Sunday, May 24, 2009

गर्दीत माणसांच्या...

मुंबई आणि मायानगरीही...गुजरातमधल्या धीरूभाई अंबानींनाही वाटतं की इथं आपलं नशीब उघडणार आणि अलाहाबादच्या अमित श्रीवास्तवलाही वाटतं की इथं आपल्याला आपली वाट सापडेल. उत्तर प्रदेशमधल्या सुलतानपूरसारख्या गावातल्या एका लहानगीलाही वाटतं मुंबईत जाऊ!सोळा वर्षांचं वय. कशाचा तरी डोक्‍यात धुमसणारा राग. घर नको, आईवडील नकोत.मुंबईत जाऊ. कॉल सेंटरला वगैरे नोकरी करू आणि काढू आपलं आपण सगळं आयुष्य! आहे काय त्यात?थेट असा विचार करून तिनं घरातून बाहेर पडली. नेहमीसारखी कोचिंग क्‍लासला गेली.आणि नंतर थेट बसली ती मुंबईच्या ट्रेनमध्ये.वय सोळा वर्षांचं. अकरावी सायन्स पास. बारावीसाठी तयारी सुरू. कशावरून तरी रागवलेले वडील एवढंच निमित्त!ऐकणाऱ्या कुणालाही वाटेल हे काय घर सोडून यायचं निमित्त आहे?पण तिच्या लहानशा डोक्‍यात तेच धुमसत असलेलं!त्यामुळे कोचिंग क्‍लासची पुस्तकं असलेलं दप्तर घेऊन तो वेडा जीव मुंबईत येऊन धडकला.तिचं काय काय होऊ शकतं या मुंबईत?सीएसटीसारख्या स्टेशनवर नेहमी जाणारी बाई पाच मिनिटं कुणाची वाट बघत रेंगाळली तरी तिला जीव नकोसा होऊन जातो.आणि ही सोळा वर्षांची कोवळी पोर अशी भिरभिरत्या नजरेनं इकडं तिकडं बघत आता काय करू या? कुठं जाऊ? या असा विचार करीत उतरली असती तर तिचं काय झालं असतं?अशा किती तरी जणी येऊन दाखल होतात रोज.कुणी बाजार सांभाळणाऱ्यांच्या हातात अलगद सापडतात.कुणी ज्युवेनाईल एड पोलिस युनिट अर्थातच "जापु' या पोलिसांच्या अल्पवयीन मुलांसाठी काम करणाऱ्या युनिटला सापडतात.तिथून त्यांची रवानगी बालसुधारगृहात आणि नंतर नीट घरी होते. घडलेल्या चुकीची जाणीव होते आणि घसरलेली गाडी पुन्हा रुळावर येते.पण हे असं सगळ्यांच्याच वाट्याला येईल याची काय गॅरंटी?आयुष्यात एकदा केलेली चूक सुधारायची संधी प्रत्येकाला थोडीच मिळणार?पण या सोळा वर्षांच्या लहानगीच्या नशिबात काही वेगळंच होतं.भिरभिरत्या नजरेनं सीएसटी स्टेशनवर उतरण्याआधीच ट्रेनमध्ये असतानाच तिला कुणीतरी भेटलं.सोळाव्या वर्षी करायच्या अविचारी धाडसांच्या मालिकेतलं आणखी एक धाडस तिनं केलं. भेटलेल्या तरुणाला तिनं आपण काय, कुठून आलो, का आलो, काय झालं, हे सगळं तथाकथित विश्‍वासानं सांगून टाकलं. आता तिचा भार हलका झाला आणि त्याचा वाढला.हिचं काय करायचं? अकरावी सायन्सची परीक्षा दिलेली, मध्यमवर्गीय घरातली, डोक्‍यात राख घालून निघून आलेली मुलगी.मुंबईत जाऊन नोकरी करीन आणि माझी मी जगेन अशी तिची कल्पना.हिचं काय करायचं?त्यानं त्याच्या मित्राला बोलावून घेतलं. दोघांनी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला.तिच्याबरोबर सीएसटी स्टेशनवर दोनाचे पाच तास झाले. तिचा ठाम निर्धार होता मला घरी जायचंच नाही. त्यांनी फोनवरून एकदोघांशी चर्चा केली.दोघंही तिला "जापु'कडे घेऊन गेले. तिथं नेहमीचा घोळ. मुलगी जिथं सापडली त्या हद्दीतल्या पोलिसांकडे द्या.पुन्हा सीएसटी स्टेशन. तिथले रेल्वे पोलिस जेवायला गेलेले. पुन्हा तासभर गेला.आल्यावर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. यांची जबानी घेतली. आता तिची रवानगी बालसुधारगृहात होईल. तिचं पुन्हा पुन्हा काऊंसेलिंग होऊन तिला हळूहळू घरी जायला राजी केलं जाईल. तिच्या आयुष्याची गाडी पुन्हा रुळावर येईल.मुंबईला हे अजिबात नवीन नाही. आयुष्यं उभी राहणं, मोडून पडणं, शिखरावर जाणं, रसातळाला जाणं... मुंबईसाठी हे सगळं रोजचंच. कधी इथे कधी तिथे. कधी याच्या बाबतीत, तर कधी त्याच्या बाबतीत. पण या धावत्या शहराला दुर्मिळ आहे ते थांबणं. कुणासाठी तरी थांबणं. त्याची चौकशी करणं. त्याला गरज आहे हे लक्षात आल्यावर त्याला वेळ देणं. आपलं काम सोडून, आपला वेळ खर्च करून त्याच्यासाठी वाट वाकडी करणं. रोजच्या जगण्यासाठी आपण जीवघेणी धाव घेत असताना असं थांबून कुणासाठी तरी मदतीचा हात पुढे करणं!हे करणारे दोघं जण माध्यमातलेच आहेत. "मी मराठी'चे योगेश बोरसे आणि "आयबीएन लोकमत'चे पत्रकार विशाल परदेशी!त्यांना हॅटस्‌ ऑफ!
published in mumbai sakal 23 may 09

No comments:

Post a Comment