Wednesday, April 20, 2011

जागतिकीकरणाचा धबडगा सुरू झाला, तेव्हा विरोधकांच्या अनेक मुद्द्यांपैकी एक मुद्दा असायचा भाषेचा. परकीय कंपन्या इथे येणार, त्यांचे व्यवहार इंग्रजी भाषेत चालणार, ती भाषा येऊ शकणारे तरतील, बाकीच्यांनी अशा व्यवस्थेत काय करायचं? कसं जगायचं? नव्या व्यवस्थेत त्यांचं काय होणार? इंग्रजीचा वापर इतका वाढेल की स्थानिक भाषांचा ऱ्हास कसा अटळच आहे वगैरे वगैरे...
असं काही झालं नाही, हे आपण बघतोच आहोत. खरं तर त्याच्या उलट झालं आहे.
आपल्या प्रचंड लोकसंख्येला आपला बोजा मानणारी सगळी बाहेरची मंडळी आपली बाजारपेठ खुली झाल्यावर चक्क त्याकडे मनुष्यबळ म्हणून बघायला लागली. ही बाजारपेठ कशी काबीज करायची, याचा विचार करायला लागली. एवढा मोठा देश, तिथे नांदणाऱ्या वेगवेगळ्या संस्कृती, त्यांच्या वेगवेगळ्या परंपरा, चालीरीती, मुख्य म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या 22 भाषा आणि जवळजवळ सोळाशे बोलीभाषा, या सगळ्यांची मिळून बनलेली प्रचंड बाजारपेठ. ती आपल्याला हवी तशी वळवून घेण्यापेक्षा आपण तिला हवं ते देणं हा मार्ग त्यांनी निवडला. त्यासाठीचा महत्त्वाचं माध्यम होतं ते इथल्या भाषा. इथलं भाषिक वास्तव समजून घेतल्याशिवाय इथे आपल्याला आपले हात-पाय पसरता येणार नाहीत, हे मार्केटवाल्यांना पक्कं माहीत आहे. त्यामुळेच भारतातल्या प्रादेशिक भाषांच्या पातळीवर सतत वेगवेगळे सर्व्हे होत असतात. या अभ्यासातून, पुढे आलेल्या माहितीतून वेगवेगळे निष्कर्ष काढले जात असतात.
अशा पाहण्यांमधून पुढे आलेलं एक निरीक्षण म्हणजे भारतात प्रादेशिक पातळीवर तरी इंग्रजी ही दुय्यमच भाषा आहे. टीव्ही असो, वर्तमानपत्रं असोत, रेडिओ असो बहुसंख्य भारतीय जनतेचा कल तिच्या स्थानिक भाषेकडेच असतो. याचं कारण म्हणजे एका आकडेवारीनुसार एकूण लोकसंख्येच्या 37 टक्के (शहरी); तर 17 टक्के (ग्रामीण) लोकांनाच इंग्रजी नीटपणे येतं. शहरी, तसेच ग्रामीण भागातले उर्वरित लोक इंग्रजीशी तेवढे सरावलेले नसतात. साहजिकच ते इंग्रजी भाषेतून होणाऱ्या सगळ्या प्रकारच्या संवादापासून, कॉम्प्युटर, इंटरनेटपासून दूर राहतात. सुरुवातीच्या काळात शहरी, मध्यम - उच्च मध्यमवर्गीयांच्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केलेल्या उत्पादकांना नंतर हा ग्राहकही काबीज करणं गरजेचं वाटायला लागलं. इंग्रजीपासून दूर राहणाऱ्या ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी त्या ग्राहकांची भाषा ही अर्थातच मोठं माध्यम होतं.
या गरजेतून भारतीय भाषांचा अभ्यास सुरू झाला, तेव्हा पुढे आलेली निरीक्षणं विचार करण्याजोगी आहेत. 1996 मध्ये आपल्याकडे एकूण 60 टीव्ही चॅनेल्स होते. आता त्यांची संख्या 300 पेक्षाही जास्त आहे. आज 1996 च्या तुलनेत 500 टक्के जास्त संख्येने टीव्ही प्रोग्रॅमिंग केलं जातं, तेही स्थानिक भाषांमध्ये. टीव्हीवर बातम्या, तसेच करमणुकीचे कार्यक्रम बघण्यासाठी भारतीय माणूस त्याच्या भाषेला प्राधान्य देतो. त्याला बातम्यांपासून जाहिरातीपर्यंत सगळं त्याच्या भाषेत हवं असतं. 2007-08 या वर्षातल्या आकडेवारीनुसार टीव्हीवर राष्ट्रीय पातळीवरच्या जाहिरातींचा वाटा 14.6 टक्के होता; तर प्रादेशिक पातळीवरच्या जाहिरातींचा वाटा 22.7 होता.
इंटरनेटवरही हीच परिस्थिती आहे. इंटरनेटवर सर्च इंजिन, पोर्टलसाठी भारतीय लोकांचं त्यांच्या स्थानिक भाषेलाच प्राधान्य असतं. ई-मेल, चॅटिंगसाठी ट्रान्सलेशन टूल, युनिकोड किंवा रोमन लिपी वापरून भारतीय भाषेत लिहिलं जातं. इंगजीपेक्षा या पद्धतींचं प्रमाण जास्त आहे. हीच पद्धत वापरून भारतीय भाषांमध्ये ब्लॉगिंग करण्याचं प्रमाण खूप आहे. वेगवेगळी मीडिया हाऊसेस बातम्यांच्या वेबसाईट चालवितात, त्यांनाही स्थानिक भाषेतल्या वेबसाईटला चांगला प्रतिसाद मिळतो. एक गमतीशीर निरीक्षण म्हणजे जी विवाहविषयक पोर्टल्स स्थानिक भाषेत असतात, ती चटकन लोकप्रिय होतात. विशेष म्हणजे हिंदीपेक्षा इतर भारतीय भाषांमधल्या वेबसाईटची संख्या जास्त आहे.
सर्च इंजिन, सोशल नेटवर्किंग साईटस्‌, व्यवसायविषयक वेबसाईटस्‌ अशा "युटिलिटी साईटस्‌'पेक्षा वैयक्तिक ब्लॉगिंग, करमणूक, बातम्या तेही स्थानिक भाषेत यांना भारतीय माणूस जास्त प्राधान्य देतो. शहरातला एक विशिष्ट वर्ग वगळला, तर उर्वरित सामान्य माणसाचे रोजचे व्यवहार त्याच्या भाषेतूनच होतात. तीच त्याची जगाचे व्यवहार समजून घेण्याची भाषा असते. इंग्रजीच्या अडथळ्यामुळे तो आपल्यापर्यंत पोचत नसेल, तर आपण त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे हे वास्तव बाजारपेठेला उमगायला लागलं आहे, असं म्हणायला हरकत नाही.
---

चौकट-
जगातल्या सगळ्यात जास्त प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या 10 भाषांची यादी केली, तर ती चायनीज, इंग्रजी, हिंदी, स्पॅनिश, रशियन, जर्मन, अरेबिक, बंगाली, पोर्तुगीज, जपानी अशी आहे. म्हणजे हिंदी ही भारतीय भाषा त्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे; पण इंटरनेटवर सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या 10 भाषांची यादी केली, तर ती इंग्रजी, चिनी, स्पॅनिश, जपानी, फ्रेंच, जर्मन, अरेबिक, पोर्तुगीज, कोरियन, इटालियन अशी आहे. भारतातली एकही भाषा इंटरनेटच्या "टॉप टेन'मध्ये नाही, याचं कारण म्हणजे इंटरनेटसाठी इंग्रजी येणं आवश्‍यक आहे, हा समज.

(आधार- आयएमआरबी म्हणजेच इंडियन मार्केट रिसर्च ब्युरोने केलेल्या भारतातल्या प्रादेशिक भाषांसंदर्भात केलेल्या पाहणीचा अहवाल)
---------------

No comments:

Post a Comment