Sunday, May 24, 2009

गाव तिथं मर्सिडिझ...

लाल डबा असं म्हटलं की वेगळं काही सांगावं लागतं? नाही ना?लाल डबा म्हणजे आपली एसटी... आपल्या खऱ्याखुऱ्या भाषेत सांगायचं तर यष्टी!चांगलीचुंगली माणसं आजकाल तिला नाकं मुरडतात. कोण जाणार त्या लाल डब्यातून, असं म्हणतात.त्यांना हवी असते चकचकीत दिसणारी, गुबगुबीत खुर्च्या असलेली, पोटातलं पाणीही हलणार नाही, अशी एसी बस. ती ठरल्या ठिकाणाहून निघते, ठरल्या ठिकाणीच पोहोचते, वाटेत तिला फूड मॉल लागतात. तिथं सगळंच दुप्पट-तिप्पट किमतीला मिळतं.ती स्वतः एसटीच्या दुप्पट-तिप्पट पैसे घेते; पण पैसेवाल्यांना हवा असतो तो सगळा "कम्फर्ट'. तिथं अगदी पैसा वसूल असतो.आणि एसटी?विकत घेतानासुद्धा नवीन घेत नसावेत, असं तिचं रूपडं!हजार ठिकाणी ठोकलेली, पोचे आलेली, खिडक्‍या कधी उघडण्यासाठी नसाव्यातच आणि उघडल्या तर बंद होण्यासाठी नसाव्यात... ठिकठिकाणी गाडीत पान खाऊन काढलेली नक्षी... बंद पडू नये म्हणून सुरूच ठेवायची ती खास भारतीय स्ष्टाईल... आणि एकदा गाडी सुरू झाली की प्रवाशांना कंटाळा येऊ नये म्हणून खिडक्‍या दारांच्या खडखडाटाचं ते बॅकग्राउंड म्युझिक... दणकून आपटल्याशिवाय नीट बंदच न होणारे ते दरवाजे...किती गोष्टी सांगाव्यात यष्टीच्या?याच यष्टीनं आधुनिक व्हायचं ठरवलं तेव्हा विक्रम गोखलेंना ब्रॅंड ऍम्बॅसॅडर म्हणून आणलं होतं. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे काल सगळीकडे झळकलेल्या बातम्या.पुणे मुंबई प्रवासासाठी एसटीने आता मर्सिडिझ बेंझ कंपनीच्या बसची सेवा द्यायला सुरुवात केली आहे. आधी वोल्व्हो होतीच. आता मर्सिडिझ बेंझ!किती बदलला जमाना. ेएकेकाळी- एकेकाळी कशाला- 1982 मध्ये दिल्लीत एशियाड झालं तेव्हा सरकारनं आणलेल्या निमआराम गाड्याचंही केवढं कौतुक झालं होतं. आजही त्या गाड्यांना एशियाडच म्हणतात. म्हणजे एसटीचा प्रवास लाल डब्यापासून मर्सिडिझ बेंझपर्यंत!या सगळ्या काळात एसटीनं काय काय पाहिलंय.हळूहळू ती तोट्यात गेली. त्याला तिच्या गैरकारभाराची, बेशिस्तीची, अरेरावीची जोड होतीच. गावोगावी बेकायदेशीर खासगी वाहतूक त्यातूनच वाढत गेली.साताठ जणांची क्षमता असणाऱ्या गाडीत पंधरा-पंधरा जण वाहून नेणारे खासगी व्यावसायिक वाढले. लांबच्या प्रवासासाठी लक्‍झरी बस आल्या. अगदी एसटीनंही वोल्व्हो सुरू केल्या.पण लाल डब्याची एसटी ती एसटी. तिच्या सगळ्या दुर्गुणांसकट तिला एक मानवी चेहरा आहे. प्रत्येक गाव आणि प्रत्येक रस्ता तिला माहिती आहे. गाव तिथं एसटी हे ब्रीदच होतं तिचं!त्या रस्त्यावरून, त्याच लाल डब्यातून तालुक्‍याच्या गावाला जात किती पिढ्यांची शिक्षणं झालीत. फक्त एवढंच नाही, तर एसटी आहे या भरवशावर किती आयाबायांनी अगदी विश्‍वासानं आपल्या पोरीबाळींना शिकायला पाठवलंय. किती आजारी माणसं आणि किती अडलेल्या बायकांना तालुक्‍याच्या गावाला पाठवून एसटीनं किती जीव वाचवलेत.अगदी दुर्गम भागातल्या किती गावांना दिवसातून एकदा तरी जाऊन एसटीनं त्यांना जगाशी जोडलंय.हे सगळं करताना कधी फायद्या-तोट्याचा प्रश्‍नच नव्हता.माणसं महत्त्वाची होती. तीही कुणी पैसेवाली, व्हीआयपी नव्हे तर खेड्यापाड्यात राहणारी. ज्यांच्या हातात पैसा फारसा खुळखुळत नसतो अशी. खरीखुरी जनता!पैसेवाल्यांकडून पैसा ओढणाऱ्या गाड्या कुणीही उडवील. मर्सिडिझ बेंझच्या गाड्या आणून एसटीनंही ते ओढावेत. अगदी उद्या "गाव तिथं मर्सिडिझ' अशी घोषणा करण्याची ऐपत एसटीवर येवो.पण एसटीनं आपला मानवी चेहरा विसरू नये एवढंच!

published in sakal mumbai 22 may 09

No comments:

Post a Comment