाराष्ट्रात मराठी माणसाचाच आवाज चालला पाहिजे... काय कळलं ना?'"फुस्स्‌... फुस्सफुस्स्‌...' "माझ्या घरात मला न विचारता घुसतोस? आजपर्यंत हे सगळं चाललं असेल, पण इथून पुढे नाही चालणार. समजलं ना? आम्ही आतापर्यंत हजारात आणि लाखात खेळलो. आता आम्ही कोटीत खेळणार आहोत.'तरीही नागराज काहीच बोलेनात की घुसखोरी का केली ते सांगेनात.अरे लोकांनी मनसेला मतं दिली म्हणून मुंबईत परप्रांतीय निवडून आले म्हणे... अरे असं असेल तर असं म्हणणाऱ्यांनी तरी कुणाला मतं दिली रे? अरे हे सगळं राजसाहेब बोलले परवाच्या सभेत. लोकांनी काय सॉलिड टाळ्या दिल्यात... काय समजतोस! "फुस्स्‌... फुस्सफुस्स्‌...'अरे मघापासून बोलतोय मी. तू बस नुसताच फुसफुसतो. ते परप्रांतीय इथं येतात म्हणून तर चाललंय हे सगळं! तुला काय म्हणा त्याचं! अरे बोल काही तरी. कुठून आलास बाबा? काय काम काढलंस? का आलास इथं? आखिर आये हो कहॉंसे?"फुस्स्‌... फुस्सफुस्स्‌...' नागराजांची फुसफुस चालूच होती. "काय म्हणतोस? यूपी? यूपीतून आलास तू?' सबाजींनी नागाच्या तोंडून चक्क यूपी ऐकलं.मग मात्र या निधड्या मनसेवीराचा पारा चढला. नागही परप्रांतीय?त्यानं आपल्या घरात घुसलेल्या नागराजासोबत तिथल्या तिथं राडा सुरू केला. लोक काहीही म्हणतात. यशाच्या धुंदीत मनसे कार्यकर्त्यानं तळीराम होऊन गोंधळ घातला म्हणे!त्यानं तर एका "परप्रांतीय' नागाशी दोन हात केले!
published in sakal mumbai 26 may 2009

No comments:

Post a Comment