Sunday, May 31, 2009

ना हरकत!

मनोहर जोशी यांना कोण ओळखत नाही?आख्खा महाराष्ट्र ओळखतो.नुसते मनोहर जोशी म्हणून नाही तर लोकसभेचे माजी सभापती, माजी मुख्यमंत्री, मुंबईचे माजी महापौर, शिवसेना नेते एवढंच नाही, तर कोहिनूर टेक्‍निकल इन्स्टिट्यूटचे "प्रिं' मनोहर जोशीसर म्हणूनही ओळखतो. एका आयुष्यात एवढं सगळं कर्तृत्व! त्यातले एकेक तपशील बघायला जाल तर काय म्हणाल?साधं "कोहिनूर'चं घ्या. त्या काळातल्या गरीब, मध्यमवर्गीय मुलांची गरज ओळखून "प्रिं' मनोहर "सरां'नी कोहिनूर टेक्‍निकल इन्स्टिट्यूट सुरू केल्या. इलेक्‍ट्रिशियन, प्लंबर, टीव्ही-रेडिओ, स्कूटर रिपेअरिंग, फोटोग्राफी अशी कौशल्य शिकून पोरांनी चार पैसे मिळवावेत यासाठी; पण त्याबरोबरच उद्या मुंबईतली गर्दी वाढत जाणार, स्टेशनजवळ असलेल्या इन्स्टिट्यूट लोकांसाठी सोयीच्या ठरतील असा उदात्त विचार करून कोहिनूरच्या सगळ्या शाखा स्टेशनजवळ सुरू केल्या. लोकांच्या सोयीचा केवढा मोठा विचार त्यात होता; पण त्याची कुणाला किंमतच नाही. कोहिनूरला सगळ्या मोक्‍याच्या जागा कशा मिळाल्या, असा प्रश्‍न विचारायला प्रसारमाध्यमं तयार! आताही परत तेच झालंय. एका वर्तमानपत्रात बातमी छापून आलीय. "प्रिं' मनोहर जोशी सरांच्या एका शागीर्दानं म्हणे त्याच्या शिक्षण संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या महाविद्यालयाला सरांचं नाव द्यायचं ठरवलंय. आधीचं नाव बदलून त्याजागी सरांचं नाव द्यायचंय म्हणे त्याला. त्यानं तशी नाव बदलायची परवानगी मागणारा अर्जही केलाय मुंबई विद्यापीठाकडे. आता असतं एखाद्याचं आपल्या सरांवर असं प्रेम. सरही ते जाणून आहेत. त्यामुळे सरांचीही या गोष्टीला काहीही हरकत नाही. सरांनीही तसं ना हरकतीचं पत्र दिलंय म्हणे; तर आता ज्यात त्यात नाक खुपसायची सवय असलेली प्रसारमाध्यमं मधेच कडमडलीत. हा खरं तर मुंबई विद्यापीठ, सरांच्या शागीर्दाची शिक्षण संस्था आणि सर या तिघांमधला मामला; पण नसती शोधपत्रकारिता करत तो फोडून गुरू-शिष्यांमधलं नातं चव्हाट्यावर आणण्याची प्रसारमाध्यमांना काहीतरी गरज होती का? गुरू-शिष्यांच्या नात्यातलं पावित्र्यं त्यांना काय कळणार म्हणा! महाराष्ट्राला शिक्षणाची किती उज्ज्वल परंपरा आहे. "प्रिं' मनोहर जोशी सर त्या परंपरेचे पाईक आहेत. शिवाय डी. वाय. पाटील, वसंतदादा पाटील अशा व्यक्तींच्या नावानंही महाविद्यालयं आहेत. मग सरांच्या नावावर एखादं महाविद्यालय असलं असतं तर काय बिघडलं असतं?साधं आधीचं नाव बदलून सरांचं नाव द्यायचा तर प्रश्‍न होता. तर त्यावरही या प्रसारमाध्यमांचा आक्षेप. काय तर म्हणे महाविद्यालयाचं आधीचं नाव महात्मा फुले यांचं आहे. "महात्मा फुले शिक्षण संस्थेचे आर्टस्‌, सायन्स ऍन्ड कॉमर्स' हे नाव बदलून तिथं सरांचं नाव द्यायला परवानगी कशी द्यायची, अशी विद्यापीठात कुजबूज आहे. महात्मा जोतिबा फुले यांनी महाराष्ट्रात स्त्रीशिक्षणाचा पाया घातला. तेव्हा त्यांचं नाव कसं बदलायचं असा प्रश्‍न पडलाय म्हणे सगळ्यांना. या नतद्रष्टांना एवढंही कळत नाही की आज महात्मा फुले असते, तर त्यांनीही सरांच्या शागीर्दाकडे आपलं ना हरकत प्रमाणपत्र दिलं असतं "प्रिं' मनोहर जोशी सरांसाठी!आणि वर म्हणालेही असते "आम्ही पाया रचला म्हणून काय झालं... सरांनी कळस केलाय ना!'
published in sakal mumbai 27 may

No comments:

Post a Comment