Sunday, May 24, 2009

अहो ऐकलंत का?

अहो ऐकलंत का, ही हाक ऐकल्यानंतर तिच्याकडे दुर्लक्ष करायची कुठल्या "अहों'ची टाप आहे? ही हाक ऐकली की तेवढ्यापुरते कान टवकारायचे हे घरोघरी ठरलेलं असतं. भले, त्यानंतर कानावर येणारा सगळा मजकूर नंतर कानाबाहेर किंवा कानामागे टाकला जात असेल; पण त्याक्षणी तरी अटेन्शन! सावधान!पण आता तसं करून चालणार नाही. कारण तसा तंबीवजा सल्ला सर्वोच्च न्यायालयानेच दिलेला आहे. हवाई दलात अधिकारी असलेल्या दीपक कुमार यांच्या घटस्फोटाच्या खटल्यासंदर्भातली याचिका न्या. मार्कंडेय आणि न्या दीपक वर्मा यांच्या खंडपीठासमोर आली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान या खंडपीठानं जगातल्या तमाम नवऱ्यांना "लग्नानंतरच्या आयुष्यात शांतता हवी असेल तर बायको जे सांगत असेल ते ऐका' असा सल्ला दिला आहे.खंडपीठ म्हणतं, "बायको जे म्हणते ते ऐका. तिने ऊठ म्हटलं तर उठा. बस म्हणेल तेव्हा बसा. बायकोने दिलेला सल्ला व्यावहारिक आहे की नाही, हे न पाहता त्याची अंमलबजावणी करा. नाहीतर तुमच्या लग्नात संघर्ष निर्माण होईल.' जजमहाशयांच्या या टिप्पणीवर तमाम बायका खूष झाल्या असतील. म्हणजे रोजच्या संसारात त्यांना जे व्हावं असं वाटतं ते त्याच्यावर न्यायालयानंही शिक्कामोर्तब केलं की! म्हणजे जीत भी मेरी आणि पट भी मेरीही!आणि तमाम नवरोबा या टिप्पणीमुळे वैतागले असतील. म्हणजे एरवीही होणार बायकोला हवं तेच; पण आता न्यायालयानंही तेच सांगावं? हे म्हणजे लढाई करायला निघालेल्याला तहाचं पांढरं निशाण नीट इस्त्रीबिस्त्री करून कसं फडकवायचं ते सांगणं झालं.कुणाला आवडेल ते? असं म्हटलं जातं की नवरा-बायको ही जगातली सगळ्यांत मूलभूत, सगळ्यांत आदिम "पोलिटिकल रिलेशनशिप' असते. दोन्ही बाजू नकळतपणे आपापल्या "जमातीं'चे इंटरेस्ट जपायचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. विरोधी पक्ष अस्तित्वात असतो म्हणून आपल्या बाजूलाही धारदारपणा असतो. समोरची बाजू आपल्या म्हणण्याला विरोध करते ते ती आपल्या अस्तित्वाची दखल घेते म्हणून. म्हणजे आपल्या अस्तित्वाची दखल घेणाराही तेवढाच महत्त्वाचा. तोही हवाच. आता बायको लवकर उठायची कटकट करते म्हणून नवरे लवकर उठायला लागले, वेळेवर आवरायला लागले, वेळेत घरी यायला लागले, सगळं तिच्या मनासारखं करायला लागले तर काय मजा? मग तिनंही कटकट कुणाला करायची? आडून आडून आणि घालून पाडून कुणाला बोलायचं? चारचौघींमध्ये कशावर चर्चा करायची? लग्नामध्ये फक्त एकच बाजू कायम बरोबर, योग्य असते, ती अर्थातच बायकोची, अशा आशयाची एक म्हण इंग्रजीत आहे. जगातले असे सगळे विनोद मग कशावर होणार?असं सगळं खूप सुरळीत चाललेलं जग हवंय कुणाला?
published in sakal 21-05-09

No comments:

Post a Comment