Sunday, May 31, 2009

न्यूनगंडाची भाषा

आजकाल डॉक्‍टर होण्यासाठी मध्यमवर्गीय पालक मुलांना रशियाला पाठवतात.असेच एक पालक भेटले. त्यांची मुलं सध्या रशियात मेडिकलला आहेत.रशियात गेल्यावर त्यांना सगळ्यात पहिल्यांदा रशियन भाषा येण्यासाठी भाषेचा दोन महिन्यांचा मूलभूत कोर्स करावा लागतो.त्यानंतरही जेवढी वर्षं ते तिथं राहतील तितकी वर्षं रशियन शिकावं लागतं. रोजच्या व्यवहारात आसपासच्या माणसांशी रशियन बोलावं लागतं.कारण सामान्य लोक तीच भाषा बोलतात.परदेशी विद्यार्थ्यांना मेडिकलचा अभ्यासक्रम इंग्रजीत पूर्ण करता येतो. रशियन विद्यार्थी त्यांना हवं असेल तर इंग्रजी भाषेत शिकू शकतात. नाही तर रशियनमध्येही शिकू शकतात.कल्पना करा, रशियन विद्यार्थी मेडिकलचा सगळा अभ्यासक्रम रशियन भाषेत शिकू शकतो.आपल्याला एखादा शब्द शुद्ध मराठीत सांगितला तर समजत नाही.तो इंग्रजीत सांगितला तर त्याचा अर्थ लागतो.घरातून बाहेर पडलो, की आपल्याशी बोलणाऱ्या माणसाशी आपणच हिंदीत बोलायला सुरुवात करतो.घरात मूल जन्माला आलं, की त्याच्या शाळेबाबतचा पर्याय इंग्लिश मीडियम हाच असतो.यात चुकीचं काहीच नाही.जगाच्या स्पर्धेत आपलं मूल मागे पडू नये यासाठी आवश्‍यक आहे ते सगळं प्रत्येक आई-वडील करणारच.पण यातून दिसते ती आपली सामाजिक मानसिकता.परिस्थितीशी जुळवून घेण्याची.हिंदी लादली जातेय असं वाटलं तेव्हा तमीळ भाषकांनी नाही जुळवून घेतलं परिस्थितीशी.श्रीलंकेत तर भाषिक अस्मितेसाठी झालेला धगधगता संघर्ष सगळ्या जगानं बघितला आहे.भाषा हे आपलं साक्षात अस्तित्व असतं.आपलं संचित, आपली संस्कृती.आपल्या पिढ्यान्‌ पिढ्या त्या सत्वावर पोसलेल्या असतात.ते त्या त्या समूहाचं कुबेराचं धन असतं.अस्तित्वाचं, अस्मितेचं प्रतीक असतं.आणि आपल्या अस्तित्वावरच घाला येणार असेल तर कुणी तो कसा सहन करेल?खरं तर मराठी माणूसही सहन करणार नाही. तो तर त्याच्या ताठपणासाठी, मोडेन पण वाकणार नाही, या मराठी बाण्यासाठी प्रसिद्ध आहे.एकेकाळी तर त्याची दहशत वाटावी असा पराक्रम त्यानं करून दाखवलाय.मग त्याच्या भाषेवर होणारं आक्रमण तरी त्यानं का सहन करावं?पण मराठी माणूस त्याच्या अस्मितेसाठी रस्त्यावर उतरला, की त्याचं वर्णन तथाकथित टीव्ही विचारवंत "प्रादेशिक संकुचितवाद' असं करतात. महाराष्ट्रात मराठी सक्तीची केली तर तोही मराठी माणसाचा संकुचित आग्रह होतो.इतरांची ती अस्मिता आणि मराठी माणसाचा तो "प्रादेशिकवाद?' असं का?मग रशियातला विद्यार्थी त्याच्या देशात त्याच्या भाषेत मेडिकलचा अभ्यास करून डॉक्‍टर बनू शकतो याला काय म्हणायचं?तमिळनाडूत, कर्नाटकात, पश्‍चिम बंगालमध्ये गेल्यावर कामचलाऊ का होईना त्या त्या ठिकाणची स्थानिक भाषा यावीच लागते.असे आग्रह धरण्याऐवजी आपण आमच्यावर अन्याय होतोय, आमच्यावर आक्रमण होतंय अशी भाषा का करतो आहोत?ही न्यूनगंडाची भाषा आपण कधी टाकून देणार?
published in mumbai sakal 28 may

No comments:

Post a Comment